मुंबई, 06 जानेवारी: कोरोना काळात (Coronavirus) ऑनलाइन फसवणुकीच्या (Online Fraud) प्रमाणात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. ऑनलाइन फसवणूक करण्यासाठी विविध क्लुप्त्या वापरून सामान्यांना गंडा घालणाऱ्या अनेक टोळ्या याकाळात सक्रीय झाल्या होत्या. मात्र 2018 सालापासून अशाप्रकारची फसवणूक करणाऱ्या एका टोळीच्या मुसक्या आवळण्यास मुंबई सायबर पोलिसांना यश आलं आहे. मुंबई सायबर पोलिसांनी (Mumbai Cyber Police) पत्रकार परीषद घेत याबाबत माहिती दिली आहे. बनावट वेबसाइट बनवून त्यावर बनावट जाहिराती दाखवण्याचं काम ही टोळी करत होती. या टोळीला जेरबंद करत मुंबई सायबर सेलने मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे.
काही अधिकृत वेबसाइटवर दिसणाऱ्या जाहिरातींप्रमाणेच दिसणाऱ्या जाहिराती बनवून ही टोळी लोकांना लुबाडण्याचं काम करत होती. इतर जाहिरातींप्रमाणेच दिसणाऱ्या या जाहिरातींवर क्लिक केल्याने सामान्यांना आर्थिक नुकसानाला सामोरं जावं लागलं आहे. विशेष म्हणजे ही गँग बिहार राज्यातील पाटणामधून काम करत होती. मुंबई सायबर सेलने या प्रकरणी 6 जणांना अटक केली आहे.
(हे वाचा-पती अंघोळ करत होता अन् चोर घुसले घरात, 20 तोळे सोने आणि दीड किलो चांदी केले साफ!)
LPG गॅसच्या जाहिरातीखाली हजारोंची फसवणूक
या टोळीकडून अनेक खुलासे झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार या टोळीच्या म्होरक्या सर्व गोष्टीची रेकी करत असे. बहुतांश लोकांची फसवणूक एलपीजी गॅसच्या जाहिरातीच्या नावाखाली झाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या सहा जणांचे आणखी काही साथीदार आहेत. त्यांना देखील अटक करणार असल्याचं पोलिसांनी पत्रकार परिषदेत म्हटलं आहे. एलपीजी गॅस संदर्भातील दोन बनावट वेबसाइटच्या माध्यमातून तब्बल 10 हजार जणांची फसवणूक झाल्याची माहिती मिळते आहे.
(हे वाचा-भाड्याच्या घरात राहत असल्यास आयकरामध्ये मिळेल सूट, जाणून घ्या कसा होईल फायदा)
या टोळीने लुबाडलेली रक्कम साधारण 10 कोटी रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. 2018 सालापासून या टोळीकडून हा फ्रॉड सुरू आहे. पोलिसांनी अशी माहिती दिली आहे की, सध्या अशा प्रकारच्या तब्बल 125 फेक वेबसाईट्स सक्रीय आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cyber crime, Mumbai police