नवी दिल्ली 06 जुलै: गेल्या दीड वर्षापासून थैमान घातलेल्या कोरोना विषाणूच्या संसर्गाला (Corona Pandemic) आटोक्यात आणण्यासाठी देशात सध्या लसीकरण मोहीम (Vaccination Drive) वेगाने सुरू आहे. आतापर्यंत कोरोना प्रतिबंधक लशींचे (Anti Covid Vaccination) 34 कोटींहून अधिक डोस देऊन झाले आहेत. जुलै महिन्याअखेरपर्यंत आणखी 12 ते 16 कोटी डोसेस दिले जाणार आहेत. लसीकरणाचा हा वेग आता आणखी वाढण्यास मदत होणार आहे. कारण रशियाची स्पुतनिक व्ही (Sputnik V) ही लसदेखील आता सरकारी लसीकरण केंद्रांवर मोफत उपलब्ध केली जाणार आहे. सध्या कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन लशीच लसीकरण केंद्रांवर दिल्या जात आहेत. तसंच, स्पुतनिक व्ही ही लस केवळ खासगी लसीकरण केंद्रांवर सशुल्क दिली जात आहे. आता ही लसदेखील आता सरकारी लसीकरण केंद्रांवर उपलब्ध केली जाणार असल्यामुळे लसीकरणाचा वेग वाढण्यास मदत होणार आहे.
केंद्र सरकारच्या कोविड-19 वर्किंग ग्रुपचे (Covid19 Working Group) प्रमुख डॉ. एन. के. अरोरा यांनी 'टाइम्स ऑफ इंडिया'ला ही माहिती दिली. सध्या स्पुटनिक व्ही ही लस आयात केली जात असून, लवकरच या लशीचं भारतात उत्पादन केलं जाणार आहे. या लशीच्या पुरवठ्यानुसार सरकारी लसीकरण केंद्रांवर ही लस लवकरच मोफत उपलब्ध करून दिली जाणार असल्याचं डॉ. अरोरा यांनी सांगितलं.
पुढच्या महिन्यात धडकणार कोरोनाची तिसरी लाट; कसा कराल स्वतःचा बचाव?
स्पुतनिक व्ही या लशीच्या साठवणुकीसाठी उणे 18 अंश सेल्सिअस तापमानाची गरज असते. पोलिओ लशींची साठवणूक ज्यात केली जाते, त्या कोल्ड चेन सुविधांमध्ये (Cold Chain Facilities) स्पुतनिक व्ही लशीची साठवणूक करता येऊ शकते. या नियोजनामुळे ही लस गावोगावी पोहोचू शकेल, असंही डॉ. अरोरा यांनी 'टाइम्स ऑफ इंडिया'ला सांगितलं.
सध्या भारतात दररोज सरासरी सुमारे 50 लाख जणांचं लसीकरण होत आहे. ऑक्सफर्ड-अॅस्ट्राजेनेकाने विकसित केलेली आणि भारतात सिरम इन्स्टिट्यूटमध्ये निर्मिती केली जाणारी कोविशिल्ड (Covishield) आणि हैदराबादच्या भारत बायोटेकने विकसित केलेली पूर्णतः स्वदेशी कोव्हॅक्सिन (Covaxin) या दोन लशींचा सध्याच्या लसीकरण मोहिमेत मोठा वाटा आहे. या लशींचं उत्पादन वाढवण्याचं नियोजन आहे. तसंच, आता स्पुतनिक व्ही ही लसदेखील सरकारी लसीकरण कार्यक्रमात उपलब्ध केली जाणार आहे. त्याशिवाय मॉडर्ना आणि झायडस कॅडिला या दोन कंपन्यांच्या लशींनाही लवकरच मंजुरी मिळण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे आगामी काही आठवड्यांत रोजच्या लसीकरणाची संख्या 80 लाख ते एक कोटीपर्यंत जाऊ शकते, असं डॉ. अरोरा यांनी सांगितलं.
5 जिल्ह्यांनी वाढवलं ठाकरे सरकारचं टेन्शन; सरासरीपेक्षा पॉझिटिव्हिटी रेट जास्त
'इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च'ने (ICMR) अलीकडेच जाहीर केलेल्या अहवालानुसार, 2022च्या फेब्रुवारी ते मार्च महिन्यात कोरोना संसर्गाची तिसरी लाट येऊ शकते. त्या पार्श्वभूमीवर, चालू वर्षाअखेरीपर्यंत 18 वर्षांवरील सर्वांचं म्हणजेच सुमारे 93 कोटी लोकसंख्येचं लसीकरण पूर्ण करण्याचं उद्दिष्ट सरकारने ठेवलं आहे. जुलै महिन्याअखेरीपर्यंत 50 कोटी डोस पूर्ण करण्याचं उद्दिष्ट सरकारने ठेवलं होतं. सध्या लसीकरणाच्या आकड्याने 34 कोटींचा टप्पा पार केला असून, चालू महिन्याच्या उर्वरित दिवसांत ते उद्दिष्ट साध्य होऊ शकतं, असं डॉ. अरोरा म्हणाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona vaccination, Corona vaccine