सूरत, 3 जुलै : गुजरातच्या सुरतमधून एक अडीच वर्षीय मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसांना मिळाली. चिमुकल्याची आई नयना मंडावी हिने पोलिसांत मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. गुन्हा दाखल झाल्यानंतर सलग तीन दिवस मुलाचा शोध घेतला गेला, मात्र मुलगा कुठेच सापडला नाही. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला असता, ती महिला म्हणजे बेपत्ता मुलाची आईच संशयाच्या भोवऱ्यात अडकली. त्यानंतर पोलिसांनी केलेल्या चौकशीत जी माहिती समोर आली, ती वाचून तुम्हीही हैराण व्हाल. या संदर्भातलं वृत्त ‘आज तक’ने दिलं आहे. मुलगा बेपत्ता झाल्याच्या या घटनेची सुरुवात 27 जून 2023 रोजी झाली होती. सुरतच्या डिंडोली भागात एका कन्स्ट्रक्शन साइटवर मजुरी करणारी नयना मंडावी ही आपला अडीच वर्षांचा मुलगा वीर मंडावी बेपत्ता असल्याची तक्रार घेऊन पोलीस ठाण्यात गेली. त्यानंतर पोलिसांनी त्वरित अपहरणासह इतर बाजूंनी तपास सुरू केला. तपासाअंती जे समोर आलं त्याने पोलिसांनाही धक्का बसला. नेमकं प्रकरण काय आहे, ते जाणून घेऊया.
27 जूनला महिलेने पोलिसांना दिली तक्रार. सूरतचे पोलीस उपायुक्त भागीरथ गढवी यांनी दिलेल्या माहितीनुसार, 27 जून रोजी नयना मंडावी आपला अडीच वर्षांचा मुलगा हरवल्याची तक्रार घेऊन दिंडोली पोलीस ठाण्यात आली होती. पोलिसांनी बेपत्ता झाल्याची नोंद करून मुलाचा शोध सुरू केला होता, मात्र मुलगा सापडला नाही. त्यानंतर पोलिसांना तक्रारदार महिलेवरच संशय आला. त्यांनी तिची कडक चौकशी केली आणि तिने गुन्ह्याची कबुली दिली. सीसीटीव्ही तपासले; मुलगा दिसला नाही. पोलिसांनी महिला काम करत असलेल्या कंस्ट्रक्शन साइटच्या भोवती बसवलेले सीसीटीव्ही कॅमेरे तपासण्यास सुरुवात केली. सीसीटीव्हीमध्ये मुलगा कुठेही घटनास्थळाच्या बाहेर जाताना दिसला नाही. त्यामुळे मुलगा तिथून बाहेर गेला नसल्याचं निश्चित झालं. पोलीस महिलेला तिच्या मुलाबाबत अनेक प्रश्न विचारत होते, मात्र ती कोणतंही समाधानकारक उत्तर देत नव्हती. बेपत्ता मुलाचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी श्वानपथकाचीही मदत घेतली. श्वानपथकही बांधकामाच्या जागेच्या बाहेर गेलं नाही. म्हणजेच तो मुलगा साइटच्या बाहेर पडला नाही, हे पोलिसांच्या लक्षात आलं. Sharad Pawar : तुम्हाला काय मेसेज आलाय का? अजितदादांच्या प्रश्नावर शरद पवारांचा पत्रकारालाच सवाल महिलेने प्रियकरावर केले आरोप. दरम्यान, बेपत्ता मुलाच्या आईने पोलिसांना सांगितलं की, तिचा प्रियकर झारखंडमध्ये आहे. त्याने मुलाचं अपहरण केलं असावं, असा संशय तिने व्यक्त केला. त्यानंतर पोलिसांनी तिच्या प्रियकराशी संपर्क साधला, त्याचं लोकेशन ट्रेस केलं, मात्र त्याचं लोकेशन सूरतजवळ कुठेही ट्रेस झालं नाही. तो सूरतला आला नसल्याचं स्पष्ट झालं. त्यामुळे महिला खोटं बोलतेय हे पोलिसांच्या लक्षात आलं. महिलेने दिली गुन्ह्याची कबुली. आता पोलिसांसमोर सर्वांत मोठं आव्हान हे होतं की, तो मुलगा कन्स्ट्रक्शन साइटवरून बाहेर गेला नाही, त्याचं कोणी अपहरण केलं नाही, मग तो गेला कुठे? हे शोधण्याचं. त्यासाठी पोलिसांनी तक्रार करणाऱ्या महिलेचीच कडक चौकशी सुरू केली, तेव्हा महिलेने आपणच आपल्या मुलाची हत्या केल्याची कबुली दिली. हत्येनंतर मृतदेह कुठे लपवून ठेवलाय, असं विचारलं असता तिने खड्ड्यात पुरल्याचं सांगितलं. मृतदेहाच्या ठिकाणाबाबतही दिशाभूल करत राहिली महिला. महिलेने सांगितलेल्या ठिकाणी पोलिसांनी जेसीबीने खोदकाम केलं परंतु मृतदेह सापडला नाही. त्यानंतर महिलेने मृतदेह तलावात फेकल्याचं सांगितलं. त्यावरून पोलिसांनी तलावातही शोधमोहीम राबवली, मात्र तिथेही मृतदेह सापडला नाही. त्यानंतर पोलिसांनी तिची कडक चौकशी केली असता, तिने कन्स्ट्रक्शन साइटवर शौचालयासाठी केलेल्या खड्ड्यात मृतदेह टाकल्याचं सांगितलं. मग पोलीस महिलेला घेऊन तिथे पोहोचले आणि मुलाचा मृतदेह सापडला. मुलाचा खून का केला? महिलेने सांगितलं धक्कादायक कारण. महिलेला आपल्या मुलाची हत्या करून मृतदेह लपवण्याचं कारण विचारलं असता तिने सांगितलं की, ती मूळची झारखंडची आहे. झारखंडमध्ये तिचा प्रियकर आहे. त्याने तिला सांगितलं की जर ती तिच्या मुलाला घेऊन त्याच्याकडे आली तर तो तिला स्वीकारणार नाही. मात्र मुलाला आणलं नाही तर तो तिला स्वीकारेल. प्रियकराचं ऐकून नयना मंडावी या क्रूर महिलेने पोटच्या मुलाची हत्या केली. ती पकडली जाऊ नये म्हणून हत्येनंतर मृतदेह कुठे लपवायचा यासाठी तिने ‘दृश्यम’ चित्रपट पाहिला, अनेक क्राईम एपिसोड्स पाहिले आणि स्वतःच स्वतःच्या मुलाच्या हत्येचा कट रचला. पोलीसही चक्रावले. दृश्यम चित्रपटात हत्येनंतर मृतदेहाची अशी विल्हेवाट लावली जाते की खूनाच्या गुन्ह्यात कोणालाही अटक होत नाही. आपल्या लेकाला ठार मारणाऱ्या नयना मंडावी हिनेदेखील या चित्रपटात दाखवल्याप्रमाणेच केलं. ‘दृश्यम’प्रमाणे मृतदेहाची विल्हेवाट लावल्यास पोलिसांना थांगपत्ताही लागणार नाही आणि ती झारखंडमध्ये प्रियकराकडे जाईल, असं तिला वाटलं होतं. मात्र पोलिसांची दृष्टी सर्वसामान्य नसते, ते कल्पनेच्या पलिकडचं जग पाहू शकतात, हे ती विसरली होती. अखेर पोलिसांनी तिच्या मुसक्या आवळल्या आहेत.