मुंबई, 22 सप्टेंबर : मुंब्रा रेल्वे स्थानकावर बुधवारी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास एक भयानक घटना घडली. एक 20 वर्षीय तरुण धुळे जिल्ह्यातील वडजाई या गावाहून भारतीय सैन्याच्या अग्निवीरच्या भरतीसाठी मुंब्र्याला आला होता. खरंतर त्याच्यासोबत त्याच्या गावातील आणि इतर आजूबाजूच्या गावातील बरोबरीच्या तरुणांचा ग्रुप होता. ते अग्निवीरच्या भरतीसाठी मुंब्राला जाणार होते. पण त्याआधीच रेल्वे स्थानकावर भयानक दुर्घटना घडली. अग्निवीरच्या भरतीसाठी आलेल्या एका तरुणाला लोकलची धडक बसली आणि त्यात त्याचा मृत्यू झाला. या दुर्घटनेने आई-वडिलांचा 20 वर्षांचा मुलगा हिरावला. या मुलाचं नाव रामेश्वर देवरे असं होतं.
संबंधित घटना ही मुंब्रा रेल्वे स्थानकावर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात अतिशय अचूकपणे कैद झाली आहे. रामेश्वरसोबत त्याच्या वडजाई गावाचे एकूण 30 तरुण होते. ते मंळवारी रात्री चाळीसगाव येथून मुंबईच्या दिशेला येणाऱ्या रेल्वेत बसले. त्यानंतर बुधवारी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास ते कल्याण रेल्वे स्थानकावर उतरले. तिथून ते मुंब्राला भरतीसाठी रवाना झाले. या दरम्यान मुंब्रा रेल्वे स्थानकावर थांबले असताना रामेश्वरला मळमळ होऊ लागलं. तो उलटीसाठी रेल्वे रुळाकडे गेला. तो फलाटावरुन वाकून उलटी करत असतानाच अचानक भरधाव लोकल ट्रेन आली. रामेश्वरच्या डोक्याला या लोकल ट्रेनची जोराची धडक बसली. तो 10 ते 15 फूट दूर फेकला गेला. या दुर्घटनेत रामेश्वरचा जागीच मृत्यू झाला.
VIDEO : मुंब्र्यात अग्निवीरच्या भरतीला जाणाऱ्या धुळ्याचा तरुणाचा दुर्दैवी अंत, कल्याण रेल्वे स्थानकावर भयानक घटना #mumbra #kalyan #cctv #railwayaccident pic.twitter.com/tdFygImoD3
— News18Lokmat (@News18lokmat) September 22, 2022
(राहते घर पाडण्यासाठी अचानक जेसीबी गावात, गावकरी संतापले, अधिकाऱ्यांना घेराव)
रामेश्वरने कॉम्युटर डिप्लोमा केलेला होता. तो नोकरीच्या शोधात होता. आयुष्यात सेटल होण्यासाठी आपल्याकडे नोकरी हवी. त्यासाठी तो नोकरीच्या शोधात होता. तो वेगवेगळ्या सरकारी नोकरीसाठी अर्ज करण्याकरता आग्रही असायचा. त्याने काही कोर्सेसही केले. तो सतत शिक्षण घेण्याचा विचारात असायचा. आपल्या आई-वडिलांना शेतातील कामात मदत करायचा. शेतात पिकवलेला भाजीपाला तो स्वत: विकायला जायचा आणि आई-वडिलांच्या हातात मोबदला द्यायचा.
आपला मुलगा गुणाचा आहे. त्याला चांगली नोकरी मिळावी, अशी आई-वडिलांची देखील अपेक्षा होती. त्यामुळे रामेश्वर दिवस-रात्र नोकरीचा विचार करायचा. नोकरीसाठी प्रयत्न करायचा. त्याला भारतीय सैन्यात नोकरी करण्याची प्रचंड इच्छा होती. सैन्यात भरती होवून देशसेवा करावी, असा त्याचा विचार होता. त्यासाठीच तो मुंब्र्याला आला होता. पण नियतीने त्याच्या नशिबात दुसरचं काहीतरी लिहिलं होतं. त्याच्यासोबत घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण वडजाई गाव स्तब्ध झालं आहे. पंचक्रोशित या घटनेवर हळहळ व्यक्त केली जातेय. एक चांगला गुणी मुलगा गावाने गमवला, अशा शब्दांमध्ये हळहळ व्यक्त केली जातेय. रामेश्वर याच्या पश्च्यात आई-वडील, बहीण, भाऊ असा परिवार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cctv, Cctv footage