पुणे, 17 फेब्रुवारी : पुण्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढतच चालले आहे. हत्येच्याही घटना सातत्याने समोर येत आहेत. यातच आता आणखी एक धक्कदायक घटना समोर आली आहे. अभ्यास करताना मोबाईल पाहत असलेल्या मुलाला आई रागवल्याने बारावीच्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या मुलाने आईचा गळा दाबून हत्या केली. या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण - ही धक्कादायक घटना उरुळी कांचन (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील जय मल्हार रोड परिसरात बुधवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडली. तसलीम जमीर शेख (वय 37, माऊली कृपा बिल्डिंग, जय मल्हार रोड, पिराचा चौक, उरुळी कांचन, ता. हवेली), असे मृत महिलेचे नाव आहे. तर जिशान जमीर शेख (वय 18 रा. सदर) असे आईचा खून केलेल्या आरोपी मुलाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तसलीम जमीर शेख या उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीतील जय मल्हार रोड परिसरात आपल्या पती आणि एका मुलासोबत राहत होत्या. तस्लीम शेख हिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती लोणी काळभोर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी शवविच्छेदनासाठी मृतदेह ससून रुग्णालयात पाठविला. मात्र, डॉक्टरांना संशय आल्याने तेथे तीन डॉक्टरांच्या देखरेखीखाली शवविच्छेदन करण्यात आले. त्यात गळा दाबून आणि डोक्याला जखम झाल्याने मृत्यु झाल्याचा प्राथमिक अहवाल डॉक्टरांनी दिला. यानंतर लोणी काळभोर पोलिसांनी चौकशी केली. पण यावेळी नेमकी कोणी माहिती देण्यास तयार नव्हते. कारण ही घटना घडली, तेव्हा वडील जमीर आणि मुलगा जिशान हे दोन्हीच तेथे होते. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता मुलाने घडलेला धक्कादायक प्रकार सांगितला. आरोपी मुलाचे वडील जमीर शेख हे नमाज पठणासाठी गेले होते. तर त्यांची धाकटी मुलगी बाहेर गेली होती. आरोपी मुलगा जिशान हा इयत्ता बारावीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. तो अभ्यास करीत असताना मोबाईलवर पहात बसला होता. ते पाहून त्याची आई तस्लीम चिडली आणि ती जिशानला रागविली. तसेच त्याच्या गालावर तिने चापट मारली. मात्र, आईने गालावर चापट मारल्याने जिशानने आपल्या आईला जोरात भिंतीवर ढकलले आणि तिचा गळा दाबला. त्यात तिचा मृत्यु झाला. हेही वाचा - सांगली : पैशातून दोघांमध्ये वाद, पाळत ठेवून भागिदाराला अडवलं अन्… वडिलांना दिली खोटी माहिती - दरम्यान, आई निपचित पडल्याचे पाहून जिशान घाबरला. त्यामुळे त्याने ब्लेडने त्याच्या आईचे मनगट कापले. पण, मृत्यु झाला असल्याने त्यातून रक्त आले नाही. यानंतर त्याने वायर फॅनला अडकविली तसेच खाली आईचा मृतदेह ठेवला. काही वेळाने जमीर शेख आल्यावर आईने गळफास घेतला. मी तिला खाली उतरुन ठेवल्याचे सांगितले. त्यांनी तस्लीम यांना जवळच्या रुग्णालयात नेले. मात्र, तेथील डॉक्टरांना संशय आल्याने त्यांनी ससून रुग्णालयात नेण्यास सांगितले. अखेर शवविच्छेदनात खूनाचा प्रकार समोर आला. याप्रकरणी आरोपी मुलाला लोणी काळभोर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तसेच लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अमोल घोडके यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.