शाहजहानपूर, 22 जून : प्रेम की मैत्री? असा पर्याय दिला की, अनेकजण मैत्री निवडतात आणि ती आयुष्यभर प्रामाणिकपणे निभावतात. मात्र असेही काही मित्र असतात जे मित्राच्याच जीवावर उठतात. तर, काहीजण प्रेमाच्या नात्याला काळिमा फासायलाही मागे-पुढे पाहत नाहीत. उत्तर प्रदेशातून अशीच एक जीवघेणी प्रेमकथा समोर आली. ही कथा आहे समलैंगिक संबंध असलेल्या दोन तरुणींची. एकीने दुसरीला मुलगा बनवण्याचं आमिष दाखवून तांत्रिकाच्या मदतीने ठार केलं. यात तिच्या आईचाही हात होता. जाणून घेऊया या हत्येचा थरार. उत्तर प्रदेशच्या शाहजहानपूर जिल्ह्यातील हे प्रकरण. 30 वर्षीय पूनम आपली मैत्रीण 24 वर्षीय प्रीती हिच्या प्रेमात पडली. प्रीतीलाही पूनमविषयी आकर्षण वाटू लागलं. पाहता पाहता दोघी शरीराने जवळ आल्या. त्यांच्यातले शारीरिक संबंध वाढले. दोघींचं छान पटायचं. परंतु पूनमला मुलांसारखं राहायला आवडायचं. एका बाजूला हे प्रेमप्रकरण जोरदार सुरू होतं. तर, दुसऱ्या बाजूला प्रीतीच्या घरचे तिचं लग्न जुळवत होते. मात्र तिचे पूनमसोबतचे प्रेमसंबंध परिसरातही कळले होते. त्यामुळे तिचं लग्न जुळण्यात अडचणी येत होत्या.
मग अखेर प्रीतीने पूनमला आपल्या मार्गातून हटवायचं ठरवलं. आईच्या साथीने तिने एक क्रूर कट रचला. मोहम्मदी भागातील रहिवासी असलेला रामनिवास या मांत्रिकाकडे माय-लेकी पोहोचल्या. हत्येचा कट तयार झाल्यानंतर प्रीतीने पूनमला ‘तुला मुलासारखं राहायला आवडतं ना, मग तू मुलगाच हो. मग आपण कायम सोबत राहू’, असं आमिष दाखवलं. पूनमही तिच्या या आमिषाला भुलली, प्रीतीसोबत तिच्या घरी गेली. तिथे प्रीतीची आई आणि मांत्रिक होता. ‘हे मांत्रिक तुला मुलगा बनवतील’, असं प्रितीने सांगतातच पूनम खुश झाली. दरम्यान, पूनमला मारण्यासाठी प्रीतीच्या आईने मांत्रिकाला दीड लाखांची सुपारी दिली होती. Post Pregnancy Tips : शरीर बेडौल होण्याच्या भीतीने महिलेची आत्महत्या, गर्भधारणेनंतर अशी घ्या स्वतःची काळजी 13 एप्रिलला घरातून निघालेली पूनम घरी परतलीच नाही, म्हणून चिंतेत असलेल्या तिच्या कुटुंबियांनी ती हरवल्याची तक्रार 18 एप्रिलला पोलिसांत दिली. त्यानंतर पोलीस तपासातून पूनमची हत्या झाल्याचं उघडकीस आलं. पूनमचं सर्वात शेवटी प्रीती आणि मांत्रिकाशी बोलणं झालं होतं, हे समोर आल्यानंतर पोलिसांनी रामनिवासला ताब्यात घेतलं. त्याची कसून चौकशी केल्यानंतर त्याने गुन्हा कबूल केला. त्याने सांगितलं, ‘मी पूनमला मुलगा बनवण्याच्या बहाण्याने जंगलात घेऊन गेलो होतो. तिथे तिला नदीकिनारी डोळे मिटून शांत झोपायला सांगितलं. तिने डोळे मिटताच मी हातोड्याने तिचा गळा कापला.’ नराधमाने गुन्हा कबूल करताच पोलिसांनी त्याच्यासह प्रीतीला अटक केली. त्याचबरोबर मांत्रिकाच्या घरातून पूनमचे दागिने, तुटलेला मोबाईल आणि हातोडा जप्त करण्यात आला आहे.