नवी दिल्ली, 06 जानेवारी : एका अमेरिकन व्यक्तीनं पाच मुलांसह आपल्या कुटुंबातल्या सात जणांना गोळ्या घालून ठार मारल्याची घटना घडली आहे. या व्यक्तीनं त्यानंतर स्वत:वरदेखील गोळी झाडून घेतली. अमेरिकन अधिकाऱ्यांनी गुरुवारी (5 जानेवारी) दिलेल्या माहितीनुसार, या व्यक्तीच्या पत्नीने घटस्फोटासाठी अर्ज केला होता. त्यानंतर त्याने सर्वांना ठार मारलं आहे. मायकेल हेट अस या व्यक्तीचं नाव असून तो एनोक शहरामध्ये राहत होता.
समोर आलेल्या माहितीनुसार, उटाहमधल्या एनोक शहरातल्या एका घरात पोलिसांना आठ मृतदेह सापडले आहेत. त्यापैकी एक मृतदेह चार वर्षांच्या मुलाचा आहे. या कुटुंबाची काळजी वाटत असलेले मित्र आणि नातेवाईकांनी बोलावल्यानंतर पोलिसांनी घरात प्रवेश केला होता.
हे ही वाचा : जिममध्येच मृत्यूनं गाठलं; वर्कआउट करताना अचानक कोसळला अन् 5 सेकंदात गेला जीव, घटनेचा VIDEO
एका प्रवक्त्याने सांगितलं की, पोलीस अधिकार्यांना बुधवारी (4 जानेवारी) एका घरी तीन प्रौढ आणि पाच मुलांचे मृतदेह सापडले. सर्वांचा मृत्यू बंदुकीच्या गोळ्यांमुळे झालेला आहे.
शहर प्रशासनाच्या निवेदनानुसार, 42 वर्षांचा मायकेल हेट या प्रकरणातला संशयित आरोपी आहे. मिळालेल्या पुराव्यावरून असं निदर्शनास येतं, की मायकेलनं घरातल्या इतर सात जणांची हत्या केल्यानंतर स्वतःचा जीव घेतला. मृतांमध्ये मायकेलची पत्नी, तिची आई आणि पाच मुलांचा समावेश आहे. पाच मुलांमध्ये चार ते 17 वर्षं वयोगटातल्या तीन मुली आणि दोन मुलांचा समावेश आहे.
एनोकचे महापौर जेफ्री चेस्नट म्हणाले की, वैवाहिक संबंध बिघडल्यामुळे ही गोळीबाराची घटना घडल्याचं प्रथमदर्शनी दिसत आहे. “घरात आढळलेल्या कोर्टाच्या कागदपत्रांवरून असं दिसतं की मायकेलच्या पत्नीनं 21 डिसेंबर रोजी घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता,” असं महापौरांनी पत्रकारांना सांगितलं.
महापौर चेस्नट म्हणाले, “एनोक हा एक लहान आणि कमी समुदाय असलेला परिसर आहे. इथली जवळपास सगळी माणसं एकमेकांना ओळखतात. मायकेल हेटचं कुटुंब माझ्या शेजारीच राहत होतं. त्यांची लहान मुलं माझ्या मुलांसोबत माझ्या अंगणात खेळायची.”
हे ही वाचा : गाडीवर बसून व्यक्तीनं कचाकचा चावून खाल्ला जिवंत साप; पुढं जे झालं ते थरकाप उडवणारं, Shocking Video
मुख्य तपास अधिकारी जॅक्सन एम्स म्हणाले, या प्रकरणाचा तपास सुरू आहे; पण गुन्हेगारीच्या अँगलनं या प्रकरणाचा तपास सुरू नाही. तपास करणारे पोलीस या कुटुंबाशी परिचित होते. काही वर्षांपूर्वी एका तपासकामानिमित्त या कुटुंबाशी संबंध आला होता.
एनोक हे उटाहच्या नैऋत्येला असलेलं लहान शहर आहे. त्याची लोकसंख्या 7500 आहे. सॉल्ट लेक सिटीपासून ते साडेतीन तासांच्या अंतरावर आहे. हे ठिकाण लेटर डे सेंट्सच्या ‘चर्च ऑफ जीझस ख्राइस्ट’चं मुख्यालय म्हणून ओळखलं जातं. या चर्चचे सदस्य मॉर्मन्स म्हणून प्रसिद्ध आहेत. हा एक पुराणमतवादी ख्रिश्चन पंथ आहे, जो कुटुंबव्यवस्थेवर भर देतो; पण ऐतिहासिकदृष्ट्या या पंथानं बहुपत्निकत्वाला प्रोत्साहन दिलेलं आहे.