नवी दिल्ली : श्रद्धा वालकर हत्याकांडाने संपूर्ण देश हादरला. श्रद्धा वालकर प्रकरण ताजं असतानाच आता आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका बारा वर्षांच्या चिमुकलीवर पाच जणांकडून बलात्कार करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. गेल्या एक वर्षापासून हा सर्व प्रकार सुरू होता. राजस्थानच्या बुंदी जिल्ह्यातील ही घटना आहे. घटना उघड होताच पोलिसांनी संबंधित आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल होताच आरोपी फरार झाले असून, त्यांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पीडितेच्या वडिलांचा मृत्यू
घटनेबाबत अधिक माहिती अशी की पीडित मुलीच्या वडिलांचा मृत्यू झाला आहे. आई मजुरी करून घर चालवते. पीडितेचा भाऊ देखील छोटा आहे. पीडितेच्या या परिस्थितीचा फायदा घेऊन गेल्या वर्षभरापासून पाच आरोपी तिच्यावर अत्याचार करत होते. गुन्हा उघड झाल्यानंतर हे सर्व आरोपी आता फरार झाले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना बुंदी जिल्ह्यातील लाखेरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. या मुलीवर त्याच परिसरात राहणारे 30 ते 40 वर्ष वयाचे आरोपी गेल्या एक वर्षापासून बलात्कार करत होते. यासाठी आरोपींकडून पीडितेला काही गोष्टींचे आमिष देखील दाखवण्यात आले.
'अशी' आली घटना समोर
जेव्हा या घटनेबाबत या गावात राहणाऱ्या इतर लोकांना कळाले तेव्हा त्यांनी लगेच चाईल्ड हेल्प लाईन नंबर 1098 वर फोन करून घटनेची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच संबंधित टीमने या मुलीला विश्वासात घेऊन विचारपूस केली. त्यानंतर या मुलीला बाल कल्याण समितीकडे सोपवण्यात आले. काऊंसलिंगच्या वेळी पाच जणांनी आपल्यावर बलात्कार केल्याची माहिती या मुलीने दिली आहे. पीडितेची आपबीत ऐकूण बाल कल्याण समितींच्या सदस्यांना देखील धक्का बसला आहे.
गुन्हा दाखल होताच आरोपी फरार
कुटुंबीयांची आरोपींच्या विरोधात तक्रार दाखल करण्याची इच्छा होती. मात्र आरोपीच्या दबावामुळे ते तक्रार दाखल करत नसल्याचं पीडितेच्या कुटुंबीयांशी केलेल्या संवादातून बाल कल्याण समितीच्या लक्षात आलं. नतंर या प्रकरणात बाल कल्याण समितीकडूनच तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी तक्रारीनंतर गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल होताच आरोपी फरार झाले. फरार आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.