मुंबई, 15 फेब्रुवारी, विजय वंजारा : मुंबईत मागील काही दिवसांपासून चोरी आणि हत्येच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे. मुंबईच्या जोगेश्वरी पूर्व परिसरातील एका वृद्ध दाम्पत्यावर त्यांच्याच घरात काम करणाऱ्या केअरटेकरने चोरीच्या उद्देशाने धारदार शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात वृद्धाचा जागीच मृत्यू झाला, तर वृद्ध महिला गंभीर जखमी असून, तिला जवळच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आरोपी पळून जाण्याच्या तयारीत असतानाच मेघवाडी पोलिसांनी त्याला दादर रेल्वे स्थानकातून अटक केली आहे. पप्पू जालिंदर गवळी असे अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे. सुधीर चिपळूणकर असे मृत वृद्धाचे नाव आहे, तर सुप्रिया चिपळूणकर असे त्यांच्या जखमी पत्नीचं नाव आहे. समोरचं दृष्य पाहून शेजारीही हादरले पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जोगेश्वरी पूर्वेकडील श्री स्वामी समर्थ इमारतीमधील चिपळूणकर कुटुंबीयांच्या घरातून भांडी जोरजोरात फेकली जात असल्याचा आवाज आला. यानंतर शेजाऱ्यांनी बेल वाजवली असता त्या घरातील केअरटेकर तोपर्यंत पळून गेला होता. समोरील दृश्य पाहून शेजाऱ्यांच्याही अंगाचा थरकाप उडाला. केअरटेकरने केलेल्या हल्ल्यात त्या घरातील सुधीर चिपळूणकर यांचा जागीच मृत्यू झाला होता. तर त्यांच्या पत्नी गंभीर जखमी झाल्या हेत्या. त्यांना स्थानिकांच्या मदतीनं तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं. या घटनेची तक्रार मेघवाडी पोलीस ठाण्यात देण्यात आली. हेही वाचा : पत्नी, सासरा, मुलाला जिवंत जाळलं, झोपेत असताना पेट्रोल टाकलं अन्..; धक्कादायक घटनेनं गोंदिया हादरलं
आरोपीला अटक मेघवाडी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता संबंधित हत्या ही त्या घरातील केअरटेकरनेच केली असल्याचं निष्पन्न झालं. यानंतर पोलिसांनी आरोपीच्या मागवार पोलीस पथक रवाना केलं. केअरटेकर सिद्धेश्वर एक्सप्रेसने पळून जाण्याच्या तयारीत असतानाच मेघवाडी पोलिसांनी दादर रेल्वे स्थानकातून त्याच्या मुसक्या आवळल्या. आरोपीची चौकशी केली असता चोरीच्या उद्देशाने त्याने ही हत्या केल्याची कबुली दिली. आरोपी विरोधात मेघवाडी पोलीस ठाण्यात कलम 302, 307 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

)







