उत्तर प्रदेश, 17 डिसेंबर : आपण सध्या एकविसाव्या शतकात वावरत आहोत. विज्ञानाच्या मदतीने विविध क्षेत्रांमध्ये आपण मोठी प्रगती केली आहे. तरीही काही व्यक्ती अंधश्रद्धा, जादूटोणा यांसारख्या गोष्टींच्या विळख्यात अद्याप अडकलेल्या आहेत. आजही अनेकांचा अशा गोष्टींवर विश्वास आहे. याच अंध विश्वासापायी एका तरुणाला आपला जीव गमवावा लागला आहे. तंत्र-मंत्राच्या जादूने पुन्हा जिवंत होण्यासाठी, एका व्यक्तीने स्वत:चीच हत्या करवून घेतली आहे. उत्तर प्रदेशातल्या गंगा-यमुना-सरस्वतीच्या संगमावरच्या प्रयागराज शहरामध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. मृत तरुणाचा असा विश्वास होता, की देवी त्याला पुन्हा जिवंत देईल आणि त्याला अधिक सामर्थ्यवान बनवेल. हे प्रकरण समोर आल्यानंतर तरुणाचा खून करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. 'आज तक'ने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
10 डिसेंबर रोजी कारछना पोलीस ठाण्याच्या हद्दीतल्या गाढीगाव परिसरात महामार्गाच्या कडेला 37 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळला होता. या मृतदेहाचं डोकं धडापासून वेगळं केलेलं होतं. मृतदेह मिळाल्याची माहिती गावात आगीसारखी पसरली. पोलिसांनी आपल्या खबऱ्यांच्या साह्याने या प्रकरणाचा गुंता सोडवला आहे. खुनाच्या घटनेमागची सत्य परिस्थिती समोर आल्यानंतर पोलीसही चक्रावले आहेत. पोलीस पथकाने आरोपी नितीश सैनी याला हरिद्वारमधून अटक केली आहे.
हे ही वाचा : डॉक्टर पत्नीची हत्या करून 300 किमी प्रवास, मृतदेहाची विल्हेवाट लावली पण…
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत आशिष दीक्षित (37 वर्षं) हा हरिद्वारमध्ये गंगास्नानादरम्यान नितीश सैनी याला सहा महिन्यांपूर्वी भेटला होता. नितीश हा अतिशय सामान्य कुटुंबातला आहे. त्याला त्याच्या चांगल्या भविष्याची आणि कुटुंबाची काळजी होती. आशिषने उपासना आणि दैवी शक्तींच्या माध्यमातून चांगलं भविष्य प्राप्त करून देण्याचं आश्वासन नितीशला दिलं. आशिषच्या बोलण्यामुळे नितीश खूप प्रभावित झाला. आशिषचे पूजा-पाठ आणि तंत्र-मंत्र पाहून आता आपलं भविष्य सुधारेल अशी आशा नितीशच्या मनात निर्माण झाली होती.
समोर आलेल्या माहितीनुसार, आशिष नितीशला सतत यू-ट्यूबवर महाभारतातल्या ऋषींच्या कथा दाखवत असे. मान कापल्यानंतरही दैवी शक्तीने माणूस जिवंत झाल्याचं त्यात दाखवण्यात आलं होतं.
आशिष आणि नितीश हरिद्वारमध्ये भाड्याची खोली घेऊन एकत्र राहत होते. एवढंच नाही, तर आशिषने आपली खासगी नोकरीदेखील सोडली होती. दैवी शक्तींमुळे एक दिवस आपली परिस्थिती सुधारेल असा त्याला पूर्ण विश्वास होता. नितीशचा सर्व खर्च आशिष करत होता. अनेक वेळा घरच्यांनी संतापून याला विरोधही केला होता; मात्र दोघांनीही त्याकडे दुर्लक्ष केलं. 8 डिसेंबर रोजी नितीश आणि आशिष विंध्यवासिनीच्या दर्शनासाठी हरिद्वारहून प्रयागराजला आले होते.
दर्शन घेतल्यानंतर आशिषने सिद्धी मिळवण्यासाठी स्वत:ला मारण्याची गळ नितीशला घातली. जिवंत झाल्यावर दैवी शक्ती प्राप्त करून नितीशचं जीवन बदलून टाकण्याचं आश्वासनही त्याने दिलं.
हे ही वाचा : नागपुरातील महिलेचे अनैतिक संबंध, मुलाने आईच्या प्रियकरासोबत केलं धक्कादायक कांड
आशिष नितीशला म्हणाला होता, "मी पूजा करून झोपेन. त्यानंतर माझ्या शरीराची हालचाल बंद झाल्यानंतर तीक्ष्ण शस्त्राने माझी मान कापून टाक. कपाळावर रक्त लावून अभिषेक कर. मंत्रोच्चार करून शस्त्र आणि पूजेचं इतर साहित्य गंगेच्या तीरावर पुरुन टाक. यानंतर प्रयागराज रेल्वे स्टेशनवर जा. मी तिथे तासाभरात पोहोचेन. मी तिथे पोहोचलो नाहीस तर तू तिथून निघून जा. कामाख्या देवीजवळ जिवंत होऊन दर्शन घेतल्यानंतर मी तुला हरिद्वारमध्ये पुन्हा भेटेन."
अटक केलेला आरोपी नितीश याने पोलिसांना सांगितलं की, आशिष आधी दारू प्यायला आणि त्याने एक औषध घेतलं. त्यानंतर तो आपलं जॅकेट आणि टी-शर्ट काढून झोपला. काही वेळात त्याच्या शरीराची हालचाल बंद झाली. त्यानंतर नितीशने त्याचं डोकं धडापासून वेगळं केलं. त्यानंतर रेल्वे स्टेशनवर तासभर वाट पाहिल्यानंतरही आशिष त्या ठिकाणी न पोहोचल्याने तो हरिद्वारला परत गेला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Up crime news, Uttar pardesh, Uttar pradesh, Uttar pradesh news