हिस्सार (हरियाणा) 10 जुलै : कोरोना विषाणू आणि त्याच्या वेगवेगळ्या व्हॅरिएंट्सनी देशभरात सर्वत्र थैमान घातलं आहे. आता रुग्णसंख्या कमी होत असली, तरी दररोज काही ना काही वेगळी बातमी येत आहे. त्यातच आता एक नवी घटना घडली आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग म्हशींमध्येही (Buffalo) आढळला आहे. त्याला बोव्हाइन कोरोना व्हायरस असं नाव देण्यात आलं आहे. हरियाणातल्या लाला लजपतराय पशुचिकित्सा आणि पशुविज्ञान विद्यापीठातल्या (Lala Lajpat Rai University of Veterinary and Animal Sciences) अॅनिमल बायोटेक्नॉलॉजी (Animal Biotechnology) विभागाने या बोव्हाइन कोरोना व्हायरसचा (Bovine Coronavirus) शोध लावला आहे. हिस्सारमधल्या (Hissar) एक महिना वयाच्या रेड्यामध्ये हा विषाणू आढळला आहे.
या संशोधनासाठी संपूर्ण हरियाणा (Haryana) राज्यातल्या म्हशींच्या सुमारे 250 हून अधिक वासरांमधून (रेडे किंवा रेडी) नमुने घेण्यात आले होते. त्यातल्या अनेक रेड्यांना बोव्हाइन कोरोना व्हायरसचा संसर्ग झाल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यातल्या पाच नमुन्यांचं सिक्वेन्सिंग (Sequencing) केल्यानंतर काही आश्चर्यकारक गोष्टी सापडल्याचं शास्त्रज्ञांनी म्हटलं आहे. बोव्हाइन कोरोना व्हायरसचा संसर्ग अन्य प्राण्यांना होण्याची काही शक्यता आहे की नाही, याचा शोध लावण्यासाठी शास्त्रज्ञांनी हे संशोधन केलं.
डेल्टा + व्हेरिएंटपेक्षा धोकादायक असलेला 'लॅम्बडा' वाढवणार भारताची चिंता?
विद्यापीठातल्या शास्त्रज्ञ डॉ. मीनाक्षी (Dr. Meenakshi) यांनी सांगितलं, की येत्या 10 वर्षांत माणसांमध्ये उद्भवणाऱ्या संभाव्य आजारांचं उगमस्थान प्राण्यांमध्येच असेल. म्हणजेच प्राण्यांतून माणसांत अनेक आजारांचा संसर्ग पसरण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. कोरोना विषाणूही वटवाघळांमधून माणसात आला. त्याचा धोका अद्याप टळलेला नाही. त्याप्रमाणेच अनेक जनावरांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या विषाणूंचं अस्तित्व असतं. त्यांच्यामध्ये जनुकीय बदल अर्थात म्युटेशन्स (Mutations) झाली, तर ते नवं रूप धारण करू शकतात आणि कदाचित मानवात त्याचा प्रसार होऊ शकतो. त्यामुळे हा विषाणू आता अन्य कोणत्या प्रजातींमध्ये जात आहे का, अन्य जनावरांमध्ये आढळत आहे का, हे आपल्याला जाणून घेणं गरजेचं आहे. बोव्हाइन कोरोना विषाणू जनावरांचं मलमूत्र, दूध किंवा मांस आदींच्या माध्यमातून माणसांमध्ये पोहोचू शकतो, असंही त्या म्हणाल्या.
या विभागाने केलेल्या संशोधनात असं आढळलं आहे, की हा विषाणू पहिल्यांदा उंटांच्या (Camel) वासरांमध्ये आढळला होता. म्युटेशनद्वारे हा विषाणू माणसात येण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचं विभागाचं म्हणणं आहे. अशा प्रकारे म्युटेशन होऊन हा विषाणू माणसांत पोहोचला आणि माणसांमध्ये त्याचा संसर्ग फैलावला, तर मोठं नुकसान होऊ शकतं. कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या सुरुवातीच्या काळात माणसांना डायरियाची लक्षणं दिसली होती, असं डॉ. मीनाक्षी यांनी सांगितलं. त्या आधारे शास्त्रज्ञ या बोव्हाइन कोरोना व्हायरसवरचा उपायही नॅनो फॉर्म्युलेशनद्वारे शोधत आहेत आणि त्याचे सकारात्मक रिझल्ट्स मिळत आहेत, असंही त्यांनी सांगितलं.
कोरोनानंतर Bell's Palsy चा धोका; चेहऱ्यावर अशी लक्षणं असल्यास दुर्लक्ष करू नका
बोव्हाइन कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेल्या वासरांना डायरिया (Diaria) होऊ शकतो. संसर्गाचं प्रमाण जास्त असेल, तर वासरं मरूही शकतात. तसंच, वासरांमधून हा विषाणू मोठ्या जनावरांमध्ये पसरू शकतो. जनावरांचं मलमूत्र, मांस, दूध आदींद्वारे हा विषाणू मानवामध्येही पसरू शकतो, असं शास्त्रज्ञ म्हणतात.
डॉ. मीनाक्षी म्हणतात, की विषाणूंच्या माध्यमातून होणाऱ्या आजारांवरच्या इलाजासाठी लशी (Vaccines) विकसित करणं आवश्यक आहे. भविष्यात या व्हायरसच्या प्रतिकारासाठीही लस विकसित करण्याची गरज आहे. शेतकरी किंवा पशुपालकांना त्यांचं कोणतं जनावर आजारी असल्याचं आढळलं किंवा त्यात डायरियासारखी (हगवण) लक्षणं दिसली, तर त्या जनावरांना अन्य जनावरांपासून वेगळं ठेवण्याची गरज असल्याचंही डॉ. मीनाक्षी यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे याचा संसर्ग पुढे पसरण्याला प्रतिबंध होऊ शकतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona spread, Haryana