शिरूर, 28 एप्रिल: पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात सणसवाडी परिसरात एका अज्ञात व्यक्तीची दगडाने ठेचून हत्या (Brutal murder) केल्याची घटना घडली आहे. या घटनेची माहिती उघड होताचं गावात एकचं खळबळ उडाली असून बघ्यांनी घटनास्थळी चांगलीच गर्दी केली होती. संबंधित मृत व्यक्तीचा चेहरा अत्यंत वाईट पद्धतीने ठेचला होता. त्यामुळे मृत व्यक्ती नेमकी कोण याबाबत गावात चर्चा सुरू होती. या घटनेची माहिती मिळताच शिक्रापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.
शिरूर तालुक्यातील सणसवाडीतील साठे वस्ती जवळील चासकमान कालव्याच्या रस्त्यावर अज्ञात मारेकऱ्यांनी दगडाने डोकं ठेचून निर्घृण हत्या केली होती. सुरुवातीला संबंधित व्यक्तीची ओळख पटवणं अवघड जात होतं. पण शिक्रापूर पोलिसांनी तपासाची चक्र गतीनं फिरवल्यानं मृत व्यक्तीचं नाव लोचिंग मांझी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. संबंधित व्यक्ती हा मुळचा बिहारचा असून सध्या शिरूर तालुक्यातील डिग्रजवाडी याठिकाणी राहत होता.
(वाचा-प्रेयसीच्या मदतीने पतीने 7 वर्षांच्या मुलासह पत्नीला दिला गळफास, दौंडमधील घटना)
मृत लोचिंग मांझी यांची हत्या नेमकी कशामुळे झाली आणि कोणी केली, याबाबत कोणतीही ठोस माहिती अद्याप पोलिसांच्या हाती लागलेली नाही. पण परिसातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये काही कैद झालं आहे का? याबाबतचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे. शिक्रापूर पोलिसांनी या हत्येप्रकरणी अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा तपास शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमोल खटावकर करत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime, Crime news, Death, Maharashtra, Murder, Pune