भारतात कोरोनाच्या संकटकाळात मेडिकल ऑक्सिजनाचा पुरवठा घटला, वाचा का जाणवतोय हा तुटवडा

भारतात कोरोनाच्या संकटकाळात मेडिकल ऑक्सिजनाचा पुरवठा घटला, वाचा का जाणवतोय हा तुटवडा

भारतात अनेक राज्यांमध्ये ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे मोठ्या प्रमाणात कोरोना (Coronavirus) रुग्णांना आपला जीव गमवावा लागत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे

  • Share this:

निखिल घाणेकर, नवी दिल्ली, 18 सप्टेंबर : भारतात मोठ्या प्रमाणात कोरोना व्हायरस (Coronavirus) चे संक्रमण झाले असून दररोज हजारो रुग्णांची भर पडत आहे. आतापर्यंत भारतात 50 लाखाहून अधिक रुग्ण सापडले असून 70 हजार रुग्णांचा यामध्ये मृत्यू झाला आहे. अनेक राज्यांमध्ये ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे मोठ्या प्रमाणात रुग्णांना आपला जीव गमवावा लागत असल्याचा देखील आरोप करण्यात येत आहे.  महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत असून काही दिवसांपूर्वी शेजारील मध्य प्रदेशला ऑक्सिजन न पुरवल्याने मध्यप्रदेशकडून हायकोर्टाचा दरवाजा ठोठावण्यात आला होता. त्यानंतर राज्य सरकारला मध्यप्रदेशचा ऑक्सिजनचा पुरवठा पुन्हा सुरू करावा लागला.

या सगळ्यात रुग्णांचे मोठ्या प्रमाणात हाल होत असून आज या ऑक्सिजनचे गणित,  त्याचा वापर आणि तो कशा प्रकारे तयार होतो याची माहिती जाणून घेऊया.

मेडिकल ऑक्सिजन म्हणजे काय ?

ऑक्सिजन हा विविध प्रकारचा तयार केला जातो.  मेडिकल आणि रुग्णांना लागणार ऑक्सिजन हा उच्च प्रतीचा असतो. कोरोनाच्या संकटात मेडिकल ऑक्सिजनची मागणी वाढली आहे. बऱ्याचदा ऑपरेशन आणि क्रिटिकल परिस्थितीत या ऑक्सिजनची गरज असते.  त्याचबरोबर या ऑक्सिजनमध्ये जवळपास 82 टक्के शुद्ध ऑक्सिजन असल्याने याची मागणी अधिक प्रमाणात आहे.

कोरोना रुग्णांसाठी ऑक्सिजन महत्वाचा का ?

कोरोना रुग्णांसाठी ऑक्सिजन थेरपी सर्वांत प्रभावी असल्याचे जगभरात सिद्ध झाले आहे. 'हाय फ्लो नेझल ऑक्सिजन' हा कोरोनाग्रस्तांसाठी सर्वाधिक परिणामकारक असल्याचे मानले जाते, पण त्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर ऑक्सिजनची गरज असते. अलीकडे बहुतांश रुग्णालयांमध्ये कोरोनाग्रस्तांसाठी ‘हाय फ्लो ऑक्सिजन'चा वापर केला जात आहे.

(हे वाचा-सावधान! देशामध्ये डिजिटल हेरगिरी वाढतेय, जाणून घ्या काय घ्याल खबरदारी)

लोकनायक जयप्रकाश नारायण हॉस्पिटलचे संचालक डॉ. सुरेश कुमार यांनी याविषयी अशी माहिती दिली आहे की, कोरोना रुग्णांच्या फुप्फुसावर मोठ्या प्रमाणात या आजाराचा परिणाम होतो. अधिक प्रमाणात रुग्णाची ऑक्सिजन पातळी खाली आल्यावर तात्काळ ऑक्सिजन द्यावा लागतो. मात्र आता या ऑक्सिजनच्या उपलब्धतेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. येणाऱ्या काळात ऑक्सिजनचा वापर हा गरजेपुरताच करण्याची वेळ येऊ शकते, अशी चिन्हे आहेत.

मेडिकल ऑक्सिजन कोण बनवते?

सध्या भारतात मोठ्या प्रमाणात मेडिकल ऑक्सिजनची निर्मिती होत आहे. मात्र कोरोनाआधी याचे प्रमाण कमी होते. सध्या भारतात चार ते पाच कंपन्या मेडिकल ऑक्सिजन तयार करतात.  यामध्ये गुजरात, महाराष्ट आणि तामिळनाडूमधील Linde India, Inox Air Products आणि Goyal MG Gases या कंपन्यांचा समावेश आहे.

हॉस्पिटल्सकडून कशा पद्धतीने  हाताळला जातो मेडिकल ऑक्सिजन?

अनेक हॉस्पिटलमध्ये स्वतःचा ऑक्सिजन प्लांट असतो.  मात्र काही छोट्या हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन प्लांट नसतो.  हा ऑक्सिजन वाहून नेण्यासाठी हॉस्पिटलची पाईपलाईन असते. या पाईपलाईनमधून आयसीयू तसेच जिथे ऑक्सिजनची गरज आहे त्या ठिकाणी वाहून नेला जाऊ शकतो. ऑक्सिजन सिलिंडर रिकामा झाल्यानंतर तो तात्काळ भरून ठेवावा लागतो. त्याचबरोबर ज्या हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन प्लांट नाही ते बाहेरून ऑक्सिजन सिलिंडर आणतात.

सध्या तुटवडा का आहे ?

भारतात आधी मोठ्या प्रमाणात मेडिकल ऑक्सिजनची निर्मिती करण्यात येत नव्हती. मात्र आता कोरोना रुग्णांना ऑक्सिजनची गरज असल्याने पुरवठा कमी आणि मागणी जास्त असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. त्याचबरोबर लॉकडाउनच्या कालावधीत ऑक्सिजनची निर्मिती बंद  असल्याने आता त्याचा तुटवडा जाणवत आहे.

(हे वाचा-SBI ATM मधून 10000 रु. पेक्षा अधिक रक्कम काढण्याचा नियम बदलला, वाचा सविस्तर)

सध्या रिकामे झालेले सिलेंडर भरण्याची मागणी मोठ्या प्रमाणात केली जातं आहे. मात्र यामध्ये खूप वेळ जात आहे. त्यानंतर हे हॉस्पिटलमध्ये सिलेंडर पोहोचण्यास देखील वेळ लागत आहे. उस्मानाबादमध्ये ऑक्सिजन एजन्सी चालवणाऱ्या माधव बिरादार यांनी बोलताना सांगितलं, मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनची मागणी वाढली असून याआधी सहा दिवसांत असणारी मागणी आता एकाच दिवसामध्ये केली जाते आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पुरवठा कमी होत आहे. अनेकवेळा मलादेखील ऑक्सिजन मिळण्यास वेळ लागत असून काहीवेळा दिवसभर माझ्याकडे एकही ऑक्सिजन सिलिंडर नसतो.

भारताची उत्पादन क्षमता आणि मागणी किती आहे?

भारतात चार ते पाच ठिकाणी ऑक्सिजनच्या निर्मितीचे प्लांट आहेत. यामध्ये 15 टक्के ऑक्सिजनचा वापर रुग्णालयात होतो. उर्वरित ऑक्सिजन स्टील आणि ऑटोमोबाईल कारखान्यांमध्ये ब्लास्ट फरनेससाठी केला जातो. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतात दररोज 6000 मेट्रिक टन ऑक्सिजनची निर्मिती केली जाते. अनेक रुग्णालयांना योग्य  प्रमाणात ऑक्सिजनचा पुरवठा होत असून आरोग्य मंत्र्यांनी प्रत्येक राज्याबरोबर यासंदर्भात बैठक घेतली आहे. त्याचबरोबर या परिस्थितीवर आम्ही लक्ष ठेवून असल्याचे देखील केंद्रीय आरोग्य सचिवांनी सांगितलं.

Published by: Janhavi Bhatkar
First published: September 18, 2020, 1:48 PM IST

ताज्या बातम्या