बारामती: बारामतीमधून धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रेमविवाह करणाऱ्या तरुणीच्या आईने आणि भावाने प्रियकराच्या भावावर जीवघेणा हल्ला केला आहे. या हल्ल्यात प्रियकराचा भाऊ गंभीर जखमी झाला असून, त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. बारामतीच्या माळेगाव कॉलनी लक्ष्मी नगर परिसरातून ही घटना समोर आली आहे. या प्रकरणात पोलिसांनी मुलीची आई व भावाला अटक केली आहे. त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. सुनिता संजय चव्हाण वय 46 वर्ष व मयूर संजय चव्हाण वय 22 वर्ष असे या प्रकरणातील आरोपींची नाव आहेत.
लग्नाला घरच्यांचा विरोध
घटनेबाबत अधिक माहिती अशी की माळेगाव कॉलनी लक्ष्मी नगर परिसरात राहणाऱ्या तरुणीचे तिच्याच घराच्या शेजारी राहणाऱ्या तरुणासोबत प्रेमसंबंध जुळले. मात्र लग्नाला दोन्ही कुटुंबीयांकडून विरोध असल्यानं अखेर त्यांनी पळून जाऊन लग्न केलं. मात्र ते दोघे घरातून पळून गेल्यानंतर मुलीची आई सुनिता चव्हाण आणि भाऊ मयूर चव्हाण हे प्रियकराच्या घरी जाऊन त्याचा भाऊ विकास राजेंद्र वाबळे वय 27 वर्ष आणि आईवडिलांना त्रास देऊ लागले, दमदाटी करू लागले. मुलाला घरी बोलून घ्या असं ते वारंवार म्हणून लागले. मात्र मुलाच्या नातेवाईकांना मुलगा कुठे गेला हे माहित नसल्यानं ते हतबल होते. तसेच त्यांनी भीतीमुळे तक्रार देखील दाखल केली नाही.
हेही वाचा : अनैतिक संबंध अन् पतीचा The End; मृतदेहाचे तुकडे तुकडे करून ठेवले फ्रीजमध्ये
दगडाने हल्ला
त्यानंतर 25 नोव्हेंबर रोजी सायंकाळी भाऊ मयूर चव्हाण व त्याची आई सुनिता चव्हाण हे पुन्हा आपल्या मुलीच्या प्रियकराच्या घरी गेले. मुलाला आमच्यासमोर हजर करा म्हणून दमदाटी करू लागले. याचवेळी मयूर चव्हाण याने प्रियकराचा भाऊ विकास वाबळे याच्या डोक्यात दगडाने हल्ला केला. या घटनेत विकास गंभीर जखमी झाला. त्याला बेशुद्ध अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
हेही वाचा : स्पेशल लेन्स, मायक्रो चिप, QR कोड; जुगाऱ्यांच्या हायटेक तंत्रज्ञानाने पोलीसही अचंबित
आरोपींना अटक
दरम्यान या प्रकरणात पोलिसांनी आरोपी सुनिता चव्हाण व मुलीचा भाऊ मयूर चव्हाण यांना अटक केली आहे. त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. घटनेनंतर संबंधीत तरुण, तरुणी पोलीस स्टेशनला हजर झाले असून, त्यांनाही पोलीस संरक्षण देण्यात आलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Pune crime