ठाणे, 29 जुलै : ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ शहरात आज दिवसा ढवळ्या भर रस्त्यावर दोन गटात मोठा गदारोळ झाला. विशेष म्हणजे भर दिवसा रहदारीच्या ठिकाणी गोळीबार करण्यात आला. गोळीबारानंतर हाणामारीदेखील झाली. या सगळ्या हाणामारीचा प्रकार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात अतिशय अचूकपणे कैद झाला आहे. अतिशय थरारक अशी ही घटना आहे. संबंधित घटनेचा सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यानंतर काळजाचा थरकाप उडू शकतो, इतकी भयानकी ही घटना आहे. त्यामुळे ज्या परिसरात ही घटना घडलीय त्या परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. विशेष म्हणजे भर दिवसा एवढी भयानक घटना घडली, त्यामुळे भर रस्त्यात अशाप्रकारे हैदोस घालणाऱ्या गुन्हेगारांना पोलिसांचं भय राहिलेलं नाही का? असा प्रश्न उपस्थित होतोय. नेमकं काय घडलं? अंबरनाथच्या छत्रपती शिवाजीनगर परिसरात आज काही हल्लेखोरांनी गोळीबार केला. या गोळीबारात तुषार गुंजाळ नावाच्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. गोळीबार केल्यानंतर झालेल्या झटापटीत पिस्तूलचे मॅगझीन, जिवंत काडतून रस्त्यावर पडली होती. दुपारच्या सुमारास तुषार आणि गणेश हे दोघे भाऊ शिवाजीनगर शाखेसमोरील मुख्य रस्त्याच्या शेजारी बोलत उभे होते. यावेळी कारमधून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी दोघांच्या दिशेने गोळीबार केला. हल्लेखोर इतक्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी गोळीबार केल्यानंतर हत्यारांनी सचिन आणि तुषारवर वार देखील केले. यानंतर हल्लेखोर कारमध्ये बसून पसार झाले. ( कॉलेजने आखला विद्यार्थ्यांसह रायरेश्वरावर ट्रेकिंगचा प्लान; रस्त्यातच 17 वर्षीय शुभमचा हार्ट अटॅकने दुर्देवी मृत्यू ) दरम्यान हल्ल्यातील जखमी दोघांवर अंबरनाथच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र उपचारा दरम्यान तुषारचा मृत्यू झाला. गोळीबाराची माहिती मिळताच अंबरनाथ शिवाजीनगर पोलिसांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला. पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केलाय. हल्लेखोरांच्या शोधासाठी विविध पथक तयार करण्यात आले आहेत. पोलीस हल्लेखोरांचा शोध घेत आहेत.
VIDEO : अंबरनाथमध्ये भर दिवसा रहदारीच्या रस्त्यावर राडा, गोळीबार-मारहाण सीसीटीव्हीत कैद, थरारक घटना #ambernath #crime #firing pic.twitter.com/A5dqUEbb93
— News18Lokmat (@News18lokmat) July 29, 2022
15 दिवसांपूर्वी अंबरनाथमध्ये 1 कोटींचा सशस्त्र दरोडा पडला होता. त्याचे आरोपी अजून सापडले नसतांना ही दुसरी मोठी घटना घडल्याने नागरिक मोठ्या दहशतीत आहेत. दरम्यान कालच या दोन्ही गटांमध्ये मोठे वाद झाले होते. यात गुंजाळ गटाने दुसऱ्या गटाची कार फोडली होती. मात्र हा वाद मध्यस्ती करून मिटवण्यात आला होता. त्यानंतर व्हिडिओ कॉल करून तुम्हाला धडा शिकवू असे समोरच्या गटाने धमकी दिली होती. त्यानंतर आज पुन्हा शिवाजीनगर भागात दोन्ही गटात वाद झाले. लाठ्या काठ्यानी एकमेकांमध्ये जोरदार हाणामारी झाली आणि त्यानंतर गोळीबार करून तुषारची हत्या करण्यात आली.