सोलापूर, 06 जानेवारी : सोलापूर जिल्ह्यातील विजापूर नाका पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका घरातून अवघ्या 45 मिनिटात सोन्याचे 20 तोळे दागिने आणि दीड किलो चांदीचे भांडी लंपास केल्याची घटना समोर आली आहे. धक्कादायक म्हणजे, हा प्रकार भर दिवसा घडला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
होटगी रस्त्यावरील बालाजी अपार्टमेंटमध्ये सोमवारी 4 जानेवारी रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास ही घटना घडली. दीप्ती जय आनंद यांच्या घरातून चोरट्यांनी अवघ्या काही मिनिटांत दागिने लंपास केले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दीप्ती आनंद यांच्या घरात सोमवारी सकाळी 11 ते 12 वाजेच्या दरम्यान ही घटना घडली. आनंद यांचे आसरा चौकात हॉटेल आहे. पती खासगी कंपनीत कामाला आहेत. सोमवारी सकाळी पती घरात अंघोळ करत होता. तेव्हा दीप्ती या भाजी आणण्यासाठी बाहेर पडल्या होत्या. जाताना त्यांनी घराचे दार फक्त ओढून घेतले होते. दीप्ती या घरापासून काही अंतर दूर गेल्यावर चोरट्यांनी संधी साधली आणि घरात गुपचूप प्रवेश केला. घरातील कपाटातून दागिने, पैसे आणि चांदीची भाडी लंपास केली. घरात कपाटाजवळच चावी ठेवलेली होती. त्यामुळे चोरांचे काम आणखी सोपे झाले. दीप्ती जेव्हा भाजी खरेदी करून घरात आल्या तेव्हा घरात सामना अस्ताव्यस्त पडलेले होते. त्यांनी घरात जाऊन पाहणी केली असता चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर घरात एकच गोंधळ उडाला.
दीप्ती आणि त्यांच्या पतीने तातडीने विजापूर पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली. त्यांच्या चार मंगळसूत्र, नेकलेस, लॉकेट, लहान मुलांचे कडे, पेंडल, अंगठी असे सोन्याचे दागिने चोरीला गेले. त्याचबरोबर चोरांनी दीड किलो चांदीची भांडी आणि रोख 18 हजार रुपयेही गायब केले.
दीप्ती यांनी तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला आहे. त्यांच्या घरातील आणि परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या मदतीने पाहणी करण्यात येत आहे. विशेष पथक तयार करून चोरांचा शोध घेतला जात आहे, अशी माहिती विजापूर पोलिसांनी दिली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.