मुंबई, 25 जुलै : आई कुठे काय करते मालिकेत आतापर्यंत इशाच्या लग्नावरून मोठा गदारोळ पाहायला मिळत होता. अनिरुद्धने इशा आणि अनिश यांच्या लग्नाना विरोध केल्याने सगळेच चिंतेत होते. अशा परिस्थितीमध्ये संपूर्ण देशमुख कुटुंब इशा आणि अनिशच्या पाठी उभे होते. पण आता मालिकेत मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. अनिरुद्धच्या विरोधात उभ्या राहिलेल्या अरुंधतीच्या नाकावर टिच्चून अनिश आणि इशा पळून जाऊन लग्न करणार आहेत. याच नोटवर मालिकेत नवं वळण पाहायला मिळणार आहे. मालिकेत आलेल्या या ट्विस्टनं सगळ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. नेमकं इशा आणि अनिश यांनी इतकं मोठं पाऊल का उचललं? लग्नानंतर आता अनिरुद्ध काय प्रतिक्रिया देणार? आजच्या भागात नेमकं काय घडणार? पाहूयात. मालिकेच्या मागील भागात आपण पाहिलं की, अनिरुद्ध इशाला घरात कोंडून ठेवतो. अनिरुद्धने लग्नाला नकार दिला म्हणून इशा आत्महत्येचा प्रयत्न करते. तरीही अनिरुद्ध तयार होत नाही. मी अनिश आणि इशाचं लग्न लावून देणार नाही असं तिला ठणकावून सांगतो. इकडे लग्नासाठी हट्टाला पेटलेली इशा पुन्हा एकदा देशमुखांचं घर सोडते आणि केळकरांकडे राहायला जाते. इशा घर सोडून गेल्यानं देशमुखांच्या घरी सगळे चिंतेत असतात. अनिरुद्धला सगळे राग सोडून इशाला घरी परत आण असं समजावत असतात. मात्र अनिरुद्ध काही ऐकायचं नाव घेत नाही. हेही वाचा - नारकर जोडपं रॉक्स! ऐश्वर्या आणि अविनाश नारकरांचा ट्रेंडिंग गाण्यावर कडक डान्स
इकडे केळकरांकडे आलेल्या इशाला अनिश आणि इतर सगळे समजावण्याचा प्रयत्न करत असतात. त्याचप्रमाणे इशाची समजून घालण्यासाठी संजना आणि अनघा केळकरांच्या घरी जातात. तिथे अरुंधती संजना सांगत असते, इशाला लग्न हा फक्त सोहळा वाटतोय. उद्या असं व्हायला नको की आपण घाई घाईने यांचं लग्न लावून दिलं आणि नंतर त्याचा पश्चाताप झाला. अरुंधतीचं हे बोलणं इशा ऐकते. आई देखील माझ्या आणि अनिशच्या लग्नाला तयार नाहीये असं म्हणून इशा चिडते. तिच्या तरूणपणी तिला जे हवं होतं ते तिला मिळालं नाही आज ते मला मिळतंय हे पाहून तिच्या पोटात दुखतंय. तुला सुखाचा संसार करता आला नाही म्हणून माझा संसार सुरू होण्याच्या आधीच उधळून लावू नकोस. तू तुझ्या वाटेने जा मी माझ्या वाटेनं जाऊ देत, असं म्हणून अरुंधतीला दुखावते.
इशा केळकरांकडे आहे म्हणजे ती कोणतंही टोकाचं पाऊल उचलणार नाही असं सर्वांना वाटत असतं मात्र दुसऱ्याच दिवशी सकाळी अनिश आणि इशा देवळात जाऊन लग्न करतात. लग्न करून दोघे देशमुखांच्या घरी जातात. पण अनिरुद्ध त्यांना घरात घेत नाही. आजपासून इशाला वडील नाहीयेत असं समजा. तू आणि आशुतोष इशाचे आई-वडील व्हा, असं म्हणत अनिरुद्ध लेकीला घरातून बाहेर काढतो.