मुंबई, 24 फेब्रुवारी : गेल्या काही दिवसांत महाराष्ट्रातील (coronavirus in maharashtra) कोरोना रुग्णांची आकडेवारी झपाट्याने वाढू लागली आहे. 2021 सालातील राज्यातील सर्वाधिक आकडेवारी आज समोर आली. ज्यावरून राज्यातील कोरोनाची भीषण परिस्थिती समोर येते आहे. गेले काही दिवस दिवसभरातील नव्या कोरोनांची संख्या सहा हजारांपर्यंत होती जी आज आठ हजारांच्या पार गेली आहे आणि राज्यातील कोरोना रुग्ण वाढीला सर्वाधिक जबाबदार आहेत ते राज्यातील फक्त 5 जिल्हे.
राज्य सरकारनं कोरोनाची सध्य परिस्थिती काय आहे, याचा रिपोर्ट दिला आहे. सुरुवातीला मुंबई, पुणे, ठाण्यात कोरोना थैमान घालत होता. गेल्या दोन आठवड्यात या तीन जिल्ह्यांमध्ये कोरोनाच्या अॅक्टिव्ह रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ तर झालीच आहे. यासोबतच नागपूर आणि अमरावतीतही अॅक्टिव्ह रुग्ण संख्या लक्षणीय वाढली आहे.
मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर, अमरावती, अकोला, बुलडाणा, नाशिक, जळगाव आणि औरंगाबाद. 23 फेब्रुवारीच्या आकडेवारीनुसार राज्यातील या 10 जिल्ह्यांत सर्वाधिक अॅक्टिव्ह रुग्ण आहेत आणि याच जिल्ह्यांनी आता राज्याची चिंता वाढवली आहे. एकूण सक्रिय रुग्णांपैकी सर्वाधिक सक्रिय रुग्ण पुण्यात आहेत. त्यापाठोपाठ, नागपूर, ठाणे, मुंबई आणि अमरावतीचा नंबर लागतो.
11 फेब्रुवारी आणि 23 फेब्रुवारीच्या अॅक्टिव्ह कोरोना रुग्णांच्या आकडेवारीची तुलना करता मुंबई, पुणे, ठाणे, जळगाव, औरंगाबाद आणि नाशिकमध्ये रुग्णसंख्या दुप्पट, तिपटीनं वाढलेली दिसते. तर 9 फेब्रुवारी आणि 15 फेब्रुवारी या आठवडाभरात अमरावती, यवतमाळ आणि उस्मानाबादमध्ये अॅक्टिव्ह रुग्ण झपाट्याने वाढले आहेत.
हे वाचा - विदर्भच नाही कोकण, मराठवाडाही डेंजर झोनमध्ये! कॅबिनेट बैठकीत धक्कादायक रिपोर्ट
राज्याच्या आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार राज्यात आज 8,807 नवीन कोरोना रुग्ण सापडले आहेत. तर 80 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील मृत्यूदर आता 2.45 टक्के आहे. राज्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या आता 20,08,623 झाली आहे. त्यापैकी 59,358 रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण (Recovery Rate) 94.70% आहे.