• Home
  • »
  • News
  • »
  • coronavirus-latest-news
  • »
  • कोरोनाची रचना बदलत असल्यानं संसर्गामध्ये वेगवेगळी लक्षणं, लस घेतलेल्या आणि न घेतलेल्या व्यक्तींमध्ये संसर्गाच्या लक्षणात बदल

कोरोनाची रचना बदलत असल्यानं संसर्गामध्ये वेगवेगळी लक्षणं, लस घेतलेल्या आणि न घेतलेल्या व्यक्तींमध्ये संसर्गाच्या लक्षणात बदल

Corona Virus symptoms: कोरोना साथीच्या सुरुवातीला संसर्ग झालेल्या रुग्णांमध्ये कोरडा खोकला आणि ताप ही मुख्य लक्षणं होती. नंतर तीव्र डोकेदुखी, वेदना आणि ताप ही लक्षणं (Symptoms) दिसत होती.

  • Share this:
नवी दिल्ली, 30 जुलै:  सध्या जगभरात सर्वत्र कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण (Vaccination) मोहीम वेगात सुरू आहे. त्यामुळे सध्या जगात तीन गटातले नागरिक आहेत. काही जणांना लशीचे दोन्ही डोस मिळाले आहेत, तर काहींना फक्त एकच डोस मिळाला आहे आणि काही लोकांना अजून लस मिळालेलीच नाही. त्याच वेळी कोरोनाचा विषाणू (Coronavirus) सतत आपली रचना बदलत असल्यानं त्याच्या बदलत्या रूपांमुळे होणाऱ्या संसर्गामध्ये वेगवेगळी लक्षणं दिसत आहेत. लक्षणांमधल्या बदलांसाठी लसीकरण हे देखील मोठं कारण आहे. कोरोना साथीच्या सुरुवातीला संसर्ग झालेल्या रुग्णांमध्ये कोरडा खोकला आणि ताप ही मुख्य लक्षणं होती. नंतर तीव्र डोकेदुखी, वेदना आणि ताप ही लक्षणं (Symptoms) दिसत होती. त्यानंतरच्या काळात चव आणि वास न येणं ही देखील लक्षणं दिसत आहेत. 'दैनिक भास्कर'ने याबाबतचं वृत्त दिलं आहे. ब्रिटनमधल्या (UK) ZOE या कंपनीने लंडनमधल्या किंग्ज कॉलेजच्या मदतीने एका अॅपद्वारे कोरोनाच्या नवीन लक्षणांवर ऑनलाइन अभ्यास सुरू केला. आतापर्यंत 40 लाख जण यात सहभागी झाले होते. हा जगातला सर्वांत मोठा ऑनलाइन अभ्यास आहे. यानुसार वरच्या तिन्ही गटातल्या व्यक्तींना कोरोना झाला तर त्यांच्यात कोणती सामान्य लक्षणं दिसतील याबद्दल काही निष्कर्ष नोंदवण्यात आले आहेत. ब्रिटनमध्ये अलीकडे आढळलेल्या रुग्णांमध्ये 99 टक्के संसर्ग डेल्टा व्हेरिएंटमुळे झाल्याचं स्पष्ट झालं आहे. यामुळे लक्षणातही बदल झाला आहे. दोन्ही डोस घेतलेल्यांमध्ये... लशीचे दोन्ही डोस घेतलेल्या व्यक्तींना कोरोना संसर्ग झाल्यास आता डोकेदुखी, घसा खवखवणं, शिंका येणं, नाक वाहणं आणि वास कमी येणं ही लक्षणं प्रामुख्याने दिसतात. सतत खोकला येण्याचं लक्षण उशिरा दिसतं. त्यामुळे आता अशा व्यक्तींच्या गटात हे लक्षण 8व्या क्रमांकावर गेलं आहे, तर ताप हे लक्षण 12व्या क्रमांकावर आहे. श्वास लागणं हे लक्षण 29 व्या क्रमांकावर आहे. संपूर्ण लसीकरण झालेल्या लोकांमध्ये सतत शिंका येण्याचं लक्षण दिसत असेल तर त्यांना कोरोना संसर्ग झालेला असू शकतो. त्यामुळं लसीकरण झालेल्या व्यक्तींनी सतत शिंका येत असल्यास ताबडतोब कोविड चाचणी करून घ्यावी. लसीकरण पूर्ण झालेल्या (Vaccinated) व्यक्तींमध्ये सौम्य लक्षणं दिसतात. त्यामुळे या व्यक्तींना गंभीर संसर्गाचा धोका कमी असतो, असं या नवीन अभ्यासातूनही स्पष्ट झालं आहे.

Coronavirus: कसा तयार होतो कोरोनाचा नवा व्हेरिएंट? शास्त्रज्ञांनी केला खुलासा

लशीचा एक डोस मिळालेल्यांमध्ये... लशीचा एकच डोस (One Dose of Vaccine) मिळालेल्या व्यक्तींना कोरोना संसर्ग झाल्यास डोकेदुखी, नाक वाहणं, घशात खवखव, शिंका येणं आणि सतत खोकला ही पाच लक्षणं प्रामुख्यानं दिसतात. याआधी नाक वाहणं आणि शिंका येणं या लक्षणांचा प्राथमिक लक्षणांमध्ये समावेश नव्हता. ती आता लशीचा एक डोस घेतलेल्या व्यक्तींमध्ये प्रामुख्याने दिसत आहेत. लशीचा कोणताही डोस घेतलेला नसेल तर... लस न घेतलेल्या (Non Vaccinated) लोकांना कोरोना संसर्ग झाला, तर आता त्याची लक्षणं बदलली आहेत. डोकेदुखी, घसा खवखवणं, नाक वाहणं, ताप आणि खोकला ही या गटातल्यांची पहिली पाच लक्षणं आहेत. परंतु वास न येण्याचं लक्षण 9व्या स्थानावर आलं आहे. हे लक्षण आधी पहिल्या पाच लक्षणांमध्ये होतं. श्वास घेण्यास त्रास होण्याचं लक्षण पहिल्या दहा लक्षणांमध्ये होतं ते आता 30व्या क्रमांकावर गेलं आहे. तरुण पिढीत अधिक प्रादुर्भाव कोविडच्या बदललेल्या लक्षणांमुळे तरुणांमध्ये याचा संसर्ग पसरण्याची शक्यता अधिक आहे, असं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे. त्यामुळे आता अधिक सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. फार गंभीर लक्षणं दिसत नसतील तरीही तपासणी करून घ्या असं आवाहन तज्ज्ञांनी केलं आहे. कोरोनामुळे बाधित झालेल्या 40 टक्क्यांपेक्षा जास्त लोकांना त्यांना कोविड झाला आहे हे कळलं नव्हतं, असा निष्कर्ष मेंझ विद्यापीठानं केलेल्या ‘गुटेनबर्ग कोविड-19’ अभ्यासात नोंदवण्यात आला आहे. यावरून हे कोविड-19चे रुग्ण झपाट्यानं वाढण्याचं कारण सहज लक्षात येतं. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत थोडी लक्षणं दिसली तरी ताबडतोब तपासणी करून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. यामुळे स्वतःचा आणि दुसऱ्याचा जीव वाचवणंही शक्य होईल. लक्षणांकडे दुर्लक्ष नको... लस घेतलेल्या लोकांनाही कोरोना होत असला तरी कोरोनाचा विषाणू त्यांच्यावर फार घातक परिणाम करू शकत नाही. त्यांच्यामध्ये फार सौम्य लक्षणं दिसतात; मात्र लक्षणं सौम्य आहेत म्हणून त्याकडे दुर्लक्ष करणं धोकादायक ठरू शकतं. कारण हे लोक या विषाणूचे वाहक बनू शकतात आणि ते इतरांना संसर्ग देऊ शकतात. त्यामुळे सौम्य लक्षणं दिसत असली तरीही ताबडतोब चाचणी करणं अत्यावश्यक आहे, असं न्यूयॉर्कमधल्या बेलेयू हॉस्पिटल सेंटरमधले संसर्गजन्य रोगतज्ज्ञ डॉ. सेलीन गौंडर यांनी म्हटलं आहे.

जर्मन राष्ट्राध्यक्षांनी घेतले दोन वेगवेगळ्या लशींचे डोस; दोन वेगळ्या लशीं प्रभावी असल्याने तज्ज्ञ समिती घेणार निर्णय

लसीकरण झालेल्यांनाही संसर्ग या अहवालानुसार, लसीकरण झालेल्या लोकांनादेखील कोरोना विषाणूची लागण होऊ शकते, असं स्पष्ट झालं असून, त्यांच्यात सौम्य लक्षणं आढळत असल्याचं दिसून आलं आहे. विशेष म्हणजे ज्यांनी लस घेतली होती आणि ज्यांनी लस घेतलेली नाही अशा रुग्णांमध्ये समान लक्षणं आढळली आहेत.
Published by:Pooja Vichare
First published: