नवी दिल्ली 18 सप्टेंबर : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी (PM Narendra Modi Birthday) देशातील कोरोना लसीकरणाचे आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड (Corona Vaccination New Record) मोडले आहेत. शुक्रवारी जवळपास 2.50 कोटीहून अधिक डोस दिले गेले आहेत. याआधी एका दिवसात 1.33 कोटी डोस देण्याचा रेकॉर्ड होता. आरोग्य मंत्रालयानं म्हटलं, की शुक्रवारी लसीकरण मोहिमेच्या अंतर्गत संध्याकाळी पाच वाजेपर्यंत दोन कोटी डोस दिले गेले. केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मंडाविया यांनी लसीकरणाची माहिती घेण्यासाठी दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयाचा दौराही केला. ज्यावेळी ते आढावा घेण्यासाठी गेले तेव्हा देशानं दोन कोटी डोसचा आकडा पार केलेला.
देशात कोविड लसीचा बूस्टर डोस?, आरोग्य मंत्रालयानं केलं स्पष्ट; म्हणाले...
मंडाविया यांनी यावर आनंद व्यक्त करत सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांचे आभार मानले. मंडाविया यांनी याआधी गुरुवारी ट्विट करत म्हटलं होतं, की ज्यांनी आतापर्यंत कोरोनाची लस घेतलेली नाही त्यांनी शुक्रवारी पंतप्रधानांच्या वाढदिवशी आपल्या कुटुंबीयांना आणि इतरांनाही लस घेण्यास सांगत पंतप्रधानांना ही भेटवस्तू द्यावी. याआधी 27 आणि 31ऑगस्टला देशात एक कोटीहून अधिकांना कोरोना लस देण्यात आली होती. मिळालेल्या माहितीनुसार, याआधी दैनंदिन लसीकरणाचा हा रेकॉर्ड चीनच्या नावी होता. इथे जून महिन्यात सर्वाधिक 2.47 कोटी डोस दिले गेले होते. भारतानं चीनचा हा रेकॉर्ड मोडला आहे.
शुक्रवारी सकाळी समोर आलेल्या आकडेवारीनुसार, 18 वर्षाहून अधिक वय असलेल्या 20 टक्के लोकांचं लसीकरण पूर्ण झालं आहे. म्हणजेच 20 टक्के लोकांनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. तर, 62 टक्के लोकांना कोरोनाचा एक डोस देण्यात आलेला आहे. ऑक्टोबरच्या अखेरपर्यंत सर्व 94 कोटी 18 वर्षावरील नागरिकांना लसीचा एक डोस देण्याचं उद्दीष्ट आहे. तर, डिसेंबरच्या शेवटपर्यंत या सर्वांना लसीचे दोन्ही डोस दिले जावेत असा प्रयत्न असेल.
कोरोना झालेल्या कर्मचाऱ्यांना 7 दिवसांची सुट्टी, ‘या’ राज्याने घेतला मोठा निर्णय
निवडणुका असलेली राज्ये उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि पंजाब याठिकाणच्या लोकांना लवकरात लवकर लसीचा निदान एक डोस देण्याचा प्रयत्न केला जात आहे. सध्या लसीची उपलब्धता वाढली आहे, सोबतच पुढच्या महिन्यात जायडस कॅडिलाची लसही उपलब्ध होणार आहे. सोबत स्पूतनिक लसीचा पुरवठाही वाढेल. सध्या भारतात तीन कंपन्यांच्या लसी दिल्या जात आहेत. तर, सहा कंपन्यांच्या लसींला मंजुरी मिळाली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.