मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /

कोरोना लशीनं केली कमाल! पहिल्या डोसनंतरच 67 टक्क्यांनी घटला संसर्ग

कोरोना लशीनं केली कमाल! पहिल्या डोसनंतरच 67 टक्क्यांनी घटला संसर्ग

AstraZeneca's Vaccine

AstraZeneca's Vaccine

कोरोनाविरोधातील लढाईत कोरोना लशीचं शस्त्र प्रभावी ठरतं आहे. लसीकरण सुरू झाल्यानंतर पॉझिटिव्ह बातमी समोर आली आहे.

लंडन, 03 फेब्रुवारी : ऑक्सफर्ड विद्यापीठ (Oxford University) आणि अॅस्ट्राझेनेका कंपनी (Astrazeneca) यांनी संयुक्तरीत्या तयार केलेल्या कोव्हिड-19 प्रतिबंधक लशीचा (Covid-19 Vaccine) दोनपैकी पहिला डोस (Dose) घेतल्यानंतरच कोरोना विषाणूचा संसर्ग (Transmission) होण्याचं प्रमाण 67 टक्क्यांनी कमी झालं आहे. कोरोनाच्या प्रसारावर निर्बंध आणण्यासाठी ही लस परिणामकारक ठरत आहे, असं ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या ताज्या अभ्यासातून स्पष्ट झालं आहे. कोरोना महासाथीविरोधातील (Pandemic) लढाईत हे महत्त्वाचं पाऊल आहे.

ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या ताज्या अभ्यासातील नोंदीनुसार कोरोनाप्रतिबंधक लस आणि लसीकरणाच्या माहितीतून असे संकेत मिळत आहेत की, लोकसंख्येतील संसर्गग्रस्तांची संख्या कमी करून एकंदर संसर्ग कमी करण्यावर या लशीचा मोठा परिणाम होऊ शकतो. ऑक्सफर्ड-अॅस्ट्राझेनेकाने विकसित केलेल्या कोरोना प्रतिबंधक लशीचे डोस भारतात सीरम इन्स्टिट्यूटतर्फेही (Serum Institute of India) तयार केले जात आहेत.

ब्रिटनचे आरोग्यमंत्री मॅट हॅनकॉक यांनी सांगितलं, 'ऑक्सफर्डच्या लशीची ही बातमी खरंच खूप उत्तम आहे. ऑक्सफोर्डची लस घेतल्यानंतर फक्त रुग्णालयात दाखल कराव्या लागण्याच नव्हे तर लक्षणं नसणाऱ्या तसंच कोणत्याही प्रकारे कोव्हिडची लागण झालेल्या रुग्णांची संख्या दोन-तृतीयांश प्रमाणात कमी झाली"

"संसर्गात दोन तृतीयांश घट, दोन डोसमधील 12 आठवड्यांच्या अंतरातही उत्तम संरक्षण आणि हॉस्पिटलायझेसनची गरज नाही, ही त्याची वैशिष्ट्यं आहेत. ही लस उत्तम पद्धतीने कार्य करते आहे.' असं त्यांनी सांगितलं.

ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या लशीच्या चाचण्यांच्या निष्कर्ष 'द लॅन्सेट'जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आला आहे. त्यानुसार या लशीचे दोन डोस घेतले जाणं आवश्यक असून, त्या डोसमध्ये तीन महिन्यांचा कालावधी ठेवल्यास कोरोनाविरुद्ध संरक्षण मिळवण्यासाठी प्रभावी ठरू शकेल.

त्या लशीचा प्रभाव पहिला डोस घेतल्यानंतर 22 व्या दिवसापासून 90 व्या दिवसापर्यंत 76 टक्के असल्याचं आढळून आलं आहे. याचाच अर्थ असा की, पहिल्या आणि दुसऱ्या डोसच्या तीन महिने अंतरात लशीचा प्रभाव कमी होत नाही.

