सांगली, 17 ऑगस्ट : सांगली जिल्हा एका प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाच्या मृत्यूच्या घटनेनं हादरला आहे. एखाद्या गुन्हेगारी विश्वाशी संबंधित चित्रपटासारखीच घटना सांगलीत गेल्या काही दिवसांमध्ये घडली आहे. सांगलीतील 54 वर्षीय प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आणि कंत्राटदार माणिकराव पाटील यांचं 13 ऑगस्टच्या रात्री अपहरण झाल्याची माहिती समोर आली होती. आरोपींनी प्लॉट दाखवण्याच्या बहाण्याने माणिकराव पाटील यांना बोलावलं होतं. त्यानुसार माणिकराव आरोपींनी सांगितलेल्या ठिकाणी गेले. पण त्यानंतर ते घरी परतलेच नाही. गेल्या चार दिवसांपासून त्यांचा शोध सुरु होता. अखेर तीन दिवसांनी त्यांची गाडी कोडिग्रीजवळ बेवारस स्थितीत सापडली होती. त्यानंतर आज कवठेपरान येथे वारणा नदीपात्रात माणिकराव यांचा संशयास्पदरित्या मृतदेह आढळला आहे. त्यामुळे त्यांच्या अपहरण आणि मृत्यूचं गूढ वाढलं आहे. माणिकराव यांच्या कुटुंबियांनी घातपातचा संशय वर्तवला आहे. पोलीस याप्रकरणी तपास करत आहेत. माणिकराव हे सांगली शहरातील राम मंदिर जवळ सिव्हिल हॉस्पिटल रोडवर इंद्रनील प्लाजा येथे राहत होते. त्यांना काही लोकांनी जमीन दाखवण्याच्या बहाण्याने मिरज तालुक्यातील तुंगू येथे बोलावलं होतं. पण त्यानंतर माणिकराव पाटील गायब झाल्याचं समोर आलं होतं. माणिकराव 13 ऑगस्टला रात्री उशिरापर्यंत घरी आले नाही म्हणून त्यांच्या कुटुंबियांनी त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली. पण कित्येक तास शोध घेवूनही त्यांचा तपास लागत नव्हता. अखेर माणिकरावांचा मुलगा विक्रमसिंह पाटील याने ग्रामीण पोलीस ठाण्यात धाव घेत वडील गायब असल्याची तक्रार दिली. ( युट्यूबर पत्रकाराने तरुणीची केली हत्या, whats app ग्रुपवर सांगितलं खून केला, औरंगाबाद हादरलं ) माणिकराव गायब झाल्याची तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी प्रकरणाला गांभीर्याने घेतलं. पोलिसांनी याप्रकरणी ठिकठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासायला सुरुवात केली. या सीसीटीव्हीच्या आधारावर पोलिसांना महत्त्वाची माहिती मिळाली होती. माणिकराव यांची गाडी तुंगू येथून बाहेर पडल्याचं सीसीटीव्हीत दिसली होती. त्यानंतर कोल्हापूरच्या जयसिंगपूरच्या दिशेने गेली होती. तिथूनही ती गाडी बाहेर पडताना सीसीटीव्हीत दिसली होती. अखेर कोडिग्रीजवळ बेवारस स्थितीत गाडी सापडली होती. पण माणिकराव यांचा तरी थांगपत्ता लागलेला नव्हता. त्यामुळे त्यांच्या अपहरणामागील गूढ वाढलं होतं. पोलीस सर्वोतोपरी तपास करत होते. या दरम्यान, आज सांगली जिल्ह्यातील कवठेपरान येथील वारणा नदीमध्ये मृतदेह आढळल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलीस घटनास्थळी गेले. मृतदेहाला पाण्यातून बाहेर काढलं. त्यानंतर घटनास्थळाचा पंचनामा केला. पोलिसांनी तपास केला असता संबंधित मृतदेह हा माणिकराव यांचा असल्याचं उघड झालं. त्यामुळे सांगली जिल्ह्यात एकच खळबळ उडाली. आरोपींनी माणिकराव यांच्यासोबत नेमकं काय केलं? त्यांनी त्यांचं अपहरण का केलं? त्यानंतर चार दिवसांनी माणिकराव यांचा अशाप्रकारे संशयितरित्या मृतदेह का सापडला? हे सर्व प्रश्न निरुत्तर राहिले आहेत. विशेष म्हणजे पोलीसही याप्रकरणी चक्रावले आहेत. आरोपींचा शोध घ्यायचा तरी कसा? असा प्रश्न पोलिसांपुढे आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी विशेष पथक आरोपींच्या शोधासाठी रवाना केले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.