Home /News /coronavirus-latest-news /

नवा कोरोना नवी लक्षण! झपाट्याने रुग्णसंख्या वाढण्याची भीती, वाचा किती धोकादायक आहे नवा स्ट्रेन

नवा कोरोना नवी लक्षण! झपाट्याने रुग्णसंख्या वाढण्याची भीती, वाचा किती धोकादायक आहे नवा स्ट्रेन

भारतामध्येही कोरोनाच्या नव्या प्रकाराचे (New Coronavirus Strain) 6 रुग्ण आढळून आले आहेत. हा नवा विषाणू अधिक धोकादायक असल्याचं स्पष्टीकरण शास्त्रज्ञांकडून देण्यात येत आहे. त्यामुळे प्रत्येकानेच विशेष काळजी घेणं आवश्यक आहे.

    मुंबई, 29 डिसेंबर: कोरोना महामारीने (Coronavirus Pandemic) 2020 मध्ये जगातील संपूर्ण मानवजातीचं आयुष्य व्यापून टाकलं. लाखो लोकांना प्राण गमवावे लागले. वर्ष सरतासरता कोरोनाची लस बाजारात दाखल झाली असून काही देशांनी लसीकरणाचीही सुरुवात केली आहे. मात्र या दरम्यान ब्रिटनमध्ये एका नव्या समस्येनं डोकं वर काढलं आहे. कोरोना व्हायरसमध्ये म्युटेशन होऊन तयार झालेल्या नव्या विषाणूचं (New COVID-19 strain) ब्रिटनमध्ये संक्रमण होत असल्याचं शास्रज्ञांच्या लक्षात आलं. ब्रिटनमध्ये हे संक्रमण वेगाने वाढत असल्याने सावध राहण्याचा इशाराही शास्रज्ञांनी दिला आहे. दरम्यान भारतामध्येही कोरोनाच्या नव्या प्रकाराचे (New Coronavirus Strain) 6 रुग्ण आढळून आले आहेत. ब्रिटनमध्ये आढळून आलेल्या कोरोनाच्या नव्या स्ट्रेनची लक्षणं या UK रिटर्न रुग्णांमध्ये सापडली आहेत. एकूण 6 जणांच्या सॅम्पलपैकी 3 बेंगळुरूतील NIMHANS मध्ये, 2 हैदराबादमधील CCMB मध्ये तर एक पुण्यातील NIV मध्ये पॉझिटिव्ह आढळले आहेत. दरम्यान आता विषाणूमध्ये झालेले बदल, त्याचा परिणाम आणि त्याला रोखण्याचे उपाय शोधण्यासाठी शास्रज्ञ आणि वैद्यकीय क्षेत्रातील सर्वच जण अहोरात्र काम करत आहेत. पण जोपर्यंत याची संपूर्ण माहिती मिळत नाही तोपर्यंत त्याची काही लक्षणं शास्रज्ञांनी सांगितली आहेत. (हे वाचा-हा प्रसिद्ध अभिनेता कोरोना पॉझिटिव्ह, शुक्रवारी केली होती ख्रिसमस पार्टी) सेंटर फॉर डिसिज कंट्रोल अँड प्रीव्हेन्शन (Center for Disease Control and Prevention) यांनी दिलेल्या माहितीनुसार अशी लक्षणं दिसली तर लगेच उपचार घेणं आवश्यक आहे कारण ती आधीच्या विषाणूपेक्षा जास्त घातक आहेत. टाइम्स ऑफ इंडियाने याबाबत वृत्त दिले आहे. काय आहेत नव्या विषाणूची लक्षणं? कोव्हिड-19 च्या नव्या विषाणूचं संक्रमण जगभरात सुरू झाल्यापासून त्याची वेगेवगळी लक्षणं जगभरात दिसून येत आहेत. दररोज नवनवी लक्षणंही सापडत आहेत. त्यामुळे सावध राहणं प्रचंड गरजेचं आहे. यापैकी काही सामायिक लक्षणं अशी आहेत की- ताप येणं, कोरडा खोकला, घसा कोरडा पडणं, सर्दीमुळे नाक वाहत राहणं किंवा नाक चोंदलेलं राहणं, धाप लागणं आणि छातीत दुखणं, थकवा येणं, गॅस्ट्रोइंटेस्टनल इन्फेक्शन, तोंडाची चव जाणं आणि वास न येणं ही महत्त्वाची लक्षणं आहेत अशी लक्षणं दिसली तर ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा. ही लक्षणं आढळून आल्यानंतरही तुम्ही दुर्लक्ष केल्यास ते तुमच्या आणि तुमच्या आजुबाजूच्या व्यक्तींसाठी घातक ठरू शकतं. नवा कोव्हिड-19 विषाणू आहे काय नेमका? कोव्हिड-19 च्या नव्या विषाणूला 'VUI 202012/01' हे नाव देण्यात आलं आहे. स्पाइक प्रोटीनमध्ये जेनेटिक म्युटेशन होऊन हा विषाणू तयार झाल्यामुळे तो लोकांमध्ये सहजपणे पसरेल अशी शक्यता या शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे. साउथ इस्ट ब्रिटनमध्ये हा नवा विषाणू पहिल्यांदा सापडला आणि नंतर तो आता जगभर पोहोचला असण्याची भीती व्यक्त केली जात आहे. भारतातही हा विषाणू येऊन थबकला आहे. आधीच्या विषाणूमध्ये आतापर्यंत एकूण 17 म्युटेशन झाली आहेत. अजून या विषाणूबद्दल विस्तृत माहिती मिळालेली नाही पण संक्रमण वेगाने वाढण्यासाठी हा नवा विषाणूच कारणीभूत ठरत असावा अशा शास्रज्ञांचा अंदाज आहे. (हे वाचा-किमान 31 जानेवारीपर्यंत कठोर नियम; नव्या कोरोनाला रोखण्यासाठी मोदी सरकारची धडपड) कोव्हिड-19 च्या नव्या विषाणूची धोकादायक लक्षणं नव्या विषाणूचा प्रसार वेगाने होत आहे त्यामुळे त्याच्या लक्षणांपासून सावध रहायला हवं. सेंटर फॉर डिसिज कंट्रोल अँड प्रीव्हेन्शनने एकूण लक्षणांपैकी 5 महत्त्वाची धोकादायक लक्षणं जाहीर केली आहेत. यामध्ये महत्त्वाच्या लक्षणांमध्ये चेहरा आणि ओठ निळे पडणे याचा देखील समावेश आहे. इतर लक्षणांमध्ये  श्वसनास त्रास होणं, गोंधळ उडणं, सतत छातीत दुखणं, प्रचंड अशक्तपणा आणि जागं राहणं कठीण वाटणं इ. आहेत. ही पाच लक्षणं महत्त्वाची असून तशी लक्षणं दिसल्यास तातडीने वैद्यकीय सल्ला घ्यावा. नवा विषाणू किती धोकादायक आहे? लंडन स्कूल ऑफ हायजिन अँड ट्रॉपिकल मेडिसीनने केलेल्या अभ्यासानुसार कोव्हिडच्या नव्या विषाणूमुळे ब्रिटनमध्ये संसर्ग वाढू शकतो. या नव्या म्युटेशनमुळे 2020 च्या तुलनेत अधिक रुग्णांना हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागेल अशी भीती शास्रज्ञांना वाटते आहे. त्याचप्रमाणे मृत्यूचा धोकाही अधिक आहे. आधीच्या विषाणूचा संसर्ग लहान मुलांना कमी प्रमाणात झाला होता पण नव्या विषाणूच्या संक्रमणात लहान मुलांनाही धोका निर्माण झाला आहे त्यामुळे अधिक चिंता वाढली आहे. (हे वाचा-Covid-19 Updates: पुण्यात धोका कायम; राज्यात कोरोनाचे नवे रुग्ण कमी, पण...) न्यू अँड इमर्जिंग रेस्पिरेटरी व्हायरस थ्रेट्स अडव्हायजरीमधील (NERVTAG) प्राध्यापिका आणि इंपिरियल कॉलेज ऑफ लंडनमधील व्हायरॉलॉजीतील तज्ज्ञ विंडे बार्क्ले यांच्या मते, ‘ म्युटेशनमुळे तयार झालेल्या नव्या विषाणूला माणसाच्या पेशींमध्ये सहजतेने प्रवेश करता येतो. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग होण्याचा जितका धोका प्रौढांना आहे तितकाच धोका आता लहान मुलांनाही निर्माण झाला आहे.’ लंडन स्कूल ऑफ हायजिन अँड ट्रॉपिकल मिडिसिनमधील सेंटर फॉर मॅथेमॅटिकल मॉडेलिंग ऑफ इन्फेक्शियस डिसिजने केलेल्या अभ्यासातून असं लक्षात आलं आहे की नवा विषाणू हा इतर विषाणूंच्या तुलनेत 56 टक्के अधिक संक्रामक आहे. काळजी काय घ्यायची? सीडीसीच्या सल्ल्यानुसार लक्षणं दिसली तर लगेचच डॉक्टरांचा सल्ला घेणं हेच सध्या आपण करू शकतो. त्याव्यतिरिक्त सोशल डिस्टन्सिंग पाळणं, मास्क वापरणं, हात सॅनिटाइझ करणं आणि कोविड-19 रोखण्यासाठी केलेले इतर उपाय करत राहणं आपल्या हातात आहे. कोरोनावर आलेल्या लसींपैकी काही या नव्या विषाणूचं संक्रमण रोखण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात असं मत काही लस उत्पादक कंपन्यांनी व्यक्त केलं आहे. पण तशा चाचण्या झालेल्या नाहीत. ते सिद्ध झालं तर थोडा आधार वाटेल आणि जनसामान्यांच्या मनातील भीती कमी होऊ शकेल.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Corona, Corona virus in india, Coronavirus

    पुढील बातम्या