मुंबई, 08 मार्च: मराठी टेलिव्हिजन विश्वात सध्या एका मालिकेची चर्चा आहे ती मालिका म्हणजे आई कुठे काय करते. मालिकेनं टीआरपीमध्येही पहिल्या क्रमांकावर बाजी मारत मागील काही दिवसांपासून प्रेक्षकांचं लक्ष वेधलं आहे. मालिकेत सध्या आईचं म्हणजेच अरुंधतीचं लग्न आहे. अरुंधती आणि आशुतोष यांचं लग्न ठरल्यादिवसापासून दोघांच्या लग्नात काही ना काही विघ्न येत आहेत. पण आप्पा आणि यशच्या साथीनं अरुंधतीचं लग्न अखेर लागणार आहे. देशमुखांच्या घरातील अनिरुद्ध, अभि आणि कांचन सोडले तर संपूर्ण घर अरुंधतीच्या लग्नासाठी एकत्र आलं. अनिरुद्ध आणि अभि लग्नासाठी तयार होणार नाहीत हे सर्वांना माहिती होत पण कांचननं अरुंधतीच्या लग्नाला विरोध केल्यानं सगळेच चिंतेत आले. पण ज्याचा शेवट गोड त्याचं सगळंच गोड असं म्हणतात. कांचन अखेर अरुंधतीच्या लग्नाला होकार देणार आहे.
आई कुठे काय करते मालिकेत मागील 1 आठवड्यांपासून अरुंधतीच्या लग्नाचे सोहळे पाहायला मिळत आहेत. मेहंदी, हळद, चुडा, घाणा भरणे अशा सगळ्या विधी केल्या आहेत. आपल्या वहिनीच्या लग्नासाठी अविनाश देखील विदेशातून येतो. तर इकडे विशाखाचा नवरा केदार देखील लाडक्या बहिणीच्या लग्नासाठी येणार आहे. आता फक्त एकटी कांचन या लग्नाला नसल्यानं सगळेच नाराज आहेत. पण कांचन स्वत: अरुंधती आणि आशुतोषच्या लग्नाला येणार असून दोघांचं कन्यादान देखील करणार आहे.
हेही वाचा - VIDEO : 'तुझी तू रहा...' महिला दिनानिमित्त अरुंधती फेम मधुराणीचा मैत्रिणींना खास सल्ला
मालिकेत 13 मार्चला अरुंधती आणि आशुतोषच्या लग्नाचा खास एपिसोड पाहायला मिळणार आहे. त्याचा नवा प्रोमो नुकताच समोर आला आहे. ज्यात इतके दिवस अरुंधतीच्या विरोधात बोलणारी, लग्नाला कठोर विरोध करणारी कांचन अखेर अरुंधती आणि आशुतोषच्या लग्नासाठी तयार होतो.
View this post on Instagram
समोर आलेल्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे की, देशमुखांच्या घरात अरुंधती आणि आशुतोषचं लग्न लागतं. दोघांचा कन्यादानाचा विधी सुरू होतो. तेव्हा गुरूजी आप्पांना "तुम्ही कन्यादानासाठी पत्नीला बोलवा" असं म्हणतात. "कांचन येणार नाही", असं आप्पा गुरूजींना सांगतात तेवढ्यात कांचन घरात येते. "थांबा, माझ्या मुलीचं कन्यादान करायला तयार आहे मी", असं म्हणते. कांचनच्या डोळ्यात पाणी येतं. कांचनचा हा निर्णय ऐकून अरुंधतीसह सगळेच आनंदी होतात. त्यानंतर आप्पा आणि कांचन स्वत:च्या हातानं आपल्या लेकीचं म्हणजेच अरुंधतीचं कन्यादान करतात.
मालिकेतील हा क्षण फारच भावुक असणार आहे असं दिसत आहे. आपल्या सुनेचं लग्न सासू सासरे लावून देतात असा प्रसंग पहिल्यांदाच एखाद्या मालिकेत दाखवला जात आहे. अनेकांना मालिकेत सध्या सुरू असलेला ट्रॅक खटकत असला तरी मोठ्या प्रमाणात मालिकेला प्रेक्षकांचं प्रेम मिळत आहे. अरुंधतीच्या लग्नाचा संपूर्ण एपिसोड कसा असणार याकडे प्रेक्षकांचं लक्ष आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Marathi actress, Marathi entertainment, Marathi news, Marathi Serial