शिरूर कासार, 24 मे: बीड जिल्ह्यातील शिरूर कासार याठिकाणी हिंदी सिनेमालाही लाजवेल अशी पूर्वनियोजित हत्येची (Preplanned murder) धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील काही युवकांनी सोनं खरेदी करण्याच्या बहाण्यानं सराफाला बोलावून (under pretext of buying gold) त्याची निर्घृण हत्या केली आहे. स्थानिक गुन्हे शाखेनं अवघ्या काही तासांतच हत्येचं गूढ उलगडलं आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना (2 Accused arrest) अटक केली असून एक आरोपी अद्याप फरार आहे. संबंधित आरोपींनी पोलीस चौकशीत हत्येची कबुली दिली आहे. याप्रकरणाचा पुढील तपास शिरूर कासार पोलीस करत आहेत.
विशाल कुलथे (वय -25) असं हत्या झालेल्या सराफा व्यापाऱ्याचं नाव आहे. तर ज्ञानेश्वर उर्फ भैय्या शिवाजी गायकवाड असं मुख्य आरोपीचं नाव असून त्याचं शिरूर कासारमध्ये एक सलूनचं दुकान आहे. संबंधित आरोपीनं मृत विशालकडून अनेकदा सोनं खरेदी केली होतं. त्यामुळे मृत विशाल आणि आरोपी ज्ञानेश्वर यांच्यात मैत्रीचं नात होतं. पण यावेळी ज्ञानेश्वरनं आपल्या काही साथीदारांच्या मदतीनं सराफा व्यापारी विशाल कुलथे याचा काटा काढला आहे.
आरोपी ज्ञानेश्वरनं विशालला सांगितलं की, माझं नवीन लग्न झालं आहे. माझ्या पत्नीला काही दागिने खरेदी करायचे आहेत. यासाठी आरोपी ज्ञानेश्वरनं 5 हजार रुपये अॅडव्हान्सदेखील दिले. त्यानंतर बनवलेल्या दागिन्यांसह दुकानातील इतर दागिनेही सोबत घेऊन ये, असं आरोपी ज्ञानेश्वरनं मयत विशाल याला सांगितलं. त्यानंतर विशाल सर्व दागिने घेऊन ज्ञानेश्वर सोबत एका सलून दुकानात गेला. पण याठिकाणी ज्ञानेश्वरसह धिरज मांडकर आणि संतोष लोमटे असे अन्य दोन साथीदारही याठिकाणी उपस्थित होते. यावेळी आरोपींनी सराफाला काही कळायच्या आत हिंदी सिनेमातील दृश्याप्रमाणे काटा काढला आहे.
हे ही वाचा-2 लाख हुंडा घेऊन एकीशी साखरपुडा; लग्न मात्र दुसरीशीच, नवरदेवासह 7 जणांवर गुन्हा
आरोपींनी सलून दुकानातील कात्री विशालच्या तोंडात खूपसून निर्घृण हत्या केली आहे. हत्येनंतर आरोपींनी विशालचा मृतदेह गोधडीत बांधून, अहमदनगर जिल्ह्यातील भातकुडगाव येथील स्वतः च्या शेतात नेवून पुरला. दरम्यान विशाल कुलथे हे गायब असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक भारत राऊत आणि पथकाने तपास करत धीरज मांडकर आणि संतोष लोमटे या दोन संशयित आरोपींना अटक केली. संबंधित आरोपींनी पोलीस चौकशीत सर्व घटनाक्रम सांगितला असून गुन्ह्याची कबुली दिली आहे. या गुन्ह्यातील मुख्य आरोपी ज्ञानेश्वर गायकवाड अद्याप फरार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Beed, Crime news, Murder