जाहिरात
मराठी बातम्या / क्राईम / तब्बल 24 वर्षांनी उलगडलं एका खुनाचं गूढ...पोलिसांनी हुशारीने शोधून काढला खुनी

तब्बल 24 वर्षांनी उलगडलं एका खुनाचं गूढ...पोलिसांनी हुशारीने शोधून काढला खुनी

अटक

अटक

आपण खुनाच्या अनेक घटना ऐकतो; पण काही घटना अशा असतात, की त्यांचं गूढ उकलताना पोलीसही चक्रावून जातात.

  • -MIN READ Trending Desk Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    नवी दिल्ली, 12 नोव्हेंबर : आपण खुनाच्या अनेक घटना ऐकतो; पण काही घटना अशा असतात, की त्यांचं गूढ उकलताना पोलीसही चक्रावून जातात. आज अशाच एका घटनेबद्दल आपण जाणून घेणार आहोत. ही घटना 4 फेब्रुवारी 1997 रोजी दिल्लीच्या ओखला भागात घडली होती. तब्बल 24 वर्षांनी पोलिसांनी ही मर्डर मिस्ट्री सोडवली. या संदर्भातलं वृत्त आज तकने दिलं आहे. किशनलाल व सुनीता दिल्लीच्या ओखला भागात राहायचे. सुनीता गर्भवती होती. किशनलाल 4 फेब्रुवारी 1997 ला घरातून बाहेर पडला; पण तो परतलाच नाही. नंतर अचानक एकाने घरी येऊन सुनीताला तिच्या पतीची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली आहे, अशी माहिती दिली. या घटनेने सुनीतावर दुःखाचा डोंगर कोसळला. ओखला परिसरातच किशनलालचा खून झाला होता. हत्येची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि आजूबाजूच्या परिस्थितीचा आढावा घेतला. किशनलालचा रक्ताने माखलेला मृतदेह घटनास्थळी पडला होता. त्याच्यावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले होते. ज्या ठिकाणी मृतदेह पडला होता, त्या ठिकाणी जमिनीवर रक्त साचलं होतं. पंचनामा करून पोलिसांनी किशनलालचा मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टेमसाठी पाठवला. पोलिसांनी तिथूनही पुरावे गोळा करण्याचा प्रयत्न केला; मात्र विशेष काही हाती लागलं नाही. हेही वाचा -  ठाण्यात तब्बल 8 कोटींच्या बनावट नोटा जप्त, 2 हजार रुपयांची बंडल पाहून पोलीसही हैराण पोलिसांनी तपास सुरू केला. हत्येपूर्वी किशनलाल कोणाबरोबर होता, त्याचं कुणाशी शत्रुत्व किंवा वाद होता का, कर्जाचं काही प्रकरण होतं का, असे अनेक प्रश्न पोलिसांना पडले होते. तपास करताना पोलिसांनी बऱ्याच जणांना या संदर्भात विचारणा केली. तेव्हा मृत्यूआधी तो रामू या मित्रासोबत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी रामूचा शोध सुरू केला; पण रामू गायब झाला होता, त्याच्याबद्दल कोणतीच माहिती मिळाली नाही. सुनीतादेखील रामूनेच हत्या केल्याचा संशय व्यक्त करते. पुढे सुनीताच्या जबाबाच्या आधारे पोलीस रामूवर लक्ष केंद्रित करतात. त्यानुसार रामूने 4 फेब्रुवारीला एक पार्टी दिली होती आणि किशनलालला बोलावलं होतं, असं पोलिसांना कळतं. किशनलाल तिथे गेला होता, सर्वांनी मनसोक्त खात-पित पार्टी एंजॉय केली होती. तेवढ्यातच अचानक किशनलालच्या हत्येची बातमी समोर येते आणि रामू गायब होतो. त्याच्याबद्दल कोणतीच माहिती मिळत नाही. प्रकरण कोर्टात पोहोचतं खूप शोध घेऊनही रामूबद्दल काहीच माहिती मिळत नाही, प्रकरण कोर्टात पोहोचतं; पण पोलीस रामूबद्दल काहीच माहिती कोर्टात देऊ शकत नाही. नंतर पोलीस या प्रकरणी कोर्टात रिपोर्ट दाखल करतात आणि या हत्याकांडाबद्दल कोणतेच पुरावे सापडत नसल्याचं आणि रामू गायब झाल्याचं सांगतात. त्यानंतर