जाहिरात
मराठी बातम्या / क्राईम / डॉक्टर वेळेवर न आल्याने बड्या अधिकाऱ्याचा गेला नाहक बळी? नवी मुंबईतील धक्कादायक घटना

डॉक्टर वेळेवर न आल्याने बड्या अधिकाऱ्याचा गेला नाहक बळी? नवी मुंबईतील धक्कादायक घटना

मुंबई विमानतळावर मोठमोठ्या तस्करांच्या मुसक्या आवळणाऱ्या अधिकाऱ्याचा करुण अंत

मुंबई विमानतळावर मोठमोठ्या तस्करांच्या मुसक्या आवळणाऱ्या अधिकाऱ्याचा करुण अंत

रवी राज हे सीमा शुल्क विभागाचे अधीक्षक होते. त्यांनी अनेकवेळा विमानतळावर अवैध ड्रग्ज, सोने आणि इतर वस्तूंच्या तस्करीविरोधात कारवाई करण्यात महत्त्वाची भूमिका निभावली होती. त्यामुळे त्यांचं डिपार्टमेंटमध्ये चांगलं नाव होतं.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

प्रमोद पाटील, नवी मुंबई, 25 सप्टेंबर : मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमा शुल्क विभागात कर्तव्य बजावणारे अधिकारी रवी राज यांचं निधन झालं आहे. त्यांचं निधन होण्यामागे रुग्णालय प्रशासन असल्याचा आरोप करण्यात येत आहे. रवी राज हे सीमा शुल्क विभागाचे अधीक्षक होते. त्यांनी अनेकवेळा विमानतळावर अवैध ड्रग्ज, सोने आणि इतर वस्तूंच्या तस्करीविरोधात कारवाई करण्यात महत्त्वाची भूमिका निभावली होती. त्यामुळे त्यांचं डिपार्टमेंटमध्ये चांगलं नाव होतं. त्यांच्या निधनानंतर सीमा शुल्क विभागातील अधिकारी वर्गात शोककळा पसरली आहे. 32 वर्षीय रवी राज यांना योग्यवेळी उपचार मिळाला असता तर त्यांचा जीव वाचू शकला असता. पण त्यांना ज्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं त्या रुग्णालयाच्या डॉक्टरांनी केलेल्या निष्काळजपणामुळे त्यांचा बळी गेला, असं रवी राज यांच्या कुटुंबियांचं म्हणणं आहे. रवी राज यांना रात्री तीनच्या सुमारास नवी मुंबईतील कामोठे येथे आपल्या निवासस्थानी छातीत दुखू लागलं होतं. त्यांना त्याचवेळी तातडीने उपचारांसाठी नजीकच्या मेडीसिक्योर रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे असलेल्या डॉक्टरांनी त्यांची तपासणी करून मुख्य डॉक्टरांना फोन केला. मात्र ते डॉक्टर तब्बल दोन तास उशिराने आल्याने रवी राज यांचा मृत्यू झाला असा आरोप करण्यात येतोय. रुग्णालय प्रशासनाकडून या दोन तासांत अनेकवेळा मुख्य डॉक्टरांना संपर्क करण्याचा प्रयत्न करण्यात आला. दरम्याम रवी राज यांची प्रकृती आणखी खालावली. मात्र तरीही तेथील उपस्थित डॉक्टरांनी किंवा ज्यांना संपर्क केला त्या डॉक्टरांनी त्यांना लवकर आणि योग्य उपचारांसाठी इतर ठिकाणी हलवावे, अशाही सूचना केल्या नाहीत. डॉक्टरांच्या या हलगर्जीपणामुळे रवी राज यांचा नाहक बळी गेल्याचा आरोप त्यांच्या पत्नी आणि सोबत असलेल्या सहकाऱ्यांनी केलाय. ( वाशिममध्ये संतापजनक प्रकार, 60 वर्षाच्या वृद्धाचा गतिमंद युवतीवर अत्याचार ) रवी राज यांच्या निधनानंतर तिथे राहणारे त्यांच्या इतर सीमा शुल्क विभागाचे अधिकारी रुग्णालयाबाहेर जमा झाले. त्यांनी रुग्णालय आणि डॉक्टरांवर कारवाई करावी, अशी मागणी केली. परिस्थिती हाताबाहेर जाणार नाही याची दखल घेत कामोठे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. मात्र नातेवाईकांनी सदर घटनेचा पंचनामा करून मृत शरीर ताब्यात घेण्यास नकार दिला. रुग्णालयावर कारवाई होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा नातेवाईकांनी घेतला. अखेर पोलिसांनी रवी राज यांच्या नातेवाईकांना समजावून पार्थिव शवविच्छेदन करण्यासाठी रुग्णालयात पाठविले. तो अहवाल आणि चौकशी करून पुढील कारवाई करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले. दुसरकीडे या घटनेवर रुग्णालय प्रशासन काहीच बोलण्यास तयार नाही. दरम्यान, रुग्णालय प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळेच कर्तव्य दक्ष अधिकाऱ्याचा नाहक जीव गेला, अशी चर्चा संबंधित परिसरात सुरु आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात