जम्मू, 28 जानेवारी : जम्मू आणि काश्मीरमधल्या एका व्हिलेज डेव्हलपमेंट कमिटीच्या (व्हीडीसी) सदस्य असलेल्या व्यक्तीच्या हातून चुकून गोळी लागल्याने त्याचा पत्नीचा मृत्यू झाला आहे. ही घटना गुरुवारी (26 जानेवारी) घडली. 'टाइम्स ऑफ इंडिया'ने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास एका महिलेचा पतीच्या हातून गोळी लागून मृत्यू झाला. मृत्यू झालेल्या महिलेचं नाव रुबिना कौसर असून ती 30 वर्षांची होती. विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, महिलेचा पती आपली रायफल स्वच्छ करत असताना त्यातून फायरिंग झालं. रुबिनाचा मृत्यू अपघाती आहे की त्यामागे तिची हत्या करण्यात आली, याचा तपास सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं.
हे ही वाचा : अनैतिक संंबंधातून प्रेमीयुगुलाने उचललं टोकाचं पाऊल, बीडमधील घटनेने खळबळ
"या घटनेची माहिती मिळताच पोलिसांचं एक पथक घटनास्थळी दाखल झालं. सुरनकोटमधल्या अप्पर मुर्राह इथले रहिवासी असलेल्या नाझीर हुसेन यांचा मुलगा आणि महिलेचा पती नस्सर अहमद याला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून व्हीडीसी सदस्याची रायफल जप्त करण्यात आली आहे," अशी माहिती पोलिसांनी दिली.
दरम्यान, चुकून गोळी लागण्याच्या आतापर्यंत अनेक घटना घडलेल्या आहेत. साधारण दोन वर्षांपूर्वी मुंबईमध्ये एका सीआरपीएफ जवानाच्या रायफलमधून चुकून गोळी सुटली होती. या घटनेत या जवानाचा मृत्यू झाला होता. गेल्या वर्षी (2022) अहमदनगर जिल्ह्यातल्या श्रीरामपूरमध्ये बँकेसमोर उभ्या असलेल्या सुरक्षारक्षकाच्या बंदुकीतून चुकून सुटलेली गोळी ग्राहकाला लागली होती.
या घटनेत ग्राहकाचा जागीच मृत्यू झाला होता. याशिवाय, एका तीन वर्षीय मुलाने गोळी झाडून आपल्या आईची हत्या केल्याची धक्कादायक घटना अमेरिकेत शिकागोमध्ये काही महिन्यांपूर्वी घडली होती. हा मुलगा घरात असलेल्या खऱ्याखुऱ्या बंदुकीसोबत खेळत होता. यादरम्यान, त्याच्या हातून चुकून गोळी झाडली गेली आणि त्यात त्याच्या आईचा मृत्यू झाला होता.
हे ही वाचा : 17 वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत पोलिसाचा बालविवाह! इच्छेविरुद्ध शरीरसंबंध अन्.. बीड हादरलं
अशा घटना लक्षात घेता रायफल, बंदूक यांसारखी घातक शस्त्रं बाळगताना, त्यांची स्वच्छता करताना खूप खबरदारी घेतली पाहिजे. घरात शस्त्रं असल्यास ती लहान मुलांपासून दूर ठेवली पाहिजेत. आपणही ती हाताळताना सुरक्षितपणे हाताळली पाहिजेत. अन्यथा अपघात होऊन विनाकारण एखाद्याचा मृत्यू होण्याची शक्यता असते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Gun firing, Jammu and kashmir, Jammu kashmir