चेन्नई 10 एप्रिल : पैशांचा मोह (Money) हा जगातील अनेक गुन्ह्यांचे उगम आहे. हा मोह वाढला की माणूस विचार करण्याची शक्ती गमावून बसतो. ‘वाट्टेल त्या मार्गानं’ पैसा मिळवण्याच्या हव्यासानं त्याच्या हातून गुन्हेगारी कृत्य घडतं. 57 वर्षांच्या महिलेनंही याच मोहासाठी भयंकर कृत्य केलं. तिनं 3.5 कोटींच्या विम्याची रक्कम मिळावी म्हणून स्वत:च्या 62 वर्षांच्या पतीला जिवंत जाळलं. हे प्रकरण उघडकीस येताच पोलिसांनी या महिलेला तिच्या साथीदारासह अटक केली आहे. काय आहे प्रकरण? तामिळनाडूच्या (Tamil Nadu) इरोडमधील ही धक्कादायक घटना आहे. रंगराज असं या प्रकरणात मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. ते यंत्रमाग (Power loom) कंपनीचे मालक होते. त्यांचा 13 मार्च रोजी अपघात झाला होता. त्यामुळे त्यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. यावेळी त्यांची पत्नी जोथिमनी (वय 57) आणि त्यांचा नातेवाईक राजा (वय 51) हे त्यांची देखभाल करत होते. रंगराज यांना गुरुवारी हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला. मात्र ते चालू शकत नव्हते. त्यामुळे जोथिमनी आणि राजा हे त्यांना कारमध्ये घेऊन हॉस्पिटलच्या बाहेर पडले. राजा कार चालवत होता. तिरुपूर जिल्ह्यातील वालसुपालयम या गावात कार पोहचताच राजानं कार थांबली. राजा आणि जोथिमनी कारच्या बाहेर पडले आणि त्यांनी पेट्रोल टाकून कारला आग लावली. आवाज बाहेर आलाच नाही! कारला आग लावताच रंगराज ओरडू लागले, पण कारच्या काचा बंद असल्यानं त्यांचा आवाज बाहेर आला नाही. त्यांना चालता येत नसल्यानं ते बाहेर देखील पडू शकत नव्हते. काही वेळातच कार आणि रंगराज हे दोघंही जळून खाक झाले. शुक्रवारी सकाळी राजानं तिरुपूर पोलीस स्टेशनमध्ये कार जळाल्याची सूचना दिली. त्यांनी ही हत्या म्हणजे अपघात असल्याचा दावा केला. कसा लागला शोध? या प्रकरणात पोलिसांनी जोथिमनी आणि राजा यांची जबानी घेतली त्यावेळी त्यामध्ये त्यांना विसंगती आढळली. त्यानंतर या रस्त्यावरील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी तपासलं. त्यावेळी एका पेट्रोल पंपामधून राजा पेट्रोलचं कॅन घेऊन येत असलेल्या आढळला. त्यानंतर पोलिसांनी आणखी कठोरपणे तपासणी करताच दोघांनी त्यांचा गुन्हा कबूल केला. ( दीरावर प्रेम जडल्यानंतर पतीचा काढला काटा, कोरोनामुळे मृत्यू झाल्याचा केला बनाव ) रंगराज यांचा साडेतीन कोटींच्या विम्याची रक्कम मिळवण्यासाठी ही हत्या केल्याची कबुली जोथिमनीनं दिली. या योजनेत तिनं राजालाही सहभागी करुन घेतलं. रंगराज यांनी दीड कोटींचं कर्ज घेतलं होतं. हे कर्ज देणारी मंडळी जोथिमनीला त्रास देत होते. त्यामुळे तिनं हे टोकाचं पाऊल उचललं. राजाला दीड लाख रुपये देण्याचं आश्वासन जोथिमनीनं दिलं होतं. या कामासाठी त्याला 50,000 रुपयांची रक्कम आगोदरच देण्यात आली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.