नवी दिल्ली 19 नोव्हेंबर : श्रद्धा वालकर खून प्रकरणात पोलिसांना मोठं यश मिळालं आहे. दिल्ली पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तपास पथकाने 18 ऑक्टोबर रोजी महरौली येथील आरोपी आफताब अमीन पूनावालाच्या भाड्याच्या घराजवळ बसवलेल्या सीसीटीव्हीचे काही फुटेज जप्त केले आहेत. या सीसीटीव्ही फुटेजमध्ये आफताब हातात काही सामान घेऊन तीनदा घरातून बाहेर पडताना दिसत आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी त्याच्याकडे याबाबत विचारपूस केली असता आफताबने सांगितलं की, 18 ऑक्टोबर रोजी फ्रीजमध्ये ठेवलेल्या श्रद्धाच्या मृतदेहाचे काही तुकडे त्याने फेकले होते. आफताबने पोलिसांसमोर दिलेल्या जबानीनुसार, श्रद्धाची हत्या केल्यानंतर त्याने तिच्या मृतदेहाचे ३५ तुकडे केले आणि फ्रीजमध्ये ठेवले. मृतदेहाचे तुकडे हळूहळू काळ्या पॉलिथिनमध्ये टाकून तो जंगलात फेकून देत असे.
आफताबच्या महरौली येथील घरातून बाहेर पडल्यानंतर सुमारे 400 ते 500 मीटर अंतरावर रस्ता आहे. अरावली डोंगराच्या जंगलाचा काही भाग रस्त्याच्या कडेला येतो. दिल्लीमार्गे गुरुग्राम आणि राजस्थानपर्यंत जंगलाचा हा भाग शेकडो किलोमीटरवर पसरलेला आहे. आफताबने पोलिसांना सांगितलं की, मे महिन्यातच श्रद्धाच्या मृतदेहाचे काही तुकडे निर्जन जंगलात फेकले होते.
तर त्याने डोके, धड आणि हात-पायांची बोटे फ्रीजमध्ये ठेवली होती आणि योग्य वेळ पाहून नंतर फेकून देण्याचा प्लॅन केला होता. दरम्यान, त्याला गुरुग्राममधील कॉल सेंटरमध्ये नोकरी मिळाली. तो ड्युटीसाठी नाईट शिफ्टला जायचा, सकाळी ड्युटीवरून परतल्यावर झोपायचा. दुपारी तो उठला की त्याचे काही मित्र किंवा मेत्रिणी यायचे. त्यामुळे श्रद्धाच्या मृतदेहाचे उरलेले तुकडे तो फेकून देऊ शकला नाही.
श्रद्धा वालकर खून प्रकरणार येणार चित्रपट, या दिग्दर्शकाने केली घोषणा
आफताबच्या म्हणण्यानुसार, गेल्या ऑक्टोबरमध्ये मृतदेहाचे उरलेले तुकडेही फेकून द्यावेत, असे लक्षात येताच तो 18 ऑक्टोबरला म्हणजेच हत्येनंतर 5 महिन्यांनी जंगलात गेला. उरलेले सर्व तुकडे आरोपीनी एकाच दिवसात फेकून दिले होते. म्हणूनच त्याने 18 ऑक्टोबर रोजी दुपारी 4:30 ते 7:30 या वेळेत घरातून जंगलात 3 फेऱ्या मारल्या आणि ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली, ज्यामध्ये तो प्रत्येक वेळी काहीतरी घेऊन जाताना दिसत आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही ताब्यात घेतले आहेत.
दिल्ली पोलीस सध्या या प्रकरणाच्या तपास आणि सीसीटीव्ही फुटेजशी संबंधित कोणताही अधिकृत खुलासा करत नाहीत. कारण या प्रकरणातील अधिक पुरावे शोधण्यासाठी पोलीस दिल्ली ते मुंबई, हिमाचल, गुरुग्राम आणि डेहराडून असा प्रवास करत आहेत. न्यायालयात आरोपीविरुद्ध केवळ वक्तव्ये करून चालणार नाही, तर ठोस पुरावे सादर करावे लागतील. लवकरच दिल्ली पोलीस या प्रकरणी सबळ पुराव्यासह अधिकृत वक्तव्य जारी करू शकतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Murder