नवी दिल्ली 02 डिसेंबर : श्रद्धाच्या हत्येतील आरोपी आफताबची पॉलीग्राफ चाचणी झाल्यानंतर आता नार्को टेस्टही पूर्ण झाली आहे. मात्र यातूनही पोलिसांच्या हाती काही विशेष लागलेलं नाही. आफताबने नार्को टेस्टमध्ये नवीन काहीही उघड केलेलं नाही. तो आतापर्यंत पोलिसांना जे काही सांगत होता, तेच त्याने नार्को टेस्टमध्ये सांगितलं. याचा अर्थ स्पष्ट आहे की, आता पोलिसांना या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी अधिक मेहनत घ्यावी लागणार आहे, कारण आफताबने त्यांना कोणताही नवीन सुगावा दिलेला नाही.
आता नार्को टेस्टनंतर श्रद्धाला न्याय कधी मिळणार हा सर्वात मोठा प्रश्न आहे. नार्को टेस्टमधून मिळालेल्या माहितीच्या आधारे न्यायालयासमोर पोलीस किती सक्षम पुरावे सादर करतात, यावरही हे अवलंबून राहणार आहे. शुक्रवारी आफताबचा 'पोस्ट नार्को टेस्ट इंटरव्ह्यू' होणार आहे. ही टेस्ट दिल्लीतील तिहार तुरुंगातच होणार आहे. यातून काही नवीन गोष्टी हाती लागतील, अशी अपेक्षा पोलिसांना आहे. ही टेस्ट सकाळी १० वाजता होणार आहे.
नार्को टेस्टमध्ये आफताबची कबुली, श्रद्धाचा मोबाईल अन् कपड्यांबाबत दिली महत्त्वाची माहिती
'पोस्ट नार्को टेस्ट इंटरव्ह्यू'साठी, एफएसएलचे 4 अधिकारी आणि श्रद्धा खून प्रकरणाचा तपास करणारे तपास अधिकारी आफताबकडे तिहार तुरुंगात जातील. यामध्ये आफताबचे समुपदेशन करण्यात येणार आहे. दुसरीकडे, तज्ज्ञांचे समाधान न झाल्यास आफताबची पुन्हा एकदा चाचणी होऊ शकते. आफताबवरील हल्ल्यानंतर तो आता उच्च जोखमीच्या कैद्यांच्या श्रेणीत आला आहे. त्यामुळे कारागृहात त्याच्या सुरक्षेसाठी कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
श्रद्धा हत्याकांडात आफताबची गुरुवारी नार्को टेस्ट करण्यात आली. त्याने हत्येची कबुली दिल्याचा दावा केला जात आहे. नार्को टेस्टदरम्यान आफताबला श्रद्धाचा फोन कुठे आहे असे विचारले असता, आफताबने श्रद्धाचा फोन कुठेतरी फेकल्याचे उत्तर दिले. आफताबने रागाच्या भरात श्रद्धाची हत्या केल्याची कबुली दिली. पोलीस अद्याप या प्रकरणात कट रचला गेल्याचा अँगल शोधत आहेत.
आफताबची नार्को टेस्ट फेल झाल्यास पोलिसांकडे B प्लॅन रेडी; पुढची चाचणी अत्याधुनिक
नार्को टेस्टमध्ये आफताबने करवतीचा वापर करून श्रद्धाच्या शरीराचे तुकडे केल्याची कबुली दिली आहे. आफताबला या खून प्रकरणात आणखी कोणाचा हात आहे का, असे विचारले असता, त्याने एकट्याने ही हत्या घडवून आणल्याचे सांगितले. नार्को टेस्टमध्ये आफताबने श्रद्धाच्या मृतदेहाची जंगलात विल्हेवाट लावण्याचा मुद्दा मान्य केला आहे.
आफताब पोलिसांसमोर आपला गुन्हा कबूल करत आहे. पण हे पुरेसे नाही. पोलिसांकडे अद्याप ठोस पुरावे नाहीत. नार्को चाचणीचं बाब न्यायालयात थेट मान्य होत नाही. आफताबने दिलेल्या माहितीच्या आधारे पोलीस फक्त पुरावे गोळा करण्याचा प्रयत्न करणार आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.