कोर्ट रामूला फरार घोषित करतं आणि त्याचा शोध घेण्याचे आदेश पोलिसांना देतं. पोलीस त्याचा शोध सुरू ठेवतात. याचदरम्यान, किशनलालची बायको पोलीस ठाण्यात फेऱ्या मारत असते. काही दिवसांनी ती एका मुलाला जन्म देते. तसंच आपल्या पतीच्या मारेकऱ्यांना शोधल्याशिवाय शांत बसणार नाही, असं ती ठरवते. शेवटी थकलेली सुनीता हार मानते वेळ निघून जाते, पण रामू पोलिसांच्या हाती लागत नाही, इतर माहितीही मिळत नाही. त्यामुळे कालांतराने पोलिसही या प्रकरणात रस घेणं थांबवतात. काळाच्या ओघात सुनीता थकून जाते आणि ती पोलीस स्टेशनला जाणं थांबवते. आपल्या नशिबात नवऱ्याचा मृत्यू लिहिला होता म्हणून ते घडलं, असं ती स्वतःला समजावते. याच काळात सुनीताचा मुलगा मोठा होत असतो. सुनीता त्याचं पालनपोषण करण्यात व्यग्र होते. मधली अनेक वर्षं यातच जातात. 2021 साल उजाडतं व सुनीताचा मुलगा तोपर्यंत मोठा झालेला असतो. पुन्हा उघडते किशनलाल मर्डरची फाइल 2021मध्ये पोलीस एक टीम बनवतात. जुनी पेंडिंग प्रकरणं शोधून ती सोडवण्यासाठी ती टीम काम करते. या टीमच्या सीनिअर ऑफिसरच्या हाती किशनलाल मर्डर केसची फाइल लागते. पोलीस ती केस रिओपन करण्याचा निर्णय घेतात. पोलीस सुनीताला भेटतात अन् 24 वर्षांनी नव्याने या प्रकरणाचा तपास सुरू होतो आणि पोलीस सर्वांत आधी किशनलालची पत्नी सुनीताला शोधतात. अखेर काही दिवसांनी सुनीता सापडते आणि तिच्याकडून पोलीस या प्रकरणाची सर्व माहिती घेतात. सुनीताच्या दुःखावरची खपली पुन्हा एकदा निघते. सुनीता पोलिसांना सांगते की रामूची कोणतीच माहिती मिळाली नाही; पण त्याचा मित्र टिल्लू याच भागात राहतो. पोलीस लगेच टिल्लूला ताब्यात घेतात आणि चौकशी करतात. आपल्याला काहीच माहीत नसल्याचं टिल्लू सांगतो; मात्र पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर तो किशनलालची हत्या आपण नाही तर रामूने केल्याचं सांगतो. पोलीस त्याला रामूचा पत्ता विचारतात; पण तो काहीच माहीत नसल्याचं सांगतो. अनेक वर्षांपासून आपली त्याच्याशी भेट झालेली नाही, त्यामुळे तो कुठे गेला, कुठे राहतो, याची कल्पना नसल्याचं टिल्लूने सांगितलं. पोलिसांनाही टिल्लू खरं बोलत असल्याची खात्री होते. आरोपीची माहिती तर मिळाली; पण त्याचा ठावठिकाणा कोणालाच माहीत नव्हता. 24 वर्ष जुनं प्रकरण असल्याने याचा तपास करणं सोपं नसेल, याची कल्पना अधिकाऱ्यांना होती. कारण या काळात अनेक अधिकाऱ्यांची या बदली झाली होती. तपास पथकाने हार न मानता तपास आणि सुनीताशी बातचीत सुरू ठेवली. हेही वाचा - अंधश्रद्धेचा कहर! मृत वडिलांना जिवंत करण्यासाठी केलं बाळाचं अपहरण, बळी द्यायला निघालेली महिला, इतक्यात… रामूच्या भावाबद्दल मिळाली माहिती रामूनेच आपल्या पतीला मारल्याची खात्री किशनलालच्या पत्नीला पहिल्या दिवसापासून होती. त्यामुळे ती रामूच्या जवळच्या व्यक्तींवर नातेवाईकांच्या मदतीने सतत नजर ठेवत होती. एके दिवशी सुनीता पोलीस अधिकाऱ्यांना सांगते, की रामू बेपत्ता असला तरी त्याचा एक भाऊ त्याच्या पत्नीसोबत दिल्लीच्या तुघलकाबाद भागात राहतो. ही माहिती मिळताच पोलिसांनी साध्या वेषात त्याच्या भावाच्या घराची टेहळणी केली. पोलीस त्याच्या घरी पोहोचतात तेव्हा रामूच्या आईचा अपघातात मृत्यू झाल्याचं त्यांना कळतं. यामुळे तिथलं वातावरण दुःखाचं असतं. पोलीस