अलिबाग, 9 सप्टेंबर : संपूर्ण राज्यात या वर्षी गणेशोत्सव आनंदात साजरा केला गेला. यानंतर आज भक्तिभावाने गणरायाला निरोप दिला जात आहे. यातच एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. गणेश उत्सवासाठी गावी आलेल्या दाम्पत्यामध्ये किरकोळ वाद झाला. मात्र, या किरकोळ कौटुंबिक वादातून पतीने पत्नीच्या डोक्यात थेट गॅसचा सिलेंडर घालून तिची हत्या केली. ही धक्कादायक घटना पेण तालुक्यातील चांदेपट्टीत उघडकीस आली आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण - सुवर्णा संजय दळवी, असे 40 वर्षीय मृत महिलेचे नाव आहे. तर संजय तुकाराम दळवी, असे आरोपी पतीचे नाव आहे. त्याला पेण पोलिसांनीअटक केली आहे. ही धक्कादायक घटना गुरुवारी घडली. रागाच्या भरात त्याने हे भयानक पाऊल उचललं. हे दळवी दाम्पत्य ठाण्यात राहायचे. गणेशोत्सवनिमित्त ते आपल्या मुलांसह पेण तालुक्यातील चांदेपट्टी गावी आले होते. मात्र, गुरुवारी रात्री त्यांच्यात काही कारणावरुन वाद झाला. यानंतर संतापलेल्या संजयने रागाच्या भरात सुवर्णाच्या डोक्यात सिलेंडर घातले. यात ती गंभीर जखमी झाली. यानंतर रक्तबंबाळ झालेल्या सुवर्णा व कुटुंबातील अन्य सदस्यांच्या आरडाओरडयाने शेजारील कल्पेश ठाकूर आणि महेश भिकावले तिथे आले. यानंतर त्यांनी सुवर्णला पेण येथील उपजिल्हा रुग्णालयात नेले. मात्र, डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषित केले. हेही वाचा - जालन्यामध्ये रिअल लाईफ ‘ishqiya’, सिलिंडरला केला बॉम्ब आणि नवऱ्याला उडवलं तर या वादाचे कारण काय होते, ते अजून स्पष्ट झालेले नाही. या घटनेनंतर आरोपी पती संजय दळवीला अटक करण्यात आली आहे. तसेच त्याच्यावर गुन्हाही दाखल झाला आहे. पोलीस याप्रकरणी पुढील तपास करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.