नवी दिल्ली, 23 मे: भारत देश सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेशी (Second Wave of Coronavirus) लढा देत आहे. कोरोनाची दुसरी लाट सध्या काहीशी धीमी होत असल्याचं पाहायला मिळतं आहे. असं असलं तरीही अद्याप धोका टळलेला नाही. त्यातच तिसऱ्या लाटेचा धोका देखील व्यक्त केला जात आहे. असा दावा केला जात आहे की कोरोनाची तिसरी लाट लहान मुलांना लक्ष्य करू शकते. सध्या जगभरात 12 वर्षांखालील मुलांना कोरोना लस (COVID-19 Vaccine) दिली जात नाही आहे. एवढेच नव्हे तर भारतात अद्याप 18 वर्षांखालील मुलांना देखील अद्याप लस घेण्यासाठी मंजुरी मिळालेली नाही.
अशावेळी लहान मुलांबाबत दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) की चीफ सायंटिस्ट सौम्या स्वामीनाथन यांच्या मते कोरोनाची नेजल व्हॅक्सिन अर्थात नाकावाटे दिली जाणारी लस (Nasal Corona Vaccine) लहान मुलांसाठी गेम चेंजर ठरू शकते. अशी माहिती समोर आली आहे की ही लस इतर लशींपेक्षा अधिक फायदेशीर ठरणारी असेल. शिवाय ही लस घेणं देखील सोपं आहे.
हे वाचा-...अन् कोरोनाबाधित रुग्णाचा मृतदेह चादरीतच गुंडाळला, चिपळूणमधील धक्कादायक घटना
सीएनएन-न्यूज 18 शी बोलताना सौम्या स्वामीनाथन यांनी याबाबत माहिती दिली. त्यांनी असे म्हटले की, अधिकतर शालेय शिक्षकांनी व्हॅक्सिन घेणे आवश्यक आहे. यासह त्या म्हणाल्या की जेव्हा मुलांमध्ये कोरोना विषाणू प्रसारित होण्याचा धोका कमी होईल तेव्हाच मुलांना शाळेत पाठवावे. त्या पुढे म्हणाल्या की, 'भारतात बनलेली नेजल व्हॅक्सिन लहान मुलांसाठी गेम चेंजर ठरू शकते. मुलांना ही लस देणे सोपे आहे. शिवाय ही रेस्पिरेटरी ट्र्रॅकमध्ये प्रतिकारशक्ती वाढवेल.'
लहान मुलांमध्ये धोका कमी
केंद्र सरकारने शनिवारी असे सांगितले की मुले संसर्गापासून सुरक्षित नाहीत, पण असेही म्हटले आहे की सध्या या विषाणूचा परिणाम मुलांवर कमी होत आहे. जगाची आणि देशाची आकडेवारी पाहिल्यास फक्त 3 ते 4 टक्के मुलांना रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता भासत आहे. NITI आयोगाचे (आरोग्य) सदस्य व्ही के पॉल म्हणाले की, 'जर मुलं कोव्हिड संक्रमित असतील तर बऱ्याचदा कोणतंही लक्षण नसतं किंवा कमीतकमी लक्षणे दिसून येतात. त्यांना सहसा रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता नसते. परंतु आपण 10-12 वर्षाच्या मुलांवर अधिक लक्ष देणे आवश्यक आहे '.
हे वाचा-PPE Kits बाबत सरकारवर टीका करणाऱ्या डॉक्टरचा मृत्यू, निलंबनामुळे नैराश्यान घेरलं
हैदराबादस्थित भारत बायोटेक कंपनीने नेजल व्हॅक्सिनची चाचणी सुरू केली आहे. या लसीद्वारे नाकातून डोस दिले जातील. डब्ल्यूएचओच्या वरिष्ठ शास्त्रज्ञ सोम्या स्वामीनाथन यांच्या मते हे कोरोना विषाणूंपासून मुलांना संरक्षण देण्यात प्रभावी ठरू शकते. हे व्हॅक्सिन नाकावाटे दिलं जाणार आहे. कंपनीच्या मते नेजल स्प्रेचे केवळ 4 थेंब पुरेसे असतील. दोन्ही नाकपुड्यांमध्ये दोन-दोन थेंब टाकले जातील.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona patient, Corona vaccination, Corona vaccine, Coronavirus, Sanjeevani