विमा अधिकारी बनून पोहोचले या परिस्थितीत पोलिसांनी एक प्लॅन बनवला. त्यांनी रामूच्या आईचं निधन अपघातात झाल्याच्या माहितीचा फायदा घेतला आणि त्याबद्दल माहिती मिळवली. त्यानंतर ते विमा अधिकारी बनून रामूच्या भावाच्या घरी पोहोचले. त्यांनी नुकसानभरपाई देण्याच्या नावाखाली सर्व चौकशी केली. त्याच्या कुटुंबीयांना कोणताच संशय आला नाही. अपघातात मृत्यू झालेल्या आईच्या नावावर विमा होता. त्यामुळे त्याबद्दल आम्हाला थोडी माहिती हवी आहे, असं पोलीस सांगतात. नुकसानभरपाई व विम्याबद्दल कळताच रामूचा भाऊ आणि बायको खूश होऊनमाहिती देण्यास तयार होतात. विमा अधिकारी बनून आलेले पोलीस चौकशी करू लागतात. ते नाव, पतीचे नाव, पत्ता, वय विचारतात. त्यांना संशय येऊ नये म्हणून ते हळू आणि शांतपणे प्रश्न विचारतात. मग ते मृताच्या मुलांबद्दल विचारतात. रामूचा भाऊ सर्व भावा-बहिणींची नावे सांगतो. त्यापैकी एक रामूचं नाव असतं. त्यानंतर त्यांच्या मुलांची नावं आणि सर्वांचे पत्ते अधिकारी विचारतात. रामूचा भाऊ सर्वांचे पत्ते सांगतो. यामध्ये रामूच्या पत्त्याच्या समावेश असतो; पण तो पत्ता दिल्लीचाच असतो, जिथून रामू गायब झाला होता. रामूबद्दल पुरेशी माहिती मिळत नाही रामूचा भाऊ सांगतो, की त्याला रामूबद्दल जवळपास 24 वर्षांपासून काहीच माहिती नाही. पोलिसांनी विश्वास ठेवला आणि त्याच्या शेजारी-पाजारी रामूचा फोटो दाखवून चौकशी केली, जेणेकरून कोणी त्याला भावाकडे येताना पाहिलं असेल तर कळेल. पोलिसांपासून वाचण्यासाठी रामू नातेवाईकांपासून दूर गेल्याचा अंदाज पोलिसांनी बांधला. रामूच्या मुलाबद्दल मिळाली माहिती रामूच्या भावाने सर्वांबद्दल सांगताना रामूच्या मुलाबद्दलही सांगितलं होतं. रामूचा मुलगा लखनौमध्ये राहत असल्याचं त्याने सांगितलं. पोलिसांनी त्याचं पूर्ण नाव आणि पत्ता विचारला होता. त्याचा फायदा झाला. पोलिसांनी सोशल मीडियावर रामूच्या मुलाचा शोध सुरू केला. अखेर पोलिसांना यश येतं आणि त्याचा मुलगा फेसबुकवर सापडतो. दुसरीकडे मृत किशनलालची पत्नी सुनीतादेखील फेसबुकवर सक्रिय होती. पोलिसांनी रामूच्या मुलाची फ्रेंडलिस्ट तपासली. त्यात त्यांना अशोक यादव नावाचा मध्यमवयीन माणूस दिसला. तो कोण आहे, असा प्रश्न पोलिसांना पडला. शेवटी पोलिसांनी लखनौला जाण्याचा निर्णय घेतला. रामूच्या मुलाला सांगितली विम्याची कहाणी प्रकरणाच्या तपासासाठी पोलिसांची एक टीम लखनौला गेली. तिथेही पोलीस विमा अधिकारी बनून रामूच्या मुलाच्या घरी गेले आणि त्याला नुकसानभरपाईबद्दल सांगितलं. कुटुंबात भरपाईवरून वाद होऊ नये, म्हणून तपासासाठी आल्याचं सांगितलं. त्यावर रामूचा मुलगा उत्तरं देण्यास तयार झाला. पोलिसांनी कुटुंबाबद्दल विचारणा केली. तुझे वडील कुठे असल्याचं विचारलं, त्यावर ते लखनौमध्येच राहत असल्याचं त्याने सांगितलं. त्याला वडिलांचं नाव विचारलं, त्यावर त्याने अशोक यादव सांगितलं. हे ऐकताच पोलीस चक्रावले. कारण ते रामूला शोधत होते, पण त्यांना अशोक यादव सापडला. त्यानंतर पोलीस त्याच्याकडून त्याच्या वडिलांचा पत्ता घेतात. हेही वाचा - आईने स्वतःच्या प्रियकरासोबत लावलं पोटच्या अल्पवयीन मुलीचं लग्न, अन्.., पुण्यातील हादरवणारी घटना पोलीस अशोक यादवपर्यंत पोहोचले अशोक यादवला कोणी तरी आपली चौकशी करत असल्याचं समजलं तर तो पळून जाऊ शकतो, अशी भीती पोलिसांना होती. अशा स्थितीत पोलिसांनी त्याच्याबद्दल माहिती मिळवली आणि तो काय करतो हे शोधून काढलं. 