नवी दिल्ली 15 जुलै : रशियाने विकसित केलेल्या स्पुतनिक व्ही (Sputnik V) या कोरोना प्रतिबंधक लशीच्या भारतातल्या वापरासाठी काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने मंजुरी दिली. त्यानंतर प्रत्यक्ष लसीकरण कार्यक्रमात (Vaccination Drive) ही लस उपलब्ध होऊ लागली. या लशीचं पहिलं केंद्र गुजरातमध्ये (Gujarat) सुरत (Surat) शहरात सुरू झालं. आता केवळ गुजरातमधल्याच नव्हे, तर जवळच्या राज्यांतल्या शहरांतले अनेक नागरिकही ही लस घेण्यासाठी सुरतमध्ये नंबर लावत आहेत. त्यामुळे तिथली वेटिंग लिस्ट वाढत आहे. 'दैनिक भास्कर'मध्ये याबद्दलचं वृत्त प्रसिद्ध करण्यात आलं आहे.
स्पुतनिक व्ही ही लस 91.6 टक्के प्रभावी ठरत असल्याचं चाचण्यांमध्ये आढळलं आहे. डॉक्टर्स म्हणतात, की या लशीचे साइड इफेक्ट्स (Side Effects) नाममात्र आहेत. म्हणजेच अन्य लशी घेतल्यानंतर ताप येणं किंवा थकल्यासारखं वाटणं वगैरे त्रास होतात, तसे त्रास ही लस घेतल्यावर होण्याचं प्रमाण फार कमी आहे. लस घेतल्यानंतर अर्धा तास संबंधित व्यक्तीला डॉक्टरांच्या ऑब्झर्व्हेशनखाली ठेवण्याचीही आवश्यकता भासत नाही.
कोल्हापुरात कोरोना नियंत्रणात येत नाही; केंद्रीय पथकाची महाराष्ट्रात धाव
कोव्हॅक्सिन (Covaxin) लशीच्या दोन डोसमध्ये किमान 28 दिवसांचं अंतर ठेवावं लागतं, तर कोविशिल्ड (Covishield) लशीच्या दोन डोसमध्ये 84 दिवसांचं अंतर ठेवावं लागतं. स्पुटनिक व्ही या लशीच्या दोन डोसमध्ये मात्र सर्वांत कमी म्हणजे केवळ 21 दिवसांचं अंतर ठेवणं पुरेसं आहे. त्यामुळे लसीकरण पूर्ण झाल्याचं सर्टिफिकेट (Vaccination Completion Certificate) लवकरात लवकर मिळतं. ज्यांना परदेशात जाण्यासाठी किंवा अन्य काही कारणांसाठी लसीकरण पूर्ण झाल्याचं सर्टिफिकेट हवं असतं, त्यांना स्पुतनिक व्ही लस घेतल्यास कमीत कमी कालावधीत म्हणजे एका महिन्याच्या आत ते मिळू शकतं. अन्य लशी घेतल्यास हे सर्टिफिकेट मिळण्यास एक ते तीन महिन्यांचा कालावधी लागू शकतो.
या सगळ्या कारणांमुळे स्पुतनिक व्ही ही लस घेण्यास प्राधान्य देणाऱ्या व्यक्तींची संख्या वाढू लागली आहे. ही लस गुजरातमध्ये उपलब्ध असल्याने केवळ गुजरातमधल्याच शहरांतून नव्हे, तर मध्य प्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान (Madhya Pradesh, Maharashtra, Rajasthan) आदी राज्यांतल्या जवळच्या शहरांतले नागरिकही लशीसाठी सुरतच्या केंद्रावर नोंदणी करू लागले आहेत, असं 'भास्कर'च्या वृत्तात म्हटलं आहे. मुंबई, उज्जैन, माउंट अबू आदी शहरांतले नागरिक या केंद्रांवर जात आहेत.
आता पुण्यातच तयार होतेय भारतातली पहिली mRNA कोरोना लस; काय आहेत तिची वैशिष्ट्यं?
या लशीचं आणखी वैशिष्ट्य म्हणजे याच्या व्हायलमध्ये (Vial) एकच डोस असतो. एक व्हायल उघडली, की एकाच व्यक्तीपुरती लस त्यात असते. त्यामुळे ती उरण्याचा किंवा वाया जाण्याचा प्रश्न येत नाही. अन्य लशींच्या व्हायलमध्ये 10 डोसेस असतात. त्यामुळे किमान सात व्यक्ती लसीकरणासाठी उपलब्ध असतील, तेव्हाच व्हायल उघडता येते. त्यात काही डोसेस उरले तर ते वाया जातात.
सुरत शहरात किरण आणि शेल्बी हॉस्पिटलमध्ये स्पुतनिक व्ही ही लस दिली जात आहे. त्यासाठी डोसचे 994 रुपये आणि हॉस्पिटलचे 150 रुपये असे प्रत्येकी 1144 रुपये आकारले जात आहेत. तरीही सुरत शहरात पाच हजारांहून जास्त नागरिक या लशीसाठी वेटिंग लिस्टमध्ये आहेत. त्या दोन केंद्रांतून आतापर्यंत 1478 जणांनी ही लस घेतली असून, किरण हॉस्पिटलमध्ये दररोज 110 लोक लस घेत आहेत. वेटिंग लिस्टमध्ये दररोज 300 लोकांची भर पडत आहे. अहमदाबादमध्येही आता स्पुतनिक व्ही लस चार केंद्रांवर मिळू लागली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.