मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /

सतत का बदलतोय Coronavirus? शास्त्रज्ञांना अखेर उत्तर शोधलंच

सतत का बदलतोय Coronavirus? शास्त्रज्ञांना अखेर उत्तर शोधलंच

Covid 19 Network18 lokmat

Covid 19 Network18 lokmat

ब्रिटन, दक्षिण आफ्रिका आणि ब्राझीलमध्ये कोरोना विषाणूचा नवा स्ट्रेन्स (coronavirus new strain) सापडला जो इतर देशांपर्यंत पोहोचल आहे.

नवी दिल्ली, 26 जानेवारी:   सार्स कोव्ह 2 (SARS-CoV-2) अर्थात कोरोनाव्हायरस (CoronaVirus) सतत रूप बदलत असून, त्याच्या अधिक संसर्गजन्य अशा अनेक नवीन स्ट्रेन्स (Strains) तयार झाल्या आहेत. त्यामुळे शास्त्रज्ञ तसंच जगभरातील सरकार चिंतेत आहेत. हा विषाणू नेमका रूप कसा बदलतो आहे आणि इतका संसर्गजन्य का होतो आहे, याचा शास्त्रज्ञांनी शोध घेतला आणि अखेर त्याचं उत्तर सापडलं आहे.

इतर सगळ्याच विषाणूंप्रमाणे कोरोनाचा विषाणूही स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी स्वतःमध्ये जनुकीय बदल अर्थात म्युटेशन (Mutation) करत असतो. विषाणूचं पुनरुत्पादन होत असताना त्याच्या जेनेटिक कोडिंगमध्ये (Genetic Coding) काही छोट्या चुका (Tiny Errors) होतात. त्यातल्या बऱ्याचशा चुका निरुपद्रवी असतात. जेनेटिक कोडिंगमधल्या काही चुकांमुळे मात्र विषाणूला अधिक ताकद मिळते. अलीकडेच ब्रिटन, दक्षिण आफ्रिका आणि ब्राझीलमध्ये आलेल्या कोरोना विषाणूच्या नव्या स्ट्रेन्स ही त्याचीच उदाहरणं आहेत.

बर्न युनिव्हर्सिटीमधल्या एपिडेमिऑलॉजिस्ट एम्मा हॉडक्रॉफ्ट यांनी सांगितलं, जेव्हा विषाणूची लागण झालेल्या रुग्णांची संख्या जास्त असते, तेव्हा विषाणूमध्ये म्युटेशन होण्याची शक्यता जास्त असते. कारण रुग्णाची संख्या जास्त असली की विषाणूचा प्रसार जास्त होणार आणि तो जास्त झाला की म्युटेशन होण्याची शक्यताही वाढणार. आपण रुग्णसंख्या कमी ठेवण्यात यशस्वी झालो, तर विषाणूचं कार्यक्षेत्र मर्यादित राखण्यात यश येऊ शकतं, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

लंडनच्या इम्पेरियल कॉलेजचे विषाणूतज्ज्ञ वेंडी बार्क्ले यांनी सांगितलं, म्युटेशन्स विविध घटकांवर अवलंबून असतात. विषाणूचं अस्तित्व किती प्रमाणात आहे आणि विषाणू आहेत त्या वातावरणाची स्थिती काय आहे, याचा एकत्रित परिणाम त्यावर होतो. वर्षभरात कोविड-19 ला प्रतिकार करण्याची मानवांची नैसर्गिक शक्ती, तसंच लसीकरणातून तयार झालेली प्रतिकारशक्ती यामध्ये वाढ झाली. त्यामुळे कोरोना विषाणूच्या नव्या स्ट्रेन्स आढळणार यात काही नवल नव्हतं. दक्षिण आफ्रिका आणि ब्राझीलमध्ये ज्या व्यक्तींना विषाणूची लागण झाली आणि त्यातून ते बरे झाले, त्यांच्या शरीरात मोठ्या प्रमाणावर अँटीबॉडीज तयार झाल्या, असंही वेंडी यांनी सांगितलं.

