मुंबई, 10 मार्च : टेलिव्हिजन विश्वात सध्या आई कुठे काय करते ही मालिका ट्रेंडमध्ये आहे. मालिकेत अरुंधतीचं आशुतोषबरोबर लग्न झालं आहे. दोघांच्या लग्नाची धामधूम पाहायला मिळतेय. हळू हळू का होईना अखेर सगळेच अरुंधतीच्या लग्नाला तयार झाले आणि एकदाचं दोघांचं लग्न थाटामाटात लागलं. मालिकेतील लग्न असलं की अभिनेत्री चा लग्नातील लुक कसा असणार? ती कोणती साडी नेसणार? तिची हेअर स्टाइल कशी असणार? असे अनेक प्रश्न मालिका पाहणाऱ्या प्रेक्षकांना पडलेले असतात. त्यातही एक गोष्ट तरी हल्ली उत्सुकतेची असते ती म्हणजे उखाणा. सोशल मीडियावर नवरीच्या उखाण्यांची वेगळीच क्रेझ आहे. अनेक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात. अरुंधतीनं लग्नात घेतलेल्या उखाण्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. एका मुलाखतीत तिनं उखाणा घेतला. ती म्हणतेय, “लावली छोटी चंद्रकोर माथी, हात देते आशुतोषच्या हाती”. त्यानंतर आणखी एक उखाणा समोर आला ज्यात ती म्हणतेय, “लग्नासाठी लावल्या मी मोत्याच्या मुंडावळ्या, माझ्या आशुतोषला पडतात दोन दोन खळ्या”. हेही वाचा - Aai Kuthe Kay Karte : ‘हे व्हावं की नाही…?’ अरुंधतीच्या लग्नाबद्दल पहिल्यांदाच व्यक्त झाली अभिनेत्री मधुराणी अरुंधतीचे हे भन्नाट उखाणे सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले. प्रेक्षकांनी या उखाण्याचं कौतुक देखील केलं. व्हिडीओंना चांगली पसंती मिळतेय. अनेकांनी हे उखाणे कॉपी देखील केलेत. पण सोशल मीडियावर एखादी गोष्ट व्हायरल होऊ लागली की त्याचे झक्कास मिम्स बनवायचे असा नवा ट्रेंड आता सोशल मीडियावर पाहायला मिळतो. अरुंधतीच्या उखाण्याचे देखील धम्माल मिम्स सोशल मीडियावर व्हायरल झालेत.
आशुतोषसाठी उखाणा घेणाऱ्या आरुंधतीचा एका मुलाखतीत फोटो एडिट करण्यात आलाय. त्याखाली “अनिरुद्ध सोबत संसार करून झाला होता डोक्याला ताप, माझ्या नादी लागून आशुतोष झाला लग्नाआधीच बाप”, असा उखाणा लिहिला आहे. या मिमच्या खाली नेटकऱ्यांनी निशाणा साधत दणकून कमेंट्स केल्या आहेत. “बाप नाही आजोबा”, असं म्हणत चांगलीच खिल्ली उडवली आहे.
मालिकेला कितीही ट्रोल करत असले तरी आईच्या दुसऱ्या लग्नासारखा संवेदनशील विषय मालिकेत उत्तमरित्या हाताळण्यात आला आहे. मालिकेत जरी अरुंधतीनं दुसऱ्या लग्नाचा निर्णय घेतला असला तरी यासाठी तिला अनेक संकटांना तोंड द्याव लागलं. विशेष म्हणजे या मालिकेच्या प्रोमोमध्येही काही प्रेक्षक अरुंधतीच्या दुसऱ्या लग्नावर नाराज दिसतात. पण एक गोष्ट छान म्हणायला हवी, या सगळ्या विरोधाल झुगारून मालिकेच्या निर्माता, लेखन यांनी अरुंधतीचं दुसरं लग्न लावून एक चांगला निर्णय घेतला आहे.