अमरावती, 26 मार्च: अमरावतीतील मेळघाट व्याघ्र प्रकल्पाअंतर्गत येणाऱ्या हरीसाल क्षेत्रात कार्यरत RFO (परिक्षेत्र अधिकारी) दिपाली चव्हाण (RFO Deepali Chavan) यांनी शासकीय निवासस्थानी गोळी झाडून आत्महत्या केली. या घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला होता. दरम्यान दिपाली यांनी चार पानी सुसाइड नोट लिहून DFO विनोद शिवकुमार (DFO Vinod Shivkumar) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे दीपाली यांच्या आई शांताबाई चव्हाण यांनी शिवकुमार यांना फाशी द्यावी अशी मागणी केली आहे. त्याशिवाय दिपाली यांचा मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे.
दरम्यान मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे DFO विनोद शिवकुमार यांच्यावर RFO दिपाली चव्हाण यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी धारनी पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. अशी देखील माहिती समोर येते आहे कि शिवकुमार याने आधी देखील एका कर्मचाऱ्याला मारहाण केली होती. विनोद शिवकुमारला नागपूर-बंगळुरू राजधानीमधून पसार होत असताना अटक करण्यात आली आहे. अमरावती गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली. मात्र अद्याप रेड्डी यांच्यावर कारवाई न झाल्याने नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला आहे.
(हे वाचा- जावयानं मासळीतून स्लो पॉयझनिंग करत सासरच्या अख्ख्या कुटुंबावर काढला राग)
'DFO ला फाशी द्या किंवा मला फाशी द्या'
'माझ्या मुलीला खूप दिवसापासून या अधिकाऱ्यांचा त्रास होत होता, DFO शिवकुमार हे अधिकारी नेहमीच घराबाहेर चकरा मारत होते आणि दिपालीला शिवीगाळ करत होते, त्यामुळे त्यांना कंटाळून माझ्या मुलीने हे पाऊल उचलले. त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, त्यांना फाशी नाही दिली तर मला फाशी द्या', अशी मागणी मृत दिपाली चव्हाण यांची आई शकुंतला चव्हाण यांनी केली आहे.
तर दिपाली यांचे पती राजेश मोहिते यांनी देखील या घटनेबाबत तीव्र शब्दात संताप व्यक्त केला आहे. त्यांनी असे म्हटले आहे कि, 'माझ्या पत्नीने वारंवार वरिष्ठ अधिकार्यांना याबाबत सूचना दिल्या होत्या. सोबतच या प्रकारचे पत्रव्यवहारही केले होते. मात्र त्यांनी याबाबत कोणतीही दखल घेतली नाही. माझ्या पत्नीला शिवकुमार अधिकारी अतिशय खालच्या पातळीवर जाऊन शिवीगाळ करत होते, त्यामुळे तिने त्रस्त झाल्याने हे पाऊल उचलले.'
(हे वाचा-ठाण्यात महिलेवर चाकू हल्ला करत एकाची आत्महत्या, घटनेचं कारण आलं समोर)
जोपर्यंत आरोपी आणि त्याला सहकार्य करणारे रेड्डी यांच्यावर कारवाई आणि अटक होत नाही, आम्हाला न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही दिपालीचा मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका दिपालीच्या कुटुंबीयांनी घेतली आहे.
गर्भपातासही कारणीभूत असल्याचा आरोप
'वरिष्ठ अधिकारी DFO विनोद शिवकुमार हे आपल्याला गावकरी आणि कर्मचाऱ्यांसमोर अश्लील शिवीगाळ करतात, रात्री बेरात्री भेटायला बोलावतात त्यांची मनाप्रमाणे न वागल्यास वारंवार सस्पेंड करण्याची धमकी देतात', असं दिपाली यांनी या सुसाइड नोटमध्ये लिहिले होते. यापूर्वी शिवकुमार यांची रेड्डी यांच्या कडे तक्रार केली मात्र त्यांनी कुठलीच कारवाई केली नसल्याचं उल्लेख या सुसाईड नोट मध्ये आहे. दिपाली चव्हाण यांनी आत्महत्येपूर्वी मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे अपर मुख्य प्रधान संरक्षक रेड्डी यांच्या नावाने ही सुसाइड नोट लिहिली होती.
दिपाली चव्हाण यांनी या सुसाइड नोटमध्ये केलेला आणखी एक गंभीर आरोप म्हणजे, त्यांना शिवकुमार यांनी ट्रेकला बोलावले होते. पण त्या प्रेग्नंट असल्याने ट्रेक करू शकत नव्हत्या. तरी देखील जाणूनबुजून 3 दिवस मालुरच्या कच्या रस्त्याने त्यांना फिरवल्याचा आणि त्यामुळे गर्भपात झाल्याचा आरोप दिपाली यांनी शिवकुमार यांच्यावर या सुसाइड नोटमधून केला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.