नांदेड, 11 मे: जुन्या भांडणाचा राग मनात धरून मित्रानेच मित्राचा काटा (Murdered by friend) काढल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील एका मित्राने आपल्या अन्य मित्रांच्या मदतीनं एका युवकाची दोरीने गळा आवळून हत्या केली आहे. ही घटना 9 मे रोजी नांदेड जिल्ह्यातील असर्जन येथे घडली आहे. याप्रकरणी नांदेड ग्रामीण पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असून दोन आरोपी मित्रांना ताब्यात घेतलं आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिसांकडून केला जात आहे.
हरमितसिंग रेखासिंग पुजारी असं या 20 वर्षीय मृत तरुणाचं नाव आहे. विष्णुपुरी येथील काळेश्वर परिसरात राहणाऱ्या मृत हरमितसिंग याचा काही दिवसांपूर्वी त्याच्या मित्रासोबत वाद झाला होता. याच वादाचा राग डोक्यात ठेवून त्याच्या मित्राने हरमितसिंगची दोरीनं गळा आवळून हत्या केली आहे. 9 मे रोजी रात्री त्याचा मित्र आकाश वसंतराव जाधव आणि कृष्णा पांडू आगलावे यांनी मृत हरमितसिंगला असर्जन शिवारातील एस. पी. बियंटर्सच्या कंपाऊंडमध्ये बोलावून घेतलं.
याठिकाणी मित्र आकाश वसंतराव जाधव आणि कृष्णा पांडू आगलावे यांच्यासोबतचं अन्य दोन अल्पवयीनं मुलंही उपस्थित होती. या सर्वांनी मिळून हरमितसिंगचा दोरीने गळा आवळला ज्यामध्ये हरमितसिंगचा जागीच जीव गेला. ही घटना रविवारी रात्री साडे आठ ते 2 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर नांदेड पोलीस ठाण्याचे पोलीस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांच्यासह पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड आणि स्थानिक गुन्हे शाखेचं पथकही घटनास्थळी दाखल झालं.
हे वाचा-वरातीतून परतलेल्या पतीनं घरात आल्या-आल्या केला पत्नीचा खून; मग झाला पश्चात्ताप
या प्रकरणी पोलिसांनी अवघ्या काही तासांतचं खूनाचा उलगडा केला असून सोमवारी सकाळी दोन आरोपींना ताब्यात घेतलं आहे. तर अन्य दोघांचा शोध सुरू आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वजीत कासले करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Murder, Nanded