संतोष कुमार गुप्ता, प्रतिनिधी छपरा, 10 जुलै : बोलण्यापूर्वी विचार करावा, कोणतीही कृती करण्यापूर्वी विचार करावा, असं तज्ज्ञमंडळी वारंवार सांगत असतात. मात्र याचा कोणी अवलंब करत नाही, परिणामी रक्ताच्या नात्यांमधूनही जीवघेण्या घटना समोर येतात. बिहारच्या सारण जिल्ह्यातून नवऱ्याची खंजीर खुपसून हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेतील मृत व्यक्तीचं नाव आलमगीर अन्सारी (वय - 45 वर्ष) असं असून तो बेदवलिया गावचा रहिवासी होता. कौटुंबिक वादातून त्याची हत्या झाली असून याप्रकरणी त्याची पहिली पत्नी सलमा खातून आणि दुसरी पत्नी अमीना खातून या दोघींनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
आलमगीरचा भाऊ वसीम अन्सारी याने दिलेल्या माहितीनुसार, ‘आलमगीरच्या पहिल्या पत्नीला दोन मुलं आहेत. तो दोन्ही पत्नी आणि मुलांसह एकाच घरात राहत होता. कशावरून माहीत नाही पण दोन्ही बायकांचं आलमगीरशी जोरदार भांडण झालं होतं. हा वाद एवढा टोकाला गेला की, दोघींनी घरातला खंजीर घेऊन आलमगीरच्या छातीत भोसकला. या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला. त्यानंतर दोन्ही बायका भानावर आल्या रक्त पाहून घाबरल्या, त्यांनी त्याला जवळच्या आरोग्य केंद्रात नेलं, मात्र त्याची परिस्थिती अत्यंत नाजूक होती त्यामुळे डॉक्टरांनी त्याला पीएमसीएच रुगालयात नेण्यास सांगितलं. दुर्दैवाने पीएमसीएचच्या वाटेवरच आलमगीरचा मृत्यू झाला.’ News18 Mega UCC Poll: 82 टक्के मुस्लीम महिलांना हवा संपत्तीत समान हक्क, पहिल्यांदाच सर्व्हेतून समोर आली मोठी बाब याबाबत पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी तातडीने सर्व गावकऱ्यांशी चर्चा केली. त्यांनतर आलमगीरचा मृतदेह सदर रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कडाक्याचं भांडण झाल्यानंतर एका पत्नीने आलमगीरला घट्ट पकडून ठेवलं आणि दुसऱ्या पत्नीने त्याच्या छातीत खंजिराने सपासप वार केले. दरम्यान, या दोन्ही बायकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून प्राथमिक तपासातून दोन लग्नांवरून वाद झाल्याचं कळलं आहे.