मुंबई, 07 जुलै : आई कुठे काय करते मालिकेतून प्रसिद्धी मिळालेली अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर आता सर्वांच्याच परिचयाची झाली आहे. मधुराणीनं साकारलेली अरुंधती अल्पावधीतच लोकप्रिय झाली. अनेक जण ही मालिका आवडीने पाहताना दिसतात. मालिकेतील अरुंधती जशी प्रेमळ, मुलांची काळजी घेणारी आहे. सुंदर गाणं म्हणणारी आहे. तशीच खऱ्या आयुष्यातील मधुराणीही आहे. मधुराणी एका मुलीची आई आहे. अभिनयाबरोबरच ती उत्तम गायिका आहे. काही वर्ष ती मुलांना अभिनयाचे धडे देखील देत होती. अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर हिचा एक व्हिडीओ समोर आला आहे ज्यात मुलांना कवितेची धडे देताना दिसतेय. अभिनेत्री मधुराणीच्या कवितांचे व्हिडीओ नेहमीच सोशल मीडियावर पाहायला मिळतात. मधुराणी उत्तम पद्धतीने कविता सादर करते. अशाच कविता शिकवण्यासाठी ती थेट लेकीच्या शाळेत पोहोचली. मधुराणीची मुलगी स्वरालीच्या शाळेत तिने कविता शिकवल्या. कुसुमाग्रज, शांता शेळकेंच्या कविता तिनं मुलांना वाचून दाखवल्या. त्या कविता त्यांना अर्थासहित शिकवल्या. हेही वाचा - Aai Kuthe Kay Karte Update : दोस्त दोस्त ना रहा! आशुतोष वाजवणार जिवलग मित्राच्या कानाखाली, मालिकेत नवा ट्विस्ट लेकीच्या शाळेत कविता शिकवण्यासाठी गेलेल्या मधुराणीने एक सुंदर व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात ती शाळेतल्या मुलांना कविता म्हणून दाखवतेय. लेक स्वरालीबरोबर सगळी मुलं खाली बसली असून मधुराणी मोठ्याने कविता म्हणून दाखवतेय. ‘पाऊस आला ग आला ग’ या कवितेवर सगळी मुलं छान पैकी रमून गेलेली दिसत आहेत.
मधुराणीनं व्हिडीओ शेअर करत लेकीच्या शाळेचे आणि सगळ्या मुलांचे आभार मानले आहेत. तिनं लिहिलंय, “स्वरालीच्या ’ गोकुळ ’ शाळेत काल कविता शिकवायला गेले होते. कुसुमाग्रज, ग दि मा, शांता शेळके , विंदा , नलेश पाटील अशा मोठमोठ्या कवींच्या कविता अर्थ समजून घेत घेत आम्ही एकत्र म्हटल्या. मुलांचा उत्साह , प्रत्येक कवितेतून अर्थ उलगडताना त्यांचे कुतूहलाने लुकलूकणारे डोळे, ‘अजून एक, अजून एक कविता’ अशी त्यांची आर्जवं. हे सगळंच फार प्रेमात पडणारं होतं”.
तिने पुढे लिहिलंय,“याच वयात मुलांना आपण कवितेची गोडी लावली, त्यातून मिळणाऱ्या निर्भेळ आनंदाची ओळख करून दिली तर आयुष्यातल्या बऱ्या वाईट प्रसंगात मनावर फुंकर घालणारी जन्मभराची एक सखीच मिळवून दिली. मुलांबरोबर कविता गायला हव्यात. त्यातला निर्मळ आनंद असा लुटत राहायला हवा”.