हे वाचा - आता Tata उतरणार कोरोना लसीकरण मोहिमेत; भारतात तिसरी Covid लस आणायची तयारी सुरू

अन्य काही तज्ज्ञ मात्र कोरोना विषाणूच्या नव्या स्ट्रेन्स येण्यासाठी वाढती प्रतिकारशक्ती (Immunity) हे कारण असल्याबद्दच शंका व्यक्त करतात. प्रतिकारशक्ती कमी असलेल्या बहुतांश नागरिकांनी पहिले काही महिने स्वतःची बरीच काळजी घेतली. पण जसजशी रुग्णसंख्या वाढू लागली, तसतसं या व्यक्तींनाही संसर्ग होण्याचं प्रमाण वाढू लागलं आणि त्यातून मग म्युटेशनला चालना मिळाली असावी

पॅरिसमधील 'दी इन्स्टिट्यूट पास्टर'मधील विषाणूतज्ज्ञ ब्जोर्न मेयेर यांनी सांगितलं की, ज्या रुग्णांची प्रतिकारशक्ती कमी होती किंवा त्यात काही बिघाड होता, अशा ठिकाणी विषाणूला दीर्घ काळ राहता आलं आणि त्या ठिकाणी विषाणूमध्ये म्युटेशन झालं असावं आणि तिथून ते दुसरीकडे पसरलं असावं. प्रतिकारशक्ती कमी असलेल्या पेशंटमध्येही जी काही प्रतिकारशक्ती असेल, त्यामुळे विषाणूला स्वतःत बदल करणं भाग पडलं असेल.

कोरोना विषाणूला शरीराकडून प्रतिकार होऊन तो निष्प्रभ होईपर्यंत साधारण 10 दिवस लागतात. म्हणजेच शरीरात संसर्ग तितके दिवस असतो. मात्र काही पेशंटच्या शरीरात हा विषाणू काही आठवड्यांपर्यंतही राहिला असल्याची निरीक्षणं आहेत. त्यामुळे म्युटेशनसाठी अधिक कालावधी विषाणूला उपलब्ध झाला असावा.

फ्रान्सच्या 'अॅकॅडमी ऑफ मेडिसीन'च्या म्हणण्यानुसार, दक्षिण आफ्रिकेत एचआयव्हीचे रुग्ण अधिक संख्येने आहेत. अशा रुग्णांमध्ये कोरोना विषाणूच्या दक्षिण आफ्रिकन आवृत्तीचं पुनरुत्पादन झालेलं असण्याची शक्यता आहे. वेगवेगळ्या स्ट्रेन्सची निर्मिती नेमकी कुठून झाली याबद्दल शास्त्रज्ञांत अद्याप एकमत नाही. मात्र त्याच्या परिणामांचं व्यवस्थापन योग्य पद्धतीने करावं लागतं, याबद्दल सर्वांचं एकमत आहे.

हे वाचा - कोरोनावर आता येणार औषध; Oxford च्या 'वंडर ड्रग'ने मृत्यूदर कमी होण्याची आशा

ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूची नवी स्ट्रेन आढळल्याने रुग्णसंख्येत आणि मृत्युसंख्येतही वाढ झाली आहे.

कोरोना विषाणूच्या नव्या स्ट्रेन्स अधिक संसर्गजन्य (Transmissible) असल्या तरी त्यांची हानी करण्याची क्षमता (Virulent) अधिक आहे की नाही, याबाबत पुरावा अद्याप हाती नाही. तरीही तो धोका नजरेआड करता येत नाही, असंही मेयेर यांनी सांगितलं.

सध्या जगभर अनेक ठिकाणी अंतर पाळलं जात आहे, स्वच्छता केली जात आहे, त्यामुळे विषाणूच्या प्रसाराच्या वेगावर परिणाम होत आहे, त्याच्या हानी करण्याच्या क्षमतेवर नाही, असे मेयेर म्हणाले.

एक गोष्ट मात्र नक्की की, हा विषाणू स्वतःमध्ये बदल करत राहणार. त्यातून अधिक धोकादायक स्ट्रेन्स तयार होतील, किंबहुना तशा स्ट्रेन्स आत्ताही फिरतही असतील.

'एकूण रुग्णसंख्या वेगाने वाढत असल्यामुळे येत्या हिवाळ्यात अधिकाधिक स्ट्रेन्स येतील आणि कदाचित पुढच्या हंगामापर्यंत शोधल्या जाणार नाहीत, अशी शक्यताही नाकारता येत नाही,' असं युनिव्हर्सिटी ऑफ वॉशिंग्टनमधले बायोलॉजिस्ट कार्ल बर्गस्ट्रॉम यांनी ट्विटरवर म्हटलं आहे.

First published:

Tags: Corona, Corona vaccine, Coronavirus, Covid19