भोपाळ, 22 सप्टेंबर : ‘शक्तीमान’ ही मालिका खूप प्रसिद्ध आहे. लहान मुलांना ही मालिका खूप आवडायची. या मालिकेतील गंगाधर हाच शक्तीमान होता. गंगाधर हा वेंधळ्यासारखं वागायचा. त्यामुळे तो शक्तीमान असेल, असा विचार कुणाच्या मनातच आला नव्हता. पण अर्थात गंगाधर हा संकटात सापडलेल्यांना मदत करण्यासाठी शक्तीमानचं रुप धारण करायचा. हा शक्तीमान चांगल्या गोष्टी करायचा. या मालिकेपासून गंगाधरच शक्तिमान निघाला, अशी म्हण प्रचलित झाली. त्यानंतर लोक आपल्या सोयीनुसार या म्हणीचा उल्लेख करतात. मध्यप्रदेशच्या मंडीदीप इथे देखील अशाच प्रकारची घटना समोर आली आहे. एका तरुणाने आठ लाखांचं कर्ज फेडण्यासाठी दहा लाखांचं बँकेकडून कर्ज घेतलं. पण ते पैसे स्वत:च्या हातून लुटण्याचा बनाव रचला. त्याने पोलिसात स्वत:हून तक्रार करत आरोपींना पकडण्याची मागणी केली. याप्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलिसांनी तब्बल 800 सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. पण या प्रकरणाचा छडा लागला तेव्हा पोलीसही चक्रावली. गंगाधरच शक्तीमान होता, हे पोलिसांच्या लक्षात आलं. मध्यप्रदेशच्या मंडीदीप येथे वास्तव्यास असणारा तरुण शिवम मीणा याने पोलिसात आपले 10 लाख रुपये लुटले गेल्याची तक्रार केली होती. पोलिसांनी घटनेचं गांभीर्य ओळखत तातडीने गुन्हा दाखल करत तपासाला सुरुवात केली होती. बाईकवर आलेल्या दोघांनी आपल्या डोळ्यांमध्ये मिर्ची पूड टाकली आणि हातातली पैशांची बॅग घेवून पलायन केलं, असं शिवमने आपल्या फिर्यादीत म्हटलं होतं. पोलिसांनी शिवमने सांगितलेल्या माहितीच्या आधारावर घटनास्थळाची पाहणी केली. त्या भागातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याची पाहणी केली. यावेळी त्या परिसरातून दोन आरोपी बॅग घेवून जाताना दिसले. पोलिसांनी त्या आरोपींना पकडण्यासाठी शोध मोहिम राबवली. यासाठी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले. या तपासात पोलिसांनी तब्बल 800 सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. पोलिसांनी मंडीदीप पासून भोपाळ पर्यंत रुट मार्च तयार केला. आरोपी पैसे घेवून पळाले तेव्हा त्यांनी ठिकठिकाणी कपड बदलले. पण दुचाकी तीच होती. त्यामुळे बाईकच्या रंगावरुन पोलिसांनी आरोपींना बेड्या ठोकल्या. ( डॉक्टरने लिव्ह इन पार्टनर अन् आईचे खासगी फोटो केले व्हायरल, प्रेयसीने विषयच संपवला! ) पोलिसांनी दोन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या तेव्हा त्यांनी आपला गुन्हा कबूल केला. तसेच आपण हा सर्व चोरीचा बनाव फिर्यादी शिवमच्या सांगण्यावरुन केल्याचा खुलासा केला. हे ऐकून पोलिसांना धक्काच बसला. पोलिसांनी आरोपींची कसून चौकशी केली असता त्यांनी सर्व प्रकार सांगितला. शिवमनेच आपल्याला डोळ्यात मिर्ची पूड टाकून पैसे चोरुन नेण्यास सांगितले होते. तसेच कुणाला शंका येऊ नये म्हणून दुसऱ्या मित्रांच्या बँक खात्यात ते पैसे टाकले होते, अशी कबुली आरोपींनी दिली. पोलिसांनी शिवम मीणाची चौकशी केली असता त्याने आपला गुन्हा कबूल केला. ऑनलाईन गेमिंग खेळल्यामुळे आपण कर्जबाजारी झालो होतो. अनेकांकडून उसने पैसे घेतले होते. लोकांचे पैसे परत करण्याच्या हेतून बँकेकडून कर्ज घेतलं होतं. पण त्यानंतर आपण पैशांच्या लुटीचं नाटक रचलं, असं शिवमने कबूल केलं. पोलिसांनी या प्रकरणी शिवमला बेड्या ठोकल्या आहेत. तसेच बाईक, मिर्ची पूड आणि मोबाईलची जप्त केला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.