रायपुर, 21 नोव्हेंबर : देशात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ होत असल्याचे पाहायला मिळत आहे. दिल्लीत श्रद्धा वालकर हत्यांकाडानंतर देशात मोठी खळबळ उडालेली असतानाच आता आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. युवतीची गळा दाबून हत्या केल्यानंतर तिचा मृतदेह आपल्याचा कारमध्ये सोडल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण -
छत्तीसगडच्या बिलासपूर येथून ही धक्कादायक घटना समोर आली आहे. एएनआयच्या वृत्तानुसार, आरोपी योग्य वेळी मुलीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावणार होता. परंतु कारमधून येणाऱ्या दुर्गंधीमुळे हत्येची घटना उजेडात आली. प्रियंका सिंह असे मृत तरुणीचे नाव आहे. बिलासपूरच्या टिकरापारा येथे भाड्याच्या घरात राहून स्पर्धा परिक्षेची तयारी करत होती.
येथे या तरुणीची भेट आशिष साहू याच्याशी झाली, यानंतर आशिष आणि प्रियकांची मैत्री झाली. प्राथमिक चौकशीत आरोपी आशिष साहू याने सांगितले की, आशिष आणि प्रियंका दोघेही एकत्र शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवायचे, त्यात दोघांचे मोठे नुकसान झाले. दरम्यान, पैशाच्या व्यवहारावरून दोघांमध्ये वाद सुरू झाला आणि प्रियंका सिंगने आशिष साहूवर पैशासाठी दबाव टाकण्यास सुरुवात केली.
हेही वाचा - आणखी एक 'श्रद्धा', पाच नराधमांकडून चिमुकलीवर वर्षभर अत्याचार
त्यातच या दोघांमध्ये पुन्हा एकदा वाद झाला. यानंतर त्याने दयालबंदजवळ आपल्या कारमध्ये मुलीचा गळा आवळून खून केला. यानंतर मृतदेह गाडीत भरून कस्तुरबा नगर येथील त्याच्या घरी आणला. चार दिवस कारमध्ये असल्याने मृतदेहातून तीव्र दुर्गंधी येऊ लागली, याची माहिती पोलिसांना देण्यात आली. घटनास्थळी कारमधून मृतदेह बाहेर काढल्यानंतर पोलिसांनी आरोपी आशिष साहू याला अटक केली आहे. पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत. दरम्यान, या हत्याकांडानंतर मोठी खळबळ उडाली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Chhattisgarh, Crime news, Murder, Share market