जळगाव, 18 सप्टेंबर : एरंडोल तालुक्यातील उत्राण येथे एक अतिशय भयंकर घटना घडली आहे. मोठ्या भावाने क्षुल्लक कारणावरून लहान्याचा खून केल्याचे उघडकीस आल्यामुळे परिसर हादरला आहे. भातखंडेच्या जवळ गिरणा नदीपात्रात एका इसमाचा मृतदेह आढळून आला होता. हा व्यक्ती तालुक्यातील उत्राण येथील सत्यवान धोंडू महाजन असल्याची ओळख पटली. सुरुवातीला गिरणा नदीत वाहून गेल्याने त्यांचा मृत्यू झाला, असा अंदाज बांधला जात होता. मात्र पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर आली. कारण सत्यवान यांचा मृत्यू गिरणेच्या पाण्यात वाहून गेल्याने झाला नव्हता, तर त्यांचा खून झाल्याची धक्कादायक माहिती तपासात निष्पन्न झाली. पोलिसांनी सखोल तपास केला असता सत्यवान महाजन यांना त्यांचाच मोठा भाऊ आरोपी भगवान धोंडू महाजन याने संपविल्याची माहिती मिळाली. यानंतर त्याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. या संदर्भात पोलिसांनी केलेल्या चौकशीत भगवान महाजन याने घटनाक्रम सांगितला. यानुसार भगवान महाजन आणि सत्यवान महाजन हे दोन्ही भाऊ एरंडोल तालुक्यातील उत्राण येथील रहिवासी होते. दोन्ही एकाच घरात राहत असून त्यांच्यात अनेकदा कुरबुरी होत असत. सत्यवान महाजन यांनी घरातील मोरीत लघुशंका केल्यावरून वाद झाला. यातून संतापलेल्या भगवान याने डोक्यात मुसळी हाणल्याने सत्यवान महाजन यांचा जागीच मृत्यू झाला. भगवानने मृतदेह पलंगाखाली लपवून ठेवला. यानंतर रात्री उशीरा त्याने पोत्यातून मृतदेह नेउन तो गिरणा नदीच्या पात्रात फेकून दिला. ( महाराष्ट्र ATS ची मोठी कारवाई, 15 लाखांचं बक्षीस असलेला नक्षलवादी अखेर जेरबंद ) दुसरीकडे गिरणेत मृतदेह आढळून आल्यानंतर भगवान हा घरातून गायब झाला. त्याने शुक्रवारी उत्राणमधील एकाला फोन करून बोलावत याची माहिती दिली. त्या व्यक्तीने भगवान महाजन याला पोलीस ठाण्यात हजर होण्यास सांगितले. मात्र त्याने तेथून पलायन केले. शेवटी उत्राणच्या पोलीस पाटलांनी पोलिसांच्या मदतीने एरंडोल बस स्थानकावरून भगवान महाजन याला जेरबंद केले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.