अलिगड, 12 मार्च : उत्तर प्रदेशमधील अलिगडमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. लेसबियन रिलेशनशीप असणाऱ्या एका महिलेने तिच्या गर्लफ्रेंडच्या मदतीने पतीचाच खून केला. गुरुवारी पोलिसांनी हे प्रकरण उघडकीस आणत आरोपी पत्नी आणि तिच्या मैत्रिणीला अटक केली आहे.
भाडेकरू महिलेशी होते संबंध
बुधवारी थाना गांधी पार्क परिसरातील कुंवर नगरात एका व्यक्तीची हत्या झाली होती. या प्रकरणात पोलिसांनी मृतकाच्या पत्नीची चौकशी केली असता महिलेने गुन्ह्याची कबुली दिली. चौकशीत आरोपी महिलेने जे सांगितले ते अत्यंत धक्कादायक होते. मृतकाच्या पत्नीचे त्याठिकाणी भाड्याने राहणाऱ्या एका महिलेशी समलैंगिक संबंध होते. त्याबाबत नवऱ्याला समजल्यानंतर त्याने या संबंधांना विरोध केला.
(हे वाचा- महिलेची करुण कहाणी! बकरी विकून घरी आणावं लागलं नवऱ्याचं शव)
त्यातूनच या दोघींनी ऐन होळीच्या रात्रीच या इसमाला मारण्याचा कट रचला. होळीच्या रात्री म्हणजेच 11 मार्चला त्याचा खून केला. सिटी एसपी अभिषेक कुमार यांनी ही संपूर्ण घटना उघडकीस आणली आहे.
पतीचा मृतदेह नाल्यात सापडला
अलीगढच्या थाना गांधी पार्क परिसरातील होळीच्या रात्री एका व्यक्तीचा मृतदेह सापडला होता. हात पाय दोरीने बांधलेल्या अवस्थेत तो मृतदेह एका नाल्यात सापडला. त्या इसमाचा मृत्यू गळा आवळल्यामुळे झाल्याचं शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट झालं आहे. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला. तपासात मृताचे नाव भूरीसिंग गोस्वामी हे समोर आले.
(हे वाचा-सॉफ्टवेअर इंजिनीअर पतीला दिला धोका, दागिन्यांसह लाखो रुपये घेऊन पत्नी फरार)
पोलिसांनी पत्नी रुबीची चौकशी केली असता तिने सांगितले की, ‘माझा नवरा होळीसाठी पैशांची तजवीज करण्यासाठी बाहेर गेला होता. पण तो घरी परतला नाही.' पोलीस या उत्तरावर समाधानी नव्हते म्हणून त्यांनी अधिक चौकशी केली आणि त्यातून समोर आलेलं सत्य अत्यंत धक्कादायक होतं.
महिनाभरापूर्वीच लिहिलेली होती खुनाची कहाणी
मृतक भूरीसिंगची पत्नी रुबीच्या घरी राहत असलेल्या रजनीबरोबर तिचे समलैंगिक संबंध होते. दोन्ही आरोपी महिलांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून खुनासाठी वापरलेली दोरी आणि टेप जप्त केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भूरीसिंग यांना जेव्हा या दोन महिलांच्या समलैंगिक संबंधांची माहिती मिळाली तेव्हा त्यांनी या गोष्टीला विरोध केला. ज्यामुळे मृतकाच्या पत्नीने आणि तिच्या मैत्रिणीने त्यांच्या खुनाचा कट रचला. होळीच्या रात्रीच त्यांनी मद्यधुंद अवस्थेतील भूरिसिंगला गाठलं आणि त्याचा खून केला. त्यांनी भूरीसिंगच्या भावाच्या घराजवळच त्यांचा मृतदेह फेकला, जेणेकरून त्याच्या भावावरच संशय घेण्यात आला असता. यानंतर मृतकाच्या भावाने त्याची वहिनी रुबी, भाडेकरू हरिओम आणि त्याची पत्नी रजनी यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. सखोल तपास केल्यानंतर पोलिसांसमोर सत्यपरिस्थिती आली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Aligarh, Uttarpradesh news