Home /News /coronavirus-latest-news /

चीनविरोधात पुरावा सापडला? अमेरिकेच्या हाती लागला Covid origin report

चीनविरोधात पुरावा सापडला? अमेरिकेच्या हाती लागला Covid origin report

कोरोनाच्या स्रोताचा गोपीन अहवाल अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (Joe Biden) यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला आहे.

    वॉशिंग्टन, 26 ऑगस्ट : कोरोनाच्या संसर्गाला (Coronavirus) दोन वर्षं होत आली, तरी अद्याप त्याच्या स्रोताबद्दल (Coronavirus origin) ठोस माहिती मिळालेली नाही. या संसर्गाची सुरुवात चीनमधून झाली असल्यामुळे आणि एकंदर परिस्थिती पाहता चीनकडे (China) बोट दाखवलं जात आहेच. अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी तर चीनला यासाठी जाहीरपणे जबाबदार धरलं होतं. चीनने अमेरिकेचे (USA) आरोप फेटाळून लावले होते. जो बायडेन (Joe Biden) यांनी अमेरिकेच्या अध्यक्षपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांनी कोरोनाच्या उगमाबद्दलचा अहवाल गुप्तचर संस्थांना 90 दिवसांत तयार करण्याचा आदेश दिला होता. हा गोपनीय अहवाल तयार झाला असून, तो बायडेन यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग कसा पसरला, याच्या दोन प्रमुख थिअरीज असून, त्यावरून शास्त्रज्ञांचे दोन गट पडले आहेत. कोरोना विषाणू वटवाघळांमधून माणसांमध्ये पसरला अशी एक थिअरी आहे. दुसऱ्या थिअरीनुसार, चीनमधल्या वुहान इथल्या प्रयोगशाळेत प्रयोग सुरू असताना तो विषाणू माणसांमध्ये पसरला आणि त्याबद्दलची माहिती चीनकडून दडवण्यात आली. हे चीनकडून हेतुपुरस्सर केलं गेलं असल्याचंही बोललं जात आहे. वुहान या शहरातच कोविड-19चा जगातला पहिला रुग्ण सापडला होता. हे वाचा - तिसऱ्या लाटेआधी पालकांसाठी धोक्याची घंटा! 25 दिवसांत राज्यात 4500 मुलांना कोरोना अन्य अनेक देशांसोबतच अमेरिकेत कोरोना विषाणू संसर्गामुळे हाहाकार उडाला. ही साथ योग्य प्रकारे न हाताळल्यावरून तत्कालीन ट्रम्प प्रशासनावर प्रचंड टीका झाली होती. बायडेन यांनी अध्यक्षपदाची सूत्रं हाती घेतल्यानंतर या दोनपैकी कोणतं कारण कोरोना संसर्गासाठी कारणीभूत आहे, याचा अहवाल 90 दिवसांत तयार करण्याचे आदेश त्यांनी गुप्तचर संस्थेला दिले. हा अहवाल तयारही झाला आहे; मात्र त्यात कोणत्याही शक्यतेवर सहमती झालेली नाही, असं समजतं. चीनकडून या संदर्भातली फारशी माहिती न मिळाल्यामुळे हा अहवाल कोणत्याही निष्कर्षाप्रत आला नसल्याचं समजतं. या संदर्भातल्या घडामोडींशी जवळून संबंध असलेल्या दोन अमेरिकी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोना विषाणू (Coronavirus) जनावरांमधून माणसांत पसरला की वुहानच्या (Wuhan) प्रयोगशाळेतून पसरला, याची नेमकी माहिती या अहवालात देण्यात आलेली नाही. 'वॉशिंग्टन पोस्ट', तसंच 'वॉल स्ट्रीट जर्नल' या अमेरिकी वृत्तपत्रांच्या हवाल्याने 'टीव्ही नाइन हिंदी'ने याबद्दलचं वृत्त दिलं आहे. हे वाचा - कोरोना लशीच्या दोन डोसमधील अंतर कमी करणार पण...; मोदी सरकारचा मोठा निर्णय चीनकडून या संदर्भात पुरेशी माहिती मिळालेली नाही. त्यामुळे कोणत्याही ठोस निष्कर्षाप्रत येता आलेलं नाही, असं अमेरिकी अधिकाऱ्यांनी वॉल स्ट्रीट जर्नलला सांगितलं. काही प्रकारची माहिती चीन हाती लागू देत नसेल, तर हा विषाणू नेमका कसा माणसांत आला, याची खरी माहिती कधीच पुढे येऊ शकत नाही, असं एका अधिकाऱ्याने सांगितलं. कोरोनाच्या उगमाचं कारण शोधण्यासाठी पुन्हा तपास करण्याच्या अमेरिकेच्या आणि अन्य देशांच्या मागणीवर चीनने टीका केली आहे. जागतिक आरोग्य संघटनेनेही कोरोनाचं मूळ शोधण्याचा प्रयत्न जानेवारी महिन्यात केला होता; मात्र त्यात यश आलं नव्हतं. दरम्यान, जो बायडेन यांना सादर करण्यात आलेला अहवाल थोड्याच दिवसात जाहीर केला जाईल, अशी माहिती देण्यात आली आहे.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: America, China, Coronavirus

    पुढील बातम्या