मुंबई, 14 फेब्रुवारी : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. सातत्याने बलात्कार, अनैतिक संबंधातून हत्या, आत्महत्या यासंबंधीच्या घटना घडत आहे. प्रेमात धोका मिळाल्यानंतर आपल्या पार्टनरसोबत भयानक कृत्य केल्याच्या आणि प्रेमात आपल्या पार्टनरला धोका दिल्याच्याही घटना घडत आहेत. आज व्हॅलेंटाईन्स डेच्या निमित्ताने प्रेमात धोका मिळाल्याच्या किंवा प्रेमात आपल्या पार्टनरची फसवणूक केल्याच्या 5 घटनांचा न्यूज 18 लोकमतने आढावा घेतला. या घटनांनी महाराष्ट्र हादरला होता. पहिली घटना - लव्ह मॅरेज केल्यावरही दुसरीवर आला जीव आणि… प्रेमविवाह केल्यानंतरही दुसऱ्या तरुणीवर जीव आला. यामुळे दुसऱ्यांदा केलेल्या प्रेमात अडसर ठरणाऱ्या पत्नीचा खून केला होता. अत्यंत भयानक पद्धतीने त्याने आपल्या पत्नीला संपवले संपवले होते. ही संपाजनक घटना पुण्यातील मुळशी तालुक्यातली आहे. स्वप्नील विभिषण सावंत (वय 23, मुळ रा. सांगवी, ता. आष्टी, जि. बीड) असे आरोपी पतीचे नाव आहे. तर प्रियांका क्षेत्रे (वय 22 वर्ष) असे मृत पत्नीचे नाव आहे. स्वप्नील सावंत हा मुळशी तालुक्यातील घोटवडे फाटा येथे एका खासगी रुग्णालयात कामाला होता. त्याचे प्रियांका क्षेत्रे नावाच्या तरुणीसोबत लव्ह मॅरेज झाले होते. यानंतर ते दोन्ही कासार आंबोली येथे भाड्याची खोली घेऊन राहत होते. मात्र, दरम्यानच्या काळात स्वप्नील ज्या रुग्णालयातील कामाला होता, त्याठिकाणी असलेल्या एका परिचारिका तरुणीसोबत त्यांच्यात मैत्री झाली आणि मैत्रीचे रुपांतर प्रेमसंबंधात झाले. मात्र, स्वप्निलचे पहिले लग्न झाले होते. तरी त्याला या दुसऱ्या तरुणीशी लग्न करायचे होते. यातूनच मग त्याने अत्यंत भयानक पाऊल उचलत आपल्या पत्नीला संपवण्याचा निर्णय घेतला. आणि त्याने तिला घरातच मारुन टाकले. दुसरी घटना - त्याचा एक शब्द ऐकून प्रेयसीने संपवलं जीवन नागपूर येथे एक धक्कादायक घटना घडली होती. प्रियकराने लग्नास नकार दिल्याने 28 वर्षांच्या प्रेयसीने टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केली. या प्रेयसीने संपूर्ण जगाशी लढण्याची हिंम्मत या दाखवली. पण प्रियकराने तिला फसवले. तरुणी आणि तिचा प्रियकर दोघेही एकाच महाविद्यालयात कार्यरत असताना दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले होते. उच्चशिक्षित तरुण आणि तरुणी दोघांनी घरी सांगून लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे त्यांनी आपल्या घरी सांगितले तेव्हा दोघांच्या कुटुंबियांनी नकार दिला. मात्र, प्रेयसीने घरच्यांच्या विरोधात जाण्याची तयारी दाखवली. पण प्रियकराने घरच्यांच्या विरोधात न जाता लग्नाला नकार दिला. तसेच प्रियकरानेही घरच्यांना विरोध करत आपल्याशी लग्न करावे, अशी तरुणीची इच्छा होती. मात्र, तो मागे हटला आणि त्याने लग्नास नकार दिला. त्यामुळे प्रेमात मिळालेल्या धोक्यातून आलेल्या नैराश्यामुळे नागपुरात तरुणीने आत्महत्या केली. तिसरी घटना - डॉक्टरने दिला पहिल्या पत्नीला धोका, नंतर प्रेयसीनेच केला गेम नाशिक येथील घटनाही हादरवणारी आहे. येथील डॉ. सतीश देशमुख यांचे सुहासिनीसोबत अनैतिक प्रेमसंबंध होते. याची कल्पना त्यांच्या पहिल्या पत्नीला झाली होती. याच वादावरुन पहिल्या पत्नीने आत्महत्या केली. त्यामुळे आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी डॉक्टरनं सहा वर्षे कारागृहाची शिक्षा भोगली होती. दरम्यान, डॉक्टर देशमुख कारागृहात शिक्षा भोगत असताना सुहासिनीने दुसऱ्या व्यक्तीशी विवाह केला होता. त्या व्यक्तीचा हृदयविकाराने मृत्यू झाला. डॉक्टर देशमुख कारागृहातून बाहेर आल्यानंतर ते त्यांच्या पहिल्या पत्नीच्या मुलांसह राहत होते . तर याचदरम्यान, अरुण कांडेकर आणि सुहासिनीच्या प्रेमाला बहर फुटला होता. अशातच सुहासिनी ही