ऑक्सफर्डच्या लशीच्या चाचण्यांचे प्रमुख संशोधक प्रा. अँड्र्यू पोलार्ड यांनी सांगितलं, 'लशीच्या आपत्कालीन वापरासाठी (Emergency Use) परवानगी देणाऱ्या 25 हून अधिक नियंत्रक संस्थांनी ज्या माहितीच्या आधारे ती परवानगी दिली, त्या माहितीला या नव्या डेटामुळे अधिक बळ मिळालं आहे.

'लसीकरणासंदर्भातील संयुक्त समितीने दोन डोसमध्ये 12 आठवड्यांचं अंतर ठेवण्याची केलेली शिफारसही योग्य असल्याचं यावरून स्पष्ट झालं आहे. त्यामुळे लशीचे अधिकाधिक डोस उपलब्ध करायला वेळ मिळेल आणि पहिला डोस घेतल्यानंतर 22 दिवसांपासून संरक्षण मिळायला सुरुवात होते, याचीही खात्री झाली,' असंही प्रा. पोलार्ड यांनी सांगितलं.

हे वाचा -  कोरोना म्हणजे काय? दोनदा पॉझिटिव्ह झालेल्या तरुणाला महासाथीची माहितीच नाही

ऑक्सफर्ड विद्यापीठाचा हा नवा अभ्यास सुरुवातीच्या टप्प्यात लस घेणाऱ्यांच्या स्वॅब टेस्टवर आधारित आहे. त्यांच्यापैकी कोणाचंही हॉस्पिटलायझेशन करावं लागलं नाही. लशीच्या दोन डोसमधील अंतर सहा आठवडे असेल, तर लशीचा प्रभाव 54.9 टक्के होता आणि अंतर 12 आठवडे किंवा अधिक ठेवल्यास लशीचा प्रभाव 82.4 टक्क्यांपर्यंत पोहोचला. ब्रिटन सरकारने पहिला डोस उपलब्ध केल्यानंतर तीन महिन्यांनी दुसरा डोस उपलब्ध करण्याचं धोरण अवलबलं असून, त्याला या निष्कर्षामुळे आधार मिळाला आहे.

शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे की या संशोधनातून मिळालेले निष्कर्ष याआधीच्या एन्फ्लुएंझा, एबोला आणि मलेरिया आदी रोगांविरुद्धच्या लशींच्या निष्कर्षांशी मिळतेजुळते आहेत. कोरोना विषाणूच्या नव्या स्ट्रेनवर लशीचा काय परिणाम होतो, याची माहितीही लवकरच हाती येणार आहे.

हे वाचा - Sputnik V किती प्रभावी आणि सुरक्षित? तिसऱ्या टप्प्यातील चाचणीचा अहवाल जारी

दरम्यान अशाच एका अभ्यासातून असंही स्पष्ट झालं आहे की, कोरोनाची लागण झालेल्या बहुतांश रुग्णांच्या शरीरात तयार झालेल्या अँटिबॉडीज सहा महिन्यांपर्यंत त्यांना पुन्हा संसर्ग होण्यापासून संरक्षण देतात. ब्रिटनमधील सुमारे 1700 लोकांच्या बायोबँक डेटाच्या आधारे केलेल्या अभ्यासात असं दिसून आलं की, 88 टक्के व्यक्तींच्या रक्तात अँटिबॉडीज सहा महिन्यांपर्यंत होत्या. म्हणजेच तोपर्यंत त्यांना पुन्हा कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता नव्हती.

ब्रिटनच्या बायोबँकच्या मुख्य शास्त्रज्ञ प्रा. नाओमी अॅलेन यांच्या म्हणण्यानुसार, 'शरीरात अँटिबॉडीजचं (Antibodies) अस्तित्व राहण्याचा शरीराच्या प्रतिकारशक्तीशी (Immunity) संबंध आहे का हे ठामपणे सांगता येणार नाही. मात्र या निष्कर्षांवरून असं दिसतं की नैसर्गिकरीत्या त्यांना कोरोनाची लागण होऊन गेल्यानंतर निदान सहा महिने तरी त्यांना पुन्हा संसर्ग होण्याची शक्यता कमी आहे.'

First published:

Tags: Corona, Corona vaccine, Covid19, Oxford