मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

YouTube Video पाहून 17 वर्षांच्या मुलीने घरातच केली स्वत:ची डिलिव्हरी; आई-वडिलही होते अनभिज्ञ

YouTube Video पाहून 17 वर्षांच्या मुलीने घरातच केली स्वत:ची डिलिव्हरी; आई-वडिलही होते अनभिज्ञ

प्रतीकात्मक फोटो

प्रतीकात्मक फोटो

धक्कादायक बाब म्हणजे मुलीच्या आई-वडिलांना याबाबत काहीच माहिती नव्हतं. ते तिघेही एकाच घरात राहतात.

केरळ, 28 ऑक्टोबर : इंटरनेटमुळे (Internet) जग जास्त जवळ आलंय आणि सोशल मीडियाचा (Social media) प्रभावही वाढलाय. या सोशल मीडियाचा कसा गैरवापर केला जातो याचा प्रत्यय येणारी एक धक्कादायक घटना केरळमध्ये (Keral) नुकतीच घडली आहे. सहज उपलब्ध होणाऱ्या या सोशल मीडियाचे दुष्परिणाम किती भयानक होतात हे या घटनेवरून स्पष्ट होतं. इंडिया टुडेनं याबाबतचं वृत्त दिलं आहे.

केरळमधली ही घटना सुन्न करणारी करणारी आणि अनेक प्रश्न उपस्थित करणारी आहे. केरळमध्ये एका 17 वर्षांच्या मुलीनं यूट्युब पाहून घरातच बाळाला जन्म दिला. (Youtube video ) म्हणजे या अल्पवयीन मुलीनं यूट्युब व्हिडिओ बघून स्वत:ची डिलिव्हरी केली. यापेक्षा धक्कादायक म्हणजे तिचे आईवडील याबद्दल पूर्णपणे अनभिज्ञ होते.

केरळमधील मलप्पुरम (Malappuram) जिल्ह्यात या 17 वर्षांच्या मुलीनं 24 ऑक्टोबरला घरातच बाळाला जन्म दिला. आईला बाळाचं रडणं ऐकू जाऊ नये म्हणून या मुलीनं स्वत:ला एका खोलीतच कोंडून घेतलं होतं. तिच्या आईला दृष्टिदोष आहे. त्यामुळे तिला नीट दिसत नाही तर या मुलीचे वडील सुरक्षा रक्षक म्हणून काम करतात. ते सतत नाईट ड्युटीवर असतात अशी माहिती पोलिसांनी दिली. घराशेजारी राहणाऱ्या एका 21 वर्षांच्या तरुणानं अत्याचार केल्यानं गर्भवती राहिल्याचा आरोप या मुलीनं केला आहे. मुलीनं दिलेल्या माहितीवरून या तरुणाला अटक करून त्याच्यावर POCSO (पॉक्सो) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याच तरुणानं तिला यूट्यूबवरील व्हिडिओ पाहून घरीच बाळाला जन्म देण्याचा सल्ला दिला होता.

हे ही वाचा-Shocking! दिल्ली विद्यापीठाच्या निवृत्त प्रोफेसर दाम्पत्याची आत्महत्या

बाळाला जन्म दिल्यानंतर तीन दिवस या मुलीनं एका खोलीत कोंडून घेतलं होतं. नंतर तिच्या आईला बाळाच्या रडण्याचा आवाज आला आणि याबाबत समजलं आणि मग बाळासह तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. या हॉस्पिटलनं बालकल्याण समितीला या घटनेबाबत कळवलं. त्या समितीनें मग पोलिसांना कळवलं आणि पोलिसांनी कारवाई केली. मात्र गर्भारपणाचे नऊ महिने पूर्ण होईपर्यंत या अल्पवयीन मुलीच्या आईवडिलांना याबाबत काहीच कसं कळलं नाही याबाबत बालकल्याण समितीनं आश्चर्य व्यक्त केलंय. ऑनलाईन क्लासेस सुरु असताना त्यात व्यत्यय नको म्हणून मुलीनं खोलीत कोंडून घेतलं असावं असं या मुलीच्या आईला वाटत होतं. या मुलीच्या घरच्या परिस्थितीचा फायदा या नराधमानं घेतला आणि या मुलीवर अत्याचार केला असं पोलिसांनी सांगितलं बाळाची आणि त्याच्या आईची तब्येत आता सुधारत आहे.

सहज उपलब्ध होणाऱ्या या सोशल मीडियामुळे निर्माण होणाऱ्या धोक्यांबद्दल वारंवार बोललं जातं. तसंच या काळात पालकांनी आपल्या वयात येणाऱ्या मुलांकडे लक्ष देणं किती गरजेचं आहे यावरही चर्चा होते. मात्र सामान्य परिस्थितीतील मुलींचा गैरफायदा अनेकदा ओळखीतले लोक घेतात आणि अशा मुली अत्याचाराला बळी पडतात हे वारंवार समोर येतंय.

First published:

Tags: Girl pregnant, Kerala, Pregnancy, Social media, Youtube