16 सप्टेंबर 2021 रोजी अशोक लखनौमध्ये कुठे सापडणार याची पोलिसांना माहिती मिळाली. तो ई-रिक्षा व्यवसायाशी संबंधित असल्याचं कळालं. त्यामुळे पोलिसांनी आपण ई-रिक्षा कंपनीचा अधिकारी असल्याचं दाखवून त्याला निरोप पाठवला की त्यांना एका डीलबद्दल तुला भेटायचं आहे. ई-रिक्षा डीलबद्दल सांगून अशोक यादवशी भेट यानंतर पोलीस रिक्षा कंपनीचे अधिकारी असल्याचे भासवून अशोक यादवला भेटले. त्यांनी त्याला त्याचं नाव विचारलं असता त्याने अशोक यादव सांगितलं. तेव्हा अधिकाऱ्यांनी सांगितलं की आम्ही तुमच्याशी डील करण्यासाठी आलो आहोत. त्यामुळे तुमचं आयडी प्रूफ पाहायचं आहे. त्यावर अशोक यादवने आपलं आधार व इतर सर्व कागदपत्रं दाखवली. सर्वांवर अशोक यादव नाव होतं. त्यामुळे आपण चुकीच्या माणसाकडे आलो आहोत का, असा प्रश्न पोलिसांना पडला. सुनीताला आरोपीची ओळख पटवायला लावली आता काय करावं, असा प्रश्न पोलिसांना पडला होता. अशातच ते मृत किशनलालची पत्नी सुनीताला फोन करून आरोपी सापडल्याचं सांगतात. तसंच आरोपीची ओळख पटवण्यासाठी लखनौला येण्याची विचारणा केली. सुनीताही लगेच लखनौला येण्यासाठी निघाली. सुनीता लखनौला पोहोचली आणि पोलीस तिच्यासमोर अशोक यादवला उभं करतात. सुनीता त्याच्याकडे नीट बघते आणि थोडा वेळ थांबून ती सांगते, की हाच रामू आहे. पुढे सुनीताची शुद्ध हरपते आणि ती खाली कोसळते. अशोक यादवच रामू दिल्ली पोलिसांचं विशेष पथक प्रकरणाचा खुलासा करण्यात यशस्वी होतं. 24 वर्षांपूर्वी खून करणारा मारेकरी पोलिसांसमोर होता. पोलिसांनी त्याला तात्काळ अटक केली. अशोक यादव उर्फ रामूला कदाचित स्वप्नातही वाटलं नसेल, की एके दिवशी तो असा पकडला जाईल. नंतर सर्व औपचारिकता पूर्ण करून पोलिसांचं पथक रामू आणि सुनीताला सोबत घेऊन दिल्लीला परततं. किशनलालच्या हत्येचं कारण काय पोलीस अशोक यादव उर्फ रामूला दिल्लीत चौकशीसाठी नेतात. तिथे त्याला हत्येचं कारण विचारलं जातं. तेव्हा रामू सांगतो की ‘मीच 4 फेब्रुवारी 1997 रोजी किशनलालची हत्या केली होती. आपल्याजवळ पैसे नव्हते आणि पैशांची खूप गरज होती. अशातच किशनलालला पैसे मिळाल्याचं कळलं. त्यामुळे मी एक पार्टी दिली आणि किशनलालला बोलावलं. त्याला दारू पाजली आणि नंतर चाकू भोसकून त्याची हत्या केली. त्याच्या खिशातून पैसे काढले आणि तिथून पळून गेलो.’ रामूने स्वीकारली नवी ओळख फरार असताना रामू इकडे-तिकडे भटकत होता. पोलीस त्याला केव्हाही पकडू शकतात हे त्याला माहीत होतं. त्यामुळे त्याने स्वतःला सर्व नातेवाईकांपासून दूर केलं, दिल्लीकडे जाणंही बंद केलं. मग वेगवेगळे मार्ग बदलून तो लखनौला पोहोचला. तिथे जाऊन त्याने आपली नवी ओळख आणि नाव निर्माण केलं. यानंतर त्याने अशोक यादव या नावाने सर्व सरकारी कागदपत्रं बनवली आणि तो लखनौमध्ये स्थायिक झाला. काही काळाने त्याने पत्नीलाही लखनौला बोलावून घेतलं आणि रामूचा अशोक यादव झाला. … मात्र 24 वर्षांनी पोलिसांनी पुन्हा तपास सुरू केला आणि हार न मानता आरोपीला शोधून काढलं. पोलिसांनी ज्या प्रकारे या हत्या प्रकरणाचं गूढ उकललं, ते खरंच कौतुकास्पद आहे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात