नवी दिल्ली, 06 जुलै : कोरोनाव्हायरसपासून आता लहान मुलंही फार सुरक्षित नाही, असं दिसून आलं आहे. काही दिवसांपूर्वीच आईच्या पोटातील अगदी दोन दिवसांच्या गर्भालाही कोरोनाचा धोका आहे, असं एका संशोधनातून दिसून आलं आहे. त्यामुळे चिंता अधिकच वाढली आहे. कोरोनाव्हायरस आणि लहान मुलं याबाबत पालकांच्या मनात अनेक प्रश्न आहेत. बालरोगतज्ज्ञांनी अशाच काही प्रश्नांचं निरसन केलं आहे.
ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (AIIMS) अर्थात 'एम्स'च्या बालरोग विभागातल्या अतिदक्षता विभागाचे (Paediatric ICU) प्रभारी प्रा. डॉ. राकेश लोढा यांच्याशी 'न्यूज 18'ने संवाद साधला. त्यांनी गर्भवती महिलांचं कोरोना लसीकरण आणि बाळ, लहान मुलांमधील कोरोना याबाबत सविस्तर माहिती दिली आहे.
- गर्भवती महिलांचं लसीकरण केल्यास त्यांच्या उदरातल्या बाळांना त्याचा कसा उपयोग होईल?
- गर्भवती महिलांना कोरोनाचा संसर्ग झाल्यास त्यांच्या बाळंतपणात आणि नवजात बालकामध्ये गुंतागुंत होण्याची शक्यता असते. त्यामुळे गर्भवती महिलांचं लसीकरण महत्त्वाचं आहे. ज्या गर्भवतींना कोरोनाप्रतिबंधक लस दिली होती, त्यांच्या नवजात बाळांच्या शरीरातही अँटीबॉडीज विकसित झाल्याचं दिसून आलं आहे. या अँटीबॉडीजमुळे (Antibodies) नवजात बाळांना (Neonates) काही महिन्यांपर्यंत संरक्षण मिळू शकतं.
- कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेदरम्यान (Third Wave) लहान मुलांचं संरक्षण करण्यासाठी हॉस्पिटल्सनी कशा प्रकारे तयारी करायला हवी?
- कोरोना संसर्गाचा आतापर्यंतचा कल पाहता प्रौढांच्या तुलनेत लहान मुलांना संसर्ग होण्याचं प्रमाण कमी आहे. त्यातही कोरोनाबाधित मुलांमध्ये लक्षणं दिसणाऱ्यांची (Asymptomatic) संख्या फार कमी असते. लक्षणं दिसणाऱ्या बहुतांश मुलांमध्ये सौम्य स्वरूपाचं आजारपण असतं; पण मुळातच एखाद्या ठिकाणी नागरिकांमध्ये संसर्ग मोठ्या प्रमाणावर झाला, तर संसर्ग झालेल्या मुलांचं, तसंच मध्यम ते तीव्र स्वरूपाचा आजार होणाऱ्या मुलांचं प्रमाणही साहजिकच वाढतं. आगामी संभाव्य लाटांमध्ये मुलांना संसर्ग होण्याचं प्रमाण खूपच जास्त असेल, असं मानलं जात आहे; मात्र उपलब्ध असलेला डेटाच्या आधारे तरी तसं म्हणता येत नाही. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी सज्ज असण्याची गरज आहे.
हे वाचा - कोणती Corona Vaccine सर्वात प्रभावी? पाहा प्रत्येक कोरोना लशीचा Efficacy Rate
मुलांना मोठ्या प्रमाणावर हॉस्पिटलायझेशनची गरज लागू शकते, असं गृहीत धरून देशभरातल्या वैद्यकीय यंत्रणा व्यवस्था उभारत आहेत. सध्याच्या कोविड फॅसिलिटीजमध्ये मुलांसाठी स्वतंत्र वॉर्डस् किंवा आयसोलेशन रूम्स असल्या पाहिजेत. लहान मुलं असली, तर त्यांच्याबरोबर त्यांचे आई-वडीलही असणारच. त्यामुळे ते गृहीत धरून आवश्यक त्या व्यवस्था करायला हव्यात. लहान मुलांची औषधं, त्यांच्यासाठी लागणारं वैद्यकीय साहित्य आणि उपकरणं हे सगळं वेगळ्या प्रकारचं असतं. त्यामुळे त्यांच्या उपलब्धतेचं प्रमाण वाढवायला हवं. सर्व वयोगटातल्या लहान मुलांच्या कोविड व्यवस्थापनासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांनाही प्रशिक्षण दिलं जात आहे.
अनेक मुलांना कोविडनंतर मल्टी-सिस्टीम इन्फ्लेमेटरी सिंड्रोम (Multi System Inflammatory Syndrome) होतो. त्यापैकी बहुतांश मुलांना मोठ्या प्रमाणावर कोविड इन्फेक्शन नसतं. त्यांच्यावर सध्याच्या बालरोग विभागातही उपचार होऊ शकतात. ज्यांना जास्त त्रास होत असेल, त्यांना स्टेरॉइड्स आणि इंट्राव्हेनस इम्युनोग्लोब्युलिनसारखे उपचार उपयुक्त ठरतात. या दृष्टीने विचार करून पायाभूत सुविधांच्या क्षमतावृद्धीचं कामही सुरू आहे.
हे वाचा - गंगा नदीत कोरोनाव्हायरस? मृतदेह आढळलेल्या पाण्याचा कोविड रिपोर्ट जारी
कोरोना संसर्ग होऊच नये म्हणून जी प्रतिबंधात्मक काळजी प्रौढांनी घेणं अपेक्षित आहे, तीच बालकांसाठीही आवश्यक आहे; मात्र खूप लहान मुलं असली, तर ती मास्क योग्य प्रकारे लावू शकत नाहीत. मोठ्या मुलांनी मात्र निर्बंधांचं पालन करायला हवं. कोरोना काळात मुलांच्या किरकोळ, साध्या आजारपणांसाठी टेलिकन्सल्टेशनचा अवलंब करायला हवा. त्यामुळे मुलं अन्य रुग्णांच्या संपर्कात येण्याचं प्रमाण कमी होईल. तरीही दवाखाना किंवा हॉस्पिटलमध्ये जावं लागलंच, तर सोशल डिस्टन्सिंगचा अवलंब करावा.
- नवजात बालकांमध्ये लाँग कोविडची (Long Covid) कोणती लक्षणं दिसतात?
- मोठ्या मुलांमधली लाँग कोविडची लक्षणं प्रौढांसारखीच असतात; पण नवजात बालकांना कोविड होऊन गेल्यानंतर त्यांच्यात लाँग कोविड सिंड्रोम होत असल्याबद्दल अद्याप नोंद झालेली नाही.
- प्री-मॅच्युअर बाळांना कोविड होऊ शकतो का? झाला तर काय काळजी घ्यायची?
- नवजात बालकांना कोविड संसर्ग होऊ शकतो; मात्र बहुतांश नवजात बालकांमध्ये लक्षणं दिसतच नाहीत किंवा सौम्य स्वरूपाची दिसतात. प्री-मॅच्युअर अर्थात नऊ महिन्यांआधी जन्मलेल्या बाळांनाही कोरोना संसर्ग होऊ शकतो, अशी नोंद आहे. नॉर्मल नवजात बालकांप्रमाणेच त्यांची काळजी घ्यावी लागते. कोविड असो किंवा नसो, प्री-मॅच्युअर बाळांना निओनाटल आयसीयूमध्ये ठेवावं लागू शकतं.
- आई कोविड-19 पॉझिटिव्ह असेल, तर गर्भाला काही त्रास जाणवतो का?
- कोविड नसलेल्या गर्भवतींच्या तुलनेत कोविड असलेल्या गर्भवतींमध्ये गुंतागुंत (Complications) होण्याची शक्यता जास्त असते. त्यापैकी काही जणींची डिलिव्हरी वेळेआधी होऊ शकते. त्यामुळे बालकांचं वजन खूप कमी असू शकतं. कोविडबाधित महिलांनी जन्म दिलेल्या बाळांपैकी 10-15 टक्के बाळांना कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो. त्यापैकी बहुतांश नवजात बाळांना सौम्य लक्षणं दिसतात किंवा लक्षणं नसतातच. आईला गर्भवती असताना कोरोना संसर्ग झाल्यास बाळांना जन्मतःच काही विकार/व्यंग होतं, असं काही निरीक्षण आतापर्यंत नोंदवलं गेलेलं नाही.
- डायबेटीस नसलेल्या मुलांना कोविड संसर्गादरम्यान डायबेटीस (Diabetes) होतो का?
- मुलांमध्ये डायबेटीस असणं ही दुर्मीळ स्थिती आहे. पाश्चात्य देशांत काही ठिकाणी कोरोना संसर्ग झालेल्या मुलांना नव्याने डायबेटीस झाल्याची काही उदाहरणं आढळली आहेत. मुलांमध्ये डायबेटीस असण्याचं प्रमाण कोरोनापूर्व काळाच्या तुलनेत जास्त आहे; मात्र कोविडमुळे मुलांना डायबेटीस होतोच, असा काही संबंध असल्याचं निश्चितपणे सांगता येत नाही.
- कोविड-19मुळे मुलांच्या मेंदूवर (Brain) कसा परिणाम होतो?
- आधी सांगितल्याप्रमाणे, बहुतांश कोरोनाबाधित मुलांना लक्षणं दिसतच नाहीत किंवा अगदी कमी दिसतात. काहींना जास्त त्रास होतो. तो फुप्फुसांशी निगडित असतो. काही अत्यंत दुर्मीळ केसेसमध्ये मेंदूवरही परिणाम होऊ शकतो. ऑक्सिजनची कमतरता तयार झाल्यामुळे फुप्फुसांचा तीव्र आजार झाल्यास त्यांच्या मेंदूवरही परिणाम होऊ शकतो. शुद्ध हरपू शकते.
हे वाचा - कोविड-19 आणि मुले..! आपल्या मुलांना सुरक्षित ठेवण्यासाठी टिप्स
घरातल्या कोणाला किंवा नातेवाईकाला कोरोना संसर्ग होणं, कोणी जवळची व्यक्ती जाणं, घरच्या बिकट आर्थिक परिस्थितीमुळे पौष्टिक आहार न मिळणं अशा विविध कारणांमुळे कोरोनाचे अप्रत्यक्ष विपरीत परिणामही मुलांच्या शरीरावर-मनावर होऊ शकतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona, Coronavirus, Small baby