नवी दिल्ली 18 नोव्हेंबर : काही दिवसांपूर्वी दिल्लीमध्ये एक भयानक हत्याकांड उघडकीस आलं आहे. आफताब पूनावाला नावाच्या व्यक्तीनं आपली लिव्ह-इन पार्टनर श्रद्धा वालकर हिची निर्घृण हत्या करून तिच्या मृतदेहाचे 35 तुकडे केल्याची भयानक घटना समोर आली आहे. श्रद्धाच्या हत्या प्रकरणातील आरोपी आफताब अमीन पूनावाला याची कसून चौकशी सुरू आहे. श्रद्धाची हत्या केल्यानंतर आफताबनं तिच्या मृतदेहाचे तुकडे करून वेगवेगळ्या ठिकाणी फेकले होते. पोलीस मृतदेहाचे तुकडे शोधण्यासाठी जंगलात फिरत आहेत. आत्तापर्यंत मृतदेहाचे 13 तुकडे सापडले आहेत. मात्र, अजूनही अत्यंत महत्त्वाचे पुरावे पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. पोलिसांना श्रद्धाचं डोकं आणि मोबाईल सापडलेला नाही. याशिवाय, ज्या शस्त्रानं श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे करण्यात आले तेही अद्याप सापडलेलं नाही. आरोपी आफताबनं गर्लफ्रेंड श्रद्धाची हत्या केल्याची कबुली तर दिली आहे. मात्र, तोच खुनी असल्याचं सिद्ध करणं, हे पोलिसांसमोर मोठं आव्हान आहे. या साठी काही व्यक्ती पोलिसांना मदत करू शकतात. ‘आज तक’नं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे. आफताब वारंवार आपला जबाब बदलत असून, तपासात सहकार्य करत नसल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. त्यामुळे त्याची नार्को टेस्ट करण्यासाठी पोलिसांनी न्यायालयात अर्जही केला आहे. या दरम्यान, अशा काही व्यक्ती आहेत ज्यांची साक्ष आफताबला गुन्हेगार सिद्ध करू शकते. पोलीस या व्यक्तींवर मोठ्या प्रमाणात विसंबून राहू शकतात. श्रद्धा वालकर खून प्रकरणार येणार चित्रपट, या दिग्दर्शकाने केली घोषणा व्यक्ती क्रमांक 1: सुदीप सचदेव सुदीप सचदेव हे त्याच दुकानाचे मालक आहेत ज्या दुकानातून आफताबनं श्रद्धाला मारण्यासाठी हत्यार खरेदी केलं होतं. ओळख पटवण्यासाठी पोलीस आफताबला घेऊन पुन्हा सचदेव यांच्या दुकानात गेले होते. सचदेव यांनी त्याची ओळख पटवली आहे. त्यांनी सांगितलं की, पोलीस आफताबला घेऊन दुकानात आले तेव्हा त्याच्या डोळ्यात अजिबात पश्चाताप दिसत नव्हता. व्यक्ती क्रमांक 2: तिलक राज श्रद्धाची हत्या केल्यानंतर आफताबनं तिच्या मृतदेहाचे तुकडे ठेवण्यासाठी 300 लिटर क्षमतेचा एक नवीन फ्रीज विकत घेतला होता. हा फ्रीज तिलक राज यांच्या दुकानातून विकत घेतला होता. तिलक राज यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, आफताबने 25 हजार 300 रुपये किमतीचा फ्रीज विकत घेतला होता. पोलीस आफताबसोबत दुकानात आले तेव्हा तो अतिशय शांत दिसत होता.
व्यक्ती क्रमांक 3: डॉक्टर अनिल कुमार 18 मे रोजी आफताबनं श्रद्धाची हत्या करून तिच्या मृतदेहाचे तुकडे केले. आफताबनं करवतीने तिच्या शरीराचे तुकडे केले होते. हे करत असताना त्याचाही हात कापला गेला होता. हातावार उपचार घेण्यासाठी तो डॉक्टर अनिल कुमार यांच्याकडे गेला होता. डॉक्टरांनी त्याची ओळख पटवली आहे. डॉक्टर अनिल कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, तो उपचार घेण्यासाठी आला तेव्हा अतिशय सामान्य वाटत होता. फळं चिरताना हाताला जखम झाल्याचं त्यानं सांगितलं होतं. व्यक्ती क्रमांक 4: रजत शुक्ला रजत शुक्ला हा श्रद्धाचा मित्र आहे. रजतनं दिलेल्या माहितीनुसार, श्रद्धाने 2019 मध्ये त्याला तिच्या रिलेशनशिपबद्दल सांगितलं होतं. ती 2018 पासून आफताबसोबत रिलेशनशिपमध्ये होती. ते एकत्र राहत असत. सुरुवातीला दोघेही आनंदाने राहत होते. पण, नंतर श्रद्धाने सांगितलं होतं की आफताब तिला मारहाण करायचा. तिला रिलेशनशिपमधून बाहेर पडायचं होतं पण, हे तिच्यासाठी कठीण ठरत होतं. रजतनं सांगितलं की, श्रद्धा अतिशय कठीण परिस्थितीमध्ये होती. दिल्लीला शिफ्ट झाल्यानंतर दोघांचा संपर्कही कमी झाला होता. व्यक्ती क्रमांक 5: लक्ष्मण नादिर श्रद्धाचा आणखी एक मित्र लक्ष्मण नादिरनं सांगितलं, “मी जुलैमध्ये तिच्याशी शेवटचं बोललो होतो. ऑगस्ट महिन्यानंतर श्रद्धानं मेसेजला रिप्लाय देणं बंद केलं होतं. तिचा फोनही बंद होता. काहीतरी गडबड असल्याची जाणीव मला झाली. मला तिच्याबद्दल कोणतेही अपडेट मिळाले नाही, तेव्हा मी तिच्या भावाला याची माहिती दिली. त्यांनी पोलिसांकडे जाण्याचा निर्णय घेतला. लक्ष्मणनं सांगितलं की, श्रद्धा आणि आफताबमध्ये अनेकदा भांडण व्हायचं. एकदा भांडण इतकं वाढलं होतं की लक्ष्मणनं तिला पोलिसांकडे जाण्याचा सल्ला दिला होता. एका रात्री श्रद्धाने तिला येथून दुसरीकडे कुठेतरी घेऊन जाण्याचा मेसेज लक्ष्मणला केला होता. ती इथे राहिली तर आफताब तिला मारून टाकेल, असं ती म्हणाली होती. लक्ष्मण तिच्या घरी गेला होता आणि पोलिसांकडे जाण्याची धमकी आफताबला दिली. पण, श्रद्धानं तसं करण्यास नकार दिला होता. घरातील पाण्याच्या बिलामुळेच आला आफताबवर संशय अन् बारमध्ये जाताच भांडाफोड, श्रद्धा हत्याकांडाचा असा झाला खुलासा पाण्याचं बिल ठरू शकतं उपयुक्त दिल्ली सरकार प्रत्येक घराला 20 हजार लिटरपर्यंत मोफत पाणी देतं. आफताबकडे पाणी बिलाची 300 रुपये थकबाकी आहे. म्हणजेच तो दर महिन्याला 20 हजार लिटरहून अधिक पाणी वापरत होता. वृत्तसंस्थेने सूत्रांच्या हवाल्यानं दिलेल्या माहितीनुसार, श्रद्धाची हत्या केल्यानंतर आफताब रक्त स्वच्छ करण्यासाठी पाण्याचा वापर करत होता. त्यामुळे त्याचं पाणी बिल वाढलं. आफताब रोज पाण्याची टाकी चेक करायचा, असंही शेजाऱ्यांनी पोलिसांना सांगितलं आहे. आता दिल्ली पोलीस हे थकित पाणी बिल आफताबविरोधात पुरावा म्हणून सादर करण्याच्या तयारीत आहेत. कट करून श्रद्धाची हत्या झाली आहे का? आफताब आणि श्रद्धा दोघांचंही एकमेकांवर प्रेम होतं, असं म्हटलं जात आहे. दोघेही मुंबईत भेटले होते. ते मुंबईतील एकाच कॉल सेंटरमध्ये काम करत होते. ते एकमेकांच्या प्रेमात पडले होते. पण, श्रद्धाच्या कुटुंबीयांचा या नात्याला विरोध होता. त्यामुळे दोघेही दिल्लीत आले आणि मेहरोली भागात भाड्याने फ्लॅट घेऊन लिव्ह-इनमध्ये राहू लागले. या वर्षी (2022) 18 मे रोजी दोघांमध्ये भांडण झालं आणि आफताबनं श्रद्धाची हत्या केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हत्येनंतर आफताबनं श्रद्धाच्या मृतदेहाचे 35 तुकडे केले. पकडला जाऊ नये म्हणून ते तुकडे वेगवेगळ्या ठिकाणी फेकले. श्रद्धाची हत्या फक्त भांडणामुळे झाली की त्यासाठी कट रचला होता, याबाबतही पोलीस तपास करत आहेत. दिल्लीला शिफ्ट होण्यापूर्वी श्रद्धा आणि आफताब हिमाचल प्रदेशात फिरण्यासाठी गेले होते, असं पोलिसांचं म्हणणं आहे. तिथे त्यांची दिल्लीतील छतरपूर येथील रहिवासी असलेल्या एका व्यक्तीशी भेट झाली होता. समोर आलेल्या माहितीनुसार, दिल्लीत आल्यानंतर श्रद्धा आणि आफताब हिमाचल प्रदेशात ज्या व्यक्तीला भेटले होते त्याच व्यक्तीच्या फ्लॅटमध्ये काही दिवस राहिले होते. काही दिवसांनी दोघांनी भाड्यानं फ्लॅट घेतला. दोघांचं लग्न झालेलं नाही हे घरमालकाला माहीत होतं. भाडे करारातही आफताबने आधी श्रद्धाचं आणि नंतर स्वतःचं नाव लिहिलं होतं. या घराचे भाडे नऊ हजार रुपये असून आफताब दर महिन्याला आठ ते दहा तारखेदरम्यान ऑनलाइन पद्धतीनं भरत असे. त्यामुळे घरमालकही कधी प्रत्यक्ष येत नसे. 18 मे रोजी श्रद्धाची हत्या झाली होती. त्याच्या काही दिवसांपूर्वीच आफताबनं हा फ्लॅट भाड्यानं घेतला होता. त्यामुळे आफताबने फार पूर्वीच श्रद्धाच्या हत्येचा कट रचला असावा, अशी शंका व्यक्त होत आहे.