डॉक्टर देशमुख यांच्याकडे उपचार घेण्यासाठी आली. त्यानंतर डॉक्टर देशमुख आणि सुहासिनी पुन्हा एकत्र आले. पण यासोबतच सुहासिनी आणि अरुण कांडेकर यांच्यातही प्रेमसंबंध होते. त्यामुळे डॉक्टर सुहासिनीच्या जीवनात परत आल्याने अरुण आणि सुहासिनीला तो अडचण वाटू लागला. त्यावेळी सुहासिनीने त्याला बाजूला काढण्याचा निश्चय केला. सुहासिनी आणि तिचा प्रियकर अरुण कांडेकर हे दोघेही 10 सप्टेंबर रोजी रुग्णालयात असताना डॉक्टर देशमुख यांनी या दोघांच्या प्रेम संबंधाबाबत विचारणा केली होती. त्यानंतर या तिघांमध्ये जोरदार वाद झाला होता. वादानंतर रुग्णालयातून प्रियकर निघून गेला. यावेळी रुग्णालयातच असलेल्या विश्रांती कक्षात जाऊन डॉक्टर पतीला संशयित सुहासिनीने भुलीचे इंजेक्शन देऊन मारण्याचा प्रयत्न केला. भुलीचे इंजेक्शन दिल्यानंतर डॉक्टरला तसेच बेडवर सोडून सुहासिनी निघून गेली. काही वेळानंतर बेशुद्ध झालेल्या डॉक्टरला शुद्ध आणण्यासाठी उपचार सुरू झाले. पत्नीच्या प्रेम प्रकरणाची कुणकूण आपल्याला लागली होती. त्यावरुन दोघांमध्ये वाद झाले. त्यानंतर सुहासिनीने भुलीचे इंजेक्शन देऊन मला मारण्याचा प्रयत्न केला. हा सर्व प्रकार डॉक्टरने मुलाला सांगितला होता. पण सतीश देशमुख या डॉक्टरचा उपचारादरम्यान 32 दिवसांनी मृत्यू झाला. डॉक्टरचा मृत्यू झाल्यानंतर मुलाने म्हसरूळ पोलीस ठाण्यात सुहासिनी आणि प्रियकराविरुद्धात फिर्याद दिली. नाशिकमधील या घटनेने महाराष्ट्र हादरला होता. हेही वाचा - प्रेमात धोका मिळणं आहे गरजेचं, त्यामुळे होतात ‘हे’ सहा फायदे चौथी घटना - प्रेमात धोका दिल्याचा राग, प्रेयसीवरच केला घाव यवतमाळ जिल्ह्यातील घटनेने महाराष्ट्र हादरला होता. प्रियकराने प्रेयसीचा गळा चिरून हत्या केली. घाटंजी तालुक्यातील बेलोरा येथील वाकी दुधाना शिवारात ही घटना घडली होती. गजानन दत्ताजी ढोणे (26रा. बेलोरा) असे तरुणाचे नाव असून त्याने आत्महत्या केली. मृत तरूण गजानन आणि तरूणी यांचे प्रेमप्रकरण होते. गजानन यवतमाळच्या बेलोरा या गावात राहायचा. प्रेयसीला घेऊन एकांताच्या शोधात घाटंजी तालुक्यातील बेलोरा येथील वाकी दुधाना शिवारात आले. एका पडीक शेतात भेटीसाठी गेले. गप्पा मारताना अचानक त्यांच्यात वाद झाला. तयारीने आलेल्या प्रियकराने प्रेयसीच्या गळ्यावर चाकूने वार केला. यात प्रेयसी गंभीर जखमी झाली होती. तर प्रेयसीवर हल्ला केल्यावर आरोपी प्रियकराने स्वतः झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. हे दोघेही दुचाकीने घाटंजी तालुक्यातील बेलोरा येथून एकांताच्या शोधात वाकी दुधाना शिवारात आले. प्रेमात धोका दिल्याचा राग गजाननच्या डोक्यात होता. त्यामुळे त्याने सोबत चाकू व कटर आणले होते. गजाननने कोमलच्या गळ्यावर चाकूने वार केला. ती रक्ताच्या थारोळ्यात कोसळली. नंतर तिच्या ओढणीने गजाननने झाडाला गळफास लावून घेतला. यात गजाननचा जागीच मृत्यू झाला. पाचवी घटना - लग्नाचे आमिष देऊन तीन वर्ष बलात्कार नागपुरातील तरुणी आपल्या कुटुंबियांसह देवदर्शनासाठी गेली होती. तिथं तिची एका रिक्षाचालकासोबत ओळख झाली. दोघांची चांगली मैत्री झाल्यानंतर मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. त्यानंतर आरोपीनं तरुणीला लग्नाचं आमिष दाखवून अज्ञातस्थळी नेत अनेकदा बलात्कार केला. या प्रकरणाची माहिती तरुणीच्या कुटुंबियांना समजताच तरुणीने आरोपीसोबत लग्न करणार असल्याचे सांगितले. त्यानंतर तरुणी कुटुंबीयांना सोडून आरोपीसोबत शहरातील दुसऱ्या ठिकाणी रहायला गेली. आरोपीने 2020 ते 2022 या दोन वर्षात तरुणीला लग्नाचं आमिष दाखवून बलात्कार केला. तरुणीने लग्नाची मागणी केल्यानंतर आरोपीने तिला नकार दिला. तसेच या तरुणीला मारहाणही करायला सुरुवात केली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.