बिकानेर, 11 मे: गेल्या काही दिवसांपासून देशात कोरोना रुग्णांची (Corona cases) संख्या झपाट्यानं वाढत आहे. देशात मृतांचं (Corona patients death) प्रमाण देखील वाढलं आहे. दुसरीकडे रुग्णालय प्रशासनाच्या हलगर्जीपणाच्याही काही बातम्या समोर येत आहे. अशीच एक घटना राजस्थानातील बिकानेरमध्ये घडली आहे. येथील एका रुग्णालयानं भंवरसिंग चौहान नावाच्या 70 वर्षीय कोरोना रुग्णाला मृत (Doctor declared dead) घोषित केलं. तसेच रुग्णालय प्रशासनानं मृत्यूचं प्रमाणपत्र तयार करून मृतदेह रुग्णाच्या नातेवाईकांकडे देण्याची तयारीही सुरू केली. तेव्हा अचानक रुग्णाचा श्वासोच्छवास सुरू झाला. घटनेनंतर रुग्णालयात एकच गोंधळ उडाला आहे.
आपल्या वृद्ध पित्याच्या मृत्यूची बातमी कळताचं रुग्णाची मोठी मुलगी घटनास्थळी दाखल झाली. आणि ती पित्याच्या शरीराला बिलगून रडू लागली. तब्बल दीड तास हा प्रकार सुरू होता. दरम्यान भंवरसिंग चौहान यांच्या शरीरात हालचाली सुरू झाल्या. आपल्या वडिलांचं शरीर हालतंय हे लक्षात येताचं. तिनं याबाबतची माहिती डॉक्टरांना दिली. डॉक्टरांनी रुग्णाची तपासणी केली असता, त्यांच्या नाडीचे आणि हृदयाचे ठोके सुरू असल्याचं लक्षात आलं. आपले वडील जीवंत असल्याचं कळातचं रडून रडून व्याकुळ झालेल्या मुलीचा जीवात जीव आला.
हे वाचा-घरमालकानं घरात येऊ दिलं नाही, कोरोना Positive महिलेसह टॅक्सीत राहिलं कुटुंब
पण आपल्या वृद्ध पित्याला जीवंत असताना, मृत घोषित केल्यामुळे अनेकांनी डॉक्टरांच्या गलथान कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. भंवरसिंग यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे त्यांना 4 मे रोजी उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. दरम्यान शनिवारी दुपारी त्यांच्या ऑक्सिजन पातळीत घट झाली अन् त्यांची प्रकृती खालावली. यानंतर डॉक्टरांनी ईसीजी काढून प्राणवायूचं प्रमाण वाढवलं. एक तासानंतर डॉक्टरांनी भंवरसिंग यांना मृत घोषित केलं.
हे वाचा-जन्मताच होती त्याची कोरोनाशी लढाई, 11 दिवसांनी नवजात बाळानं COVID-19 वर केली मात
आपल्या पित्याचा मृत्यू झाल्याची माहिती रुग्णाच्या थोरल्या मुलीला कळताचं ती रुग्णालयात आपल्या पित्याच्या शरीराला बिलगून रडू लागली आहे. मृत घोषित केल्यानंतर जवळपास दीड तासांनंतर रुग्णाच्या शरीरात हालचाली जाणवल्या. संबंधित प्रकाराबाबत डॉक्टरांची चौकशी केली जाईल, असं आश्वासन औषध विभागाचे अध्यक्ष डॉ. बी. के. गुप्ता यांनी दिलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